Friday, August 13, 2021

 नांदेड जिल्ह्यात  5 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 53 अहवालापैकी  5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 656 एवढी झाली असून यातील 87 हजार 941 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 56 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, नांदेड ग्रामीण 1, नायगाव 1 असे एकूण 5 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 6 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 56 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  5, किनवट कोविड रुग्णालय 3,  देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 42, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 85 हजार 391

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 82 हजार 600

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 656

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 941

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97  टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-18

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-56

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3    

00000

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

पिपल्स कॉलेज येथे भूजल साक्षरता अभियान

 

नांदेड (जिमाका) दि. 13  :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य पुणे येथील संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.) यांच्या सूचनेनुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सुवर्ण महोत्सवी वर्ष-२०२१ व स्वातंत्र्य अमृत वर्षानिमित्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, नेहरू युवा केंद्र आणि  राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने पीपल्स कॉलेज, नांदेड येथील मैदानावर स्वच्छता अभियान, स्वच्छता फेरी व भूजल साक्षरता अभियान, पाऊस पाणी संकलनाद्वारे भूजल पुनर्भरण, विहीर, विंधन विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांचे पाऊस पाणी संकलन भिंतीपत्रक आणि जलसाक्षरता, गाव आराखडा व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास नांदेड पीपल्स महाविद्यालयाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे , उपाध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गवई, पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव श्रीमती नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी चंदा रावळकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख श्री. चीरडीले, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कनिष्ठ भूवैज्ञानिक आर.व्ही. पवार, तसेच २५० ते ३०० महाविद्यालयीन विद्यार्थी / विद्यार्थिनी, पोलीस मिलिटरी अकॅडेमी मधील उमेदवारांची उपस्थिती होती.

00000

 14 ऑगस्ट रोजीची पक्की अनुज्ञप्ती चाचणी रद्द

 

नांदेड (जिमाका) दि. 13  :- पक्की अनुज्ञप्ती चाचणीकरिता उशिराने अपाँइटमेंट मिळत असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडतर्फे शनिवार, दिनांक 14 ऑगस्ट, 2021 रोजीच्या सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. परंतू, काही अपरिहार्य कारणास्तव दिनांक 14 ऑगस्ट, 2021 रोजीचे पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे आयोजन रद्द करण्यात आली आहे, संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  

0000

 

जिल्ह्यात पूर्व उच्च प्राथमिक व  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न

 303 केंद्रावर 24 हजार 380 विद्यार्थ्यांचा सहभाग 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्टला जिल्ह्यात संपन्न झाली. यात 24 हजार 380 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यस्तरावरील निर्देशानुसार ही शिष्यवृत्ती परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्थित नियोजन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले होते.

 

जिल्ह्यातील 303 केंद्रावर ही परीक्षा पार पडली. इयत्ता पाचवीचे 15 हजार 182 विद्यार्थी  तर इयत्ता आठवीचे 9 हजार 198 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. एकूण 24 हजसा 380 विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिली. पूर्व उच्च प्राथमिकचे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 90.11 टक्के तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 88.7  टक्के होते. कोविडीच्या संदर्भातील सर्व नियमावलीचे पालन करून ही परीक्षा आज संपन्न झाली. कोविड-19 च्या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांनी ऑनलाईन क्लासद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.

000000



 

 

राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे सोमवारी लातूर येथे आयोजन   

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्यात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पिक असून सर्वात जास्त शेतकरी सोयाबीनचे पिक घेतात.  राज्यात सर्वसाधारणपणे 44 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जात असून प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा विभागाचे यात प्राबल्य आहे. सोयाबीन पिकांचे उत्पन्न व उत्पादकता वाढविण्याबरोबरच मूल्य साखळी विकासासाठी व्यापक प्रयत्न व चर्चा होण्याच्यादृष्टीने कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या उपस्थितीत कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय लातूर येथे सोमवार 16 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.30 वा. राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या परिषेदमध्ये सोयाबीन पिकासाठी विकसीत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन पिकाशी निगडीत यांत्रिकीकर, सोयाबीन प्रक्रियामधील संधी व आव्हाने, विपणन व वायदे बाजार आदी बाबीवर अधिक उत्पादन घेणारे शेतकरी, उद्योजक, सोयाबीन व्यवसायातील तज्ज्ञ, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपन्या प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

 

या परिषेदेचे उद्घाटन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे हे करणार असून  वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होणार आहे.  ही परिषद कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु अशोक ढवण, कृषि आयुक्त धीरजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

 

सोयाबीन परिषदेमध्ये तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शास्त्रज्ञ, वायदेबाजार विश्लेषक  व उद्योजक यांच्यामध्ये विविध विषयावर थेट परिसंवाद होणार असून या परिषदेमुळे सोयाबीन पिकाबाबत  महाराष्ट्र शासनाचे भविष्यातील धोरण ठरविणे सुकर होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चैनल www.youtube.com/C/ AgricultureDepartmentGoM वरून होणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

0000000

 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास स्पर्धेची नोंदणी

15 ऑगस्ट पर्यराहणार सुरु 

युवक-युवतींना स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 13  :- राज्यातील युवक आणि युवतींना त्यांचे कौशल्य दाखविणे, एक उत्तम मंच उपलब्ध करुन देण्यासाठीमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास स्पर्धा-2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करुन निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. जिल्हा स्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन 17 तथा 18 ऑगस्ट 2021 या कालावधीत संबंधित जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयाच्या ठिकाणी आयोजन करण्यात येईल.  

 

जिल्हास्तरावर निवड झालेल्या उमेदवारांसाठी विभागीय स्तरावरील स्पर्धा 23 24 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. पुढे नामांकन झालेल्या उमेदवारांची राज्यस्तरावरील स्पर्धा 3, 4 5 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे या उद्देशाने 15 ऑगस्ट पर्यत नोंदणीसाठी गुगल लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform सुरू केली आहे. या गुगल लिंकचा वापर करुन आपली नाव नोंदणी या स्पर्धेसाठी करता येईल.  याबाबत काही अडचणी / शंका असल्यास कार्यालयाचदुरध्वनी क्र. 02462-251674 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी या  संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेडचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

0000000

 

स्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन 

नांदेड (जिमाका) दि. 13  :- भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त रविवार 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याकारणाने सर्व निमंत्रितांनी मास्क घालुनच कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 वा. किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...