Monday, March 9, 2020

कॅबिनेट सचिवांकडून कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत आढावा
*कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यात आवश्यक सर्व उपाययोजना*

*- मुख्य सचिव अजोय मेहता*

मुंबई, दि. ९ : कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यात आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. बाहेर देशातून येणारी विमाने, जहाजांच्या आगमन स्थानावर तपासणी चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना आज दिली.

केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व राज्यांनी यासंदर्भात केलेली तयारी आणि करावयाच्या उपाययोजनांसदर्भात मुख्य सचिवांकडून आढावा घेतला, त्यावेळी महाराष्ट्र राज्यात कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्य सचिव श्री. मेहता यांनी दिली.

कोरोनासंदर्भात आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात, खबरदारी घ्यावी, पण कोणीही घाबरुन जाऊ नये. लोकांनी स्वच्छतेसंदर्भात काळजी घ्यावी. प्रशासनाने आवश्यक औषधे, वैद्यकीय तज्ञ, विलगीकरण कक्ष, आवश्यक मास्क यांची उपलब्धता करावी. हवाई, जल किंवा भूपृष्ठ मार्गावरील आगमन स्थानकांवर परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या आवश्यक चाचण्या करण्यात याव्यात, अशा सूचना श्री. गौबा यांनी दिल्या.

राज्यात करण्यात आलेल्या तयारीची माहिती देताना मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले की, कोरोनासंदर्भात राज्यात आतापर्यंत २८० जणांपैकी २७३ जणांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. उर्वरीत ७ जणांच्या चाचणीचा रिपोर्ट येणे बाकी आहे. प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्यात ४९६  खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. 
याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या सुरु आहेत. जल मार्गाने येणारे क्रुझ इत्यादींनाही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

००००

मास्क, पी.पी.ई. किटची विक्री डॉक्टरांचे
चिठ्ठीवर, विक्री बिलाद्वारे करण्याची सुचना
गरज असल्याशिवाय मास्कची खरेदी, अनावश्यक साठवणूक करु नये
            नांदेड, दि. 9 :-  सध्या मुख्य करुन चिनमध्ये फैलावलेला कोरोना सदृश्य आजाराने थैमान घातले असून त्यात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. त्याअनुषंगाने भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी सदर आजाराचा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये म्हणून काही प्रतिबंधीत उपाय योजले आहेत. त्याचाच भाग म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने सुद्धा उपचाराकरीता तसेच प्रतिबंधाकरीता वापरात येणारी पी.पी.ई. किट व एन 95 मास्क, इतर वस्तु यांची उपलब्धता व काळाबाजार रोखण्यासाठी परिपत्रक काढून राज्यातील औषध विक्रेत्यांना एन 95 मास्क व पी.पी.ई. किट यांची विक्री डॉक्टरांचे चिठ्ठीवर व विक्री बिलाद्वारे करण्याचे सुचना दिल्या आहेत.
त्याअनुषंगाने शनिवार 7 मार्च 2020 रोजी औषधी भवन येथे नांदेड जिल्ह्यातील घाऊक औषधे विक्रेते व सर्जिकल वस्तुंचे विक्रेते यांची बैठक नांदेड जिल्ह्याचे औषध निरीक्षक मा. ज. निमसे यांनी घेतली. या बैठकीत श्री. निमसे यांनी एन 95 मास्क व पी.पी.ई. किटची विक्री डॉक्टरांचे चिठ्ठीवर व विक्री बिलाद्वारे करण्याच्या सुचना दिल्या. त्याची पडताळणी करण्यासाठी अचानक औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात येत असल्याचे सांगितले. कोणीही औषध विक्रेते एन 95 मास्क व पी.पी.ई. किटची विक्री डॉक्टरांचे चिठ्ठीवर व विक्री बिलाद्वारे करत असल्याचे आढळून आल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. ग्राहकांनी सुद्धा गरज असले शिवाय मास्कची खरेदी करु नये व अनावश्यक त्याची साठवणूक करु नये, असे आवाहन केले. गरज भास्ल्यास डॉक्टरांचा सल्ला घेवून व चिठ्ठीद्वारे खरेदी बिलासह मास्कची खरेदी करावी.
औषध विक्रेते छापील किंमतीपेक्षा जास्त किंमती आकारत असल्यास त्याबाबत प्रशासनाची संपर्क करावा. मास्कची व पी.पी.ई किटची उपलब्धता करुन ठेवण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या, अशी माहिती सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन नांदेड यांनी दिली आहे.
000000


