Wednesday, April 25, 2018


किटक नाशकाचा सुरक्षीत वापराची 

माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी

-  मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे  

नांदेड, दि. 25:-  किटक नाशकाचा सुरक्षित वापरासंबंधी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

खरीप हंगाम नियोजन व किटक नाशकाचा सुरक्षित वापर या विषयावर कार्यशाळा येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. शिनगारे बोलत होते.  

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक एच. आर. गुंटूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषि अधिकारी पंडित मोरे, जिल्हा सिड्स फर्टिलायझर ॲन्ड पेस्टीसहाऊस असोशिएशनचे अध्यक्ष मुधकर मामडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय भरगंडे सेवानिवृत्त मोहिम अधिकारी अनंत हांडे, बीएएसएफ देवानंद जाधव, मोनसॅन्टो प्रतापसिंह काळे, एन्टोमॉलॉजीस्ट का. सं. के. डॉ. शिवाजी तेलंग , कृषी उपसंचालक श्रीमती एम. आर. सोनवणे आदि यावेळी उपस्थित होते.  

श्री. शिनगारे पुढे म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून सर्वांना शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी विक्रेते, गुणनियंत्रण अधिकारी, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किटक नाशकाचा सुरक्षित वापरासंबंधी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. तसेच विषबाधाची घटना घडू नये म्हणून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. शेंद्रीय बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विक्रेते , कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी मोहिम स्वरुपात काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.  

डॉ. मोटे यांनी अनुदानित खतांची विक्री ई-पॉस मशिनद्वारे करणे बंधनकारक असल्याचे सांगून शेतकऱ्यांना आधार कार्ड आवश्यक असल्याचेही सांगितले. तसेच यावेळी कायदेविषयक, परवाना विषयक, किटक नाशकांचा सुरक्षित वापर, विषबाधा झाल्यास लक्षणे आणि उपाययोजनेची माहिती दिली.

कार्यशाळेच्या प्रारंभी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली. यावेळी किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी कॅलेंडरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन देशपांडे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील गुणनियंत्रण निरीक्षक, कृषि निविष्ठा विक्रेते, विविध कंपन्याचे प्रतिनिधी , शेतकरी उपस्थित होते.

****









 
गाळमुक्‍त धरण, गाळयुक्‍त शिवार योजनेची
प्रभावी अंमलबजावणी करावी निर्देश
    - मृद व जलसंधारण विभागाचे अवर सचिव मोईन ताशीलदार
नांदेड, दि. 25:- जिल्‍हयात गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे अवर सचिव मोईन ताशीलदार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजना कार्यशाळा ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, रोहयोचे उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, सहयोगी संस्‍थेचे श्रीमती माणसी कपूर, व जलतज्ज्ञ बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजना योग्‍य पध्दतीने राबविण्‍याबाबत मार्गदर्शन केले. देशात सर्वात जास्‍त धरणे, जलसाठे असलेले महाराष्ट्र राज्‍य असून धरणात दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे धरणांच्‍या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत असल्‍याने शासनाने ‘‘गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजना’’ राबविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा मन्‍याड, लेंडी आदी मोठ्या नद्या वाहतात. या नद्यामध्‍ये ठिकठिकाणी लहान-मोठी धरणे झाली आहेत. जिल्ह्यामध्‍ये 0 ते 100 हे. सिंचन क्षमतेचे 483 तलाव असून त्‍याचे जिवंत साठवण क्षमता 91.38 द.ल.घ.मी आहे तसेच प्रकल्‍पीय सिंचन क्षमता 16 हजार 886 हेक्‍टर आहे. त्‍याचप्रमाणे 101 ते 250 हे. सिंचन क्षमतेचे 38 तलाव असून त्‍याचे जिवंत साठवण क्षमता 39.04 द.ल.घ.मी आहे तसेच प्रकल्‍पीय सिंचन क्षमता 6 हजार 755 हेक्‍टर आहे असे एकंदरीत 521 तलाव असून त्‍याचे जिवंत साठवण क्षमता 130.42 द.ल.घ.मी आहे तसेच प्रकल्‍पीय सिंचन क्षमता 23 हजार 641 हेक्‍टर आहे.
सद्यस्थितीत जिल्‍हयात मोठया प्रमाणात गाळ काढण्‍यात येत असून जिल्‍हयात संस्‍कृती संवर्धन मंडळ सगरोळी व अनुलोम संस्‍थेच्‍या माध्‍यमातून तसेच लोकसहभागातून आतापर्यत 13 तालुक्‍यातील 49 गाव / पाझर तलावातील गाळ काढण्‍याचे काम प्रगतीत असून त्‍यामधून आत्‍तापर्यत 9.78 लक्ष घ.मी. गाळ काढण्‍यात आलेला असून सदरचा गाळ 391  हे. क्षेत्रावर टाकण्‍यात आलेला आहे. त्‍याची अंदाजीत रक्‍कम रु. 1.17 कोटी आहे. त्‍याचप्रमाणे या योजनेंतर्गत तलावातील/ प्रकल्‍पातील गाळ शेतकऱ्यांनी जास्‍तीतजास्‍त घेऊन जावे. जे शेतकरी गाळ घेऊन जाण्‍यास इच्‍छुक आहेत त्‍या शेतकऱ्यांना आपले सरकार पोर्टलवर किंवा संबंधीत तालुक्‍यातील तहसीलदार यांचेकडे मागणी नोंदवावी. त्‍यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च शासनाकडून देण्‍यात येणार असल्‍याने जास्‍तीतजास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जावा, असेही आवाहन करण्यात आले. कार्यशाळेस जिल्‍हास्तरीय आणि तालुकास्‍तरावील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.   
**** 



अधिस्वीकृती पत्रिकेचे अर्ज 2 मेपर्यंत
सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 25 :-  लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी नव्याने अर्ज करावयाचे आहेत, त्यांनी बुधवार, दिनांक 2 मे, 2018 पर्यंत संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी केले आहे.
लवकरच लातूर येथे विभागीय अधिस्वीकृती समिती बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत प्राप्त अर्जांवर विचार करण्यात येईल.
*****

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...