Monday, January 5, 2026

लेख

 वृत्तपत्रांचा प्रवास…आजपर्यंतचा !

बदलत्या काळासोबत ज्याला बदलणे जमले त्यालाचा यश प्राप्त करणे सोपे असते. याचा व्यक्तीप्रमाणे माध्यम क्षेत्राचा विस्तार आणि आजची स्थिती याचं एक चिंतन आणि येणाऱ्या काळातील बदलाचा वेध आणि याचं निमित्त अर्थात दर्पण दिन.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात जन्म झालेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा कार्यालेख खरोखरच अफाट आहे. मराठी माणसांनी जन्म दिलेल्या दोन व्यवसायांनी नंतर उत्तुंग अशी भरारी घेतली. यात दर्पणकार जांभेकर यांनी मुहूर्तमेढ केल्यानंतर वृत्तपत्र व्यवसाय एक आहे. सोबत स्मरण करावे असा व्यवसाय म्हणजे दादासाहेब फाळके यांनी सुरू केलेला चित्रपट व्यवसाय याचीही आठवण आपण ठेवली पाहिजे.

या दोन्ही व्यवसायांवर आज लाखो कुटूंबे अवलंबून आहेत. इतकेच नव्हे तर देशाला दिशा आणि नेतृत्व देणारी व्यक्तीमत्वे ही याचा मधून आपणासमोर आली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधान देशाला देणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच देशाचे पंतप्रधान राहिलेले दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आरंभिक काळात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती.

कधी काळी केवळ मुद्रीत माध्यम आणि त्यासोबत रेडिओ हे माध्यम होते त्यातही रेडिओवर शासकीय नियंत्रण असलेला काळ होता त्यामुळे मुद्रीत माध्यमाला अधिक महत्व होते. नंतरच्या काळात टेलीव्हिजन चॅनेलचा प्रारंभ झाला त्यातही अनेक वर्षे देशात शासन यंत्रणेची माध्यमे म्हणून त्याकडे बघितले जात होते. त्याकाळातही मुद्रीत माध्यमाचे महत्व कायम राहिले.

नंतर 90 च्या दशकात वाहिन्यांची सुरूवात झाली. आज आपण याचा प्रवास बघितला तर तो थक्क करणारा असा आहे. आजच्या तारखेस देशात सर्व भाषांची मिळून 1150 चॅनेल्स आहेत आणि यातील केवळ वृत्तप्रधान वाहिन्यांची संख्या 433 इतकी आहे. एकूण चॅनेल संख्येच्या 40 टक्के असे प्रमाण होते. यात सर्वाधिक 211 वाहिन्या हिंदी भाषी असून मराठी वृत्तवाहिन्यांची संख्या 14 आहे. वाहिन्यांची संख्या वाढली त्यानंतर नवमाध्यमांचा उदय झाला असे असले तरी आजही मुद्रीत माध्यमाला असणार माध्यम महत्व आजही तितकेच आणि कारण आपल्या देशात आजही 'लिहिलेल्या आणि छापलेल्या' शब्दांवर'  सर्वांचा विश्वास आहे.

मुद्रीत माध्यमे संपणार अशी ओरड सुरू झाली, मात्र त्यानंतरही आजवर या माध्यमांचा विस्तार सुरूच आहे. एक पिढी वयात येताना दुसरी पिढी जन्म घेतेय अशा आपल्या विस्तीर्ण आसेतू हिमालय अशा भारत देशात नवे वृत्तपत्र दाखल होते. त्यावेळी ते आधीच्या वृत्तपत्रांवर फारसा परिणाम करत नाही याचं कारण म्हणजे प्रत्येक वृत्तपत्र आपला नवा वाचकवर्ग घेऊन येतो.

मात्र नवमाध्यमांनी सर्वांना बदलणे आवश्यक आहे असा स्पष्ट संदेश दिला आहे. यानुसार बड्या वृत्तपत्रांनी आपल्या ऑनलाईन आवृत्त्या सुरू केल्या आहेत. त्यातूनही व्यवसाय वृद्धी होईल असा होरा बांधून त्याची ऑनलाईन वर्गणी भरून वर्गणीदार केले जात आहेत असे सध्याचे चित्र आहे. मात्र झपाट्याने माहिती समोर आणणाऱ्या या काळात सशुल्क ऑनलाईन वृत्तपत्र विक्री त्यांना यापुढील काळात प्राप्त होईल याची खात्री नाही. वृत्तपत्राला त्याच्या ऑनलाईन उपस्थिती ती देखील मोफत ठेवून त्याच्या आधारे डिजिटल मार्केटींग मधून व्यवसाय हा उत्तम पर्याय आहे. हे ज्यांना कळले त्यांचे भविष्य दोन्ही बाजूंनी चांगले राहणार आहे.

कोणत्याही तंत्राचे फायदे जसे असतात तसे तोटेही असतात. नवमाध्यमे वापरताना त्यात अनेक जण विविध पद्धतीने वापरतात यामुळे युट्यूब चॅनेलचे पेव आलेले आपणास दिसते. याला नेमके अधिष्ठान नाही. परिणामी या माध्यमांचा मुळ प्रवाहात प्रवेश होणे अवघड आहे. त्यांना मान्यता मिळण्याची शक्यता सध्या नाही आणि भविष्यात ती झाली तरी त्यावर नियंत्रण ही समस्या ठरू शकते.

इन्स्टाग्राम आणि फेसबूक व (ट्विटर )आताचे एक्स या माध्यमांचा वापर वेगळा हेतू,वेगळा आणि गती देखील वेगळीच आहे. त्यात क्षणभंगूरता अधिक प्रमाणात आहे. त्यात 'एन्फ्ल्युएन्सर' होण्याचे भाग माध्यमांना अशक्य असे आहे. कधी काळी Mission with Vision असणारी पत्रकारीता व्यावसायिक स्पर्धेने पूर्णपणे बदलून टाकली आणि ग्रामीण भागात याचे चित्र अगदीच वेगळे झालेले आहे. यातील व्यावसायिक भाग सोडला तर आजही ही वृत्तपत्रे एका अर्थाने समाजाला मार्ग दाखवण्याचे काम करीत आहे.

आपल्या देशात 3 स्तंभ अर्थात सेना, न्यायालय आणि शासन यंत्रणा यांना मान्यता आहे. माध्यमांनी यात 'समाज प्रहरी' म्हणून आपले स्थान चौथा स्तंभ स्वरूपात उभे केले आहे. त्याचाही गौरवपूर्ण उल्लेख दर्पण दिना निमित्त करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करू आणि आगामी काळात देखील हे माध्यम दीपस्तंभासारखे सर्वांना मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा करूया.

 

- प्रशांत दैठणकर


वृत्त क्रमांक 13

नांदेड शहरात 1516 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद 

नांदेड, दि. 5 जानेवारी :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी तर मोजणी शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. याअनुषंगाने गुरूवार 15 जानेवारी रोजी सिडको / हडको परिसर नांदेड व शुक्रवार 16 जानेवारी गांधी मैदान गोकुळनगर नांदेड येथील भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. 

याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये निर्गमीत केला आहे. या आदेशात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड क्षेत्रात भरणारे वरील आठवडी बाजार हे शनिवार 17 जानेवारी 2026 रोजी भरविण्यात यावेत, असे नमूद केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 12

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज

२५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. ५ जानेवारी : “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, गुरुद्वारा प्रशासन तसेच विविध समाजातील अशासकीय सदस्यांचा सहभाग असलेल्या २५ विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्येक समितीने आपापली नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नाकर गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे जगदीश सकवान