विधिमंडळात कार्यक्रमाचे आयोजन
शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते,राजाराम पाटील,
डॉ. झकेरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यान
मुंबई, दि 9: राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम पाटील व ज्येष्ठ विचारवंत व माजीमंत्री डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळाने राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे संस्मरण करण्या-या व्याख्यानाचे दि.11 मार्च 20 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या मान्यवरांनी देशाच्या व राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे व त्यांच्या कार्य कर्तृत्वाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांनी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून विधिमंडळाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात बुधवार दिनांक ११ मार्च २०२० रोजी सायंकाळी ४.०० वाजता व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील-चाकूरकर, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड् अनिल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी माधवराव गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे व्याख्याते म्हणून लाभणार आहेत.
००००




करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी
सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

औरंगाबाद, दि.09 (विमाका) -  करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदीचा उपाय म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कुठल्याही धार्मिक कार्यक्रम, संमेलन, लग्न समारंभ घेणे टाळावे गर्दी होणार नाही असे प्रसंग टाळावे, जेणेकरुन करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध होईल. तसेच शक्यतो हस्तांदोलन करणे टाळावे, शिंकतांना, खोकलतांना व्यक्तीगत स्वच्छतेकडे योग्य ती काळजी घेत सतर्क राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करोना व्हायरस संदर्भात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी प्र.जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपायुक्त वर्षा ठाकूर, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने देखील खबरदारीचा उपाय म्हणून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक, घाटी अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, आदी संबंधित अधिकाऱ्यांचा व्हॉटस्ॲप ग्रुप, करोना सेल, हेल्पलाईन तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक जनतेच्या संपर्कासाठी देण्यात येणार असून काही समस्या असल्यास या क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी 2 कोटी रुपये राखीव ठेवणे. प्रत्येक शासकीय सामान्य रुग्णालयांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकी 50 कॉट, तसेच आवश्यक ती साधन सामुग्री राखीव ठेवणे त्याचबरोबर विमानतळ, रेल्वेस्टेशन येथे विदेशी पर्यटकांचे आरोग्य तपासणी करण्याच्या सुविधा तयार ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधितांना दिले.
तसेच लवकरच पैठण येथील नाथषष्ठी उत्सव सुरूवात होणार असून भाविक मोठ्या प्रमाणात पैठण नगरीत दाखल होतात तरी भाविकांनी परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पैठण येथे जाणे टाळावे, संस्थेने देखील याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगून प्रशासनाच्या वतीने पुरक व्यवस्था ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
*****


हरभरा पिकावरील महिला शेतीशाळेचा शेतीदिन संपन्न
            नांदेड, दि. 9 :- मुदखेड तालुक्यातील मौजे हजापुर येथे 6 मार्च 2020 या दिवशी क्रॉपसॅप संलग्न हरभरा पिकावरील महिला शेतीशाळेचा शेतीदिन माधव मारोतराव पवार यांच्या शेतात आयोजीत करण्यात आला होता.
या शेतीशाळेच्या शेतीदिनाच्या अध्यक्षस्थानी बालाजी गोविंदा पानेवार मार्केट कमिटीचे सदस्य भगवान मारोती पानेवार, तंटामुक्ती अध्यक्ष पंजाबराव मुंगल हे होते.
तसेच महाबिजचे सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी श्री. सोनटक्के, कृषि सहाय्यक श्रीमती एस. डी. रेशमलवार, श्रीमती आर. डी. देशमुख, श्रीमती जे. ओ. येरावाड, श्रीमती एस. ए. शिंदे, श्रीमती ए.एस.मोरे तसेच कृषिताई श्रीमती आशाबाई दत्ता मुंगल व मुख्य प्रवर्तक जी. पी. वाघोळे, कृषी पर्यवेक्षक बारड व शेतकरी महिला, शेतकरी बांधव उपस्थीत होते.
            या शेतीदिनामध्ये हरभरा पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयावर महाबिजचे सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी श्री. सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. या विषयावर बोलताना हरभरा पिक सरळवाणचे असल्यामुळे पुढील वर्षाकरीता बियाणे म्हणुन वापर करताना साठवणुक ही अत्यंत महत्वाची असते. बियाणे साठवणुक ही बारदाण्यामध्ये करावी. तसेच बोरीक पावडरचा वापर किड लागु नये म्हणुन करावा. तसेच साठवणुक करताना थप्पीची संख्या पाच थराची लावावी. भिंती लावुन ठेवु नये जेणे करुन ओलावा तयार होणार नाही बियाणे खराब होणार नाही. बाजारात ‍विक्री करीता नेत असताना स्पायरलव्दारे स्वच्छ करुन गुणवत्तायुक्त माल न्यावा.
            शेतीशाळेबद्दल मनोगत व्यक्त करताना श्रीमती सत्वशिला राजु मुंगल म्हणाले शेतीशाळेच्या पहिल्या वर्गापासुन ते शेवटच्या वर्गापर्यंत मिळालेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त होते. यामध्ये बिज प्रक्रिया व ‍5 टक्के निंबोळीअर्क तयार करण्याची पध्दतीबद्दल थोडक्यात माहिती दिली. श्रीमती अनिताबाई गंगाधर पानेवार यांनी मनोगत व्यक्त करताना किटकनाशकाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यापासुन घ्यावयाची काळजी याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली. तसेच मनोरंजनातुन ज्ञानार्जन याबाबत सांघीक खेळ (सुदर्शन चक्र) महत्वाचे ठरतात असेही म्हणाले.
            या शेतीशाळेच्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात खरीप हंगामाकरीता घेण्याचे आवाहन जी. पी. वाघोळे यांनी केले. या शेतीदिनाचे सुत्रसंचलन कृषी सहाय्यक श्रीमती ए. एस. मोरे यांनी केले. आभार कृषि सहाय्यक श्रीमती एस. डी. रेशमलवार यांनी केले. ही शेतीशाळा यशस्वी करण्याकरीता कृषी मित्र बालाजी धोंडीबा मुंगल यांनी सहकार्य केले.
000000


आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रासाठी प्रवेश अर्ज मागविले

नांदेड, दि. 9 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात बुधवार 1 एप्रिल 2020 पासून सुरु होणाऱ्या 102 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवाराना विविध स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छूक आदिवासी (अनुसुचित जमातीचे) उमेदवारांकडून शनिवार 28 मार्च 2020 तत्पुर्वी अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रवेशाच्या अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवाराचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परिक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारानी किनवट येथे स्वत: राहण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदविधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा-उमेदवाराचे वय 31 मार्च 2020 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खातेमध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँकेमध्ये चालू खाते आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा या प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.

प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनाची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छूक उमेदवारांनी शनिवार 28 मार्च 2020 पर्यंत शैक्षणिक व जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र पेटकुलेनगर, गोकुंदा किनवट (पेटकुलेनगर, गोकुंदा दूरध्वनी क्र. 02469-221801 / 9881524643) जि. नांदेड यांनी केले आहे.


0000

पंडित दीनदयाल उपाध्याय अल्पसंख्यांक रोजगार मेळावा
            नांदेड, दि. 9 :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड आणि हुजूर साहिब औद्योगीक प्रशिक्षण संस्था यांच्या संयक्त विद्यमानाने शुक्रवार 13 मार्च 2020 रोजी सकाळी 10 वा. पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हुजूर साहिब औद्योगीक प्रशिक्षण संस्था बाफना रोड नांदेड येथे आयोजीत करण्यात आला आहे.
याठिकाणी नामांकीत कंपनीच्यावतीने बेरोजगार उमदवारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर,  डेटा इन्ट्री ऑपरेटर, बँक ऑडिट ऑफिसर, कॅम्प्युटर ऑपरेटर, ऑफिस असीस्टंट, मार्केटिंग, सेल्स एक्झीकेटीव, पब्लीक रिलेशनशीप ऑफीसर  या पदाकरीता मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी येताना सोबत शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती आणव्यात.
बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता नांदेड प्रशांत सो. खंदारे आणि प्राचार्य हुजूर साहिब औद्योगीक प्रशिक्षण संस्था नांदेड श्री गुरुबच्चनसिंग यांच्यावतीने करण्यात आले आहे.
000000

जिल्हा रुग्णालय येथे कर्करोग तपासणी शिबीरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, दि. 9 :- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे घेण्यात आलेल्या युनिवर्सल हेल्थ चेक-अप कॅम्प (कर्करोग रुग्ण तपासणी शिबीरास) रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरास हैद्राबाद येथील (कॅन्सर तज्ञ) डॉ. सतीष पवार, नांदेड येथील (विकिरण विज्ञानी ) डॉ. नितीन मोरे, सर्जन डॉ. वाजीद हाशमी यांनी उपस्थित राहून एकूण 21 रुग्णांची कर्करोग संबंधित तपासणी केली. त्यापैकी संशयित अशा तीन (तीन) स्त्री रुग्णांचे (PAP SMEAR SAMPAL ) व एका (एक) रुग्णांचे (BIOPSY SAMPAL) तपासणीसाठी पाठवण्यात आले. पुढील प्राप्त अहवालानुसार सदरील रुग्णांना महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आवश्यकतेनुसार योग्य ते उपचार व संदर्भसेवा पुरविण्यात येईल असे जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार यांनी म्हणाले.
या शिबिरास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, डॉ. हनुमंत पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुजाता राठोड, डॉ. जाधव, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, दंतशल्य चिकित्सक डॉ. कांतीलाल इंगळे, डॉ. पोकळे, डॉ. पद्दमवार तसेच कार्यालयीन सर्व अधिकारी, कर्मचारी हे उपस्थित होते.

या शिबिरास अधिपरीसेविका श्रीमती चरडे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर व सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.


0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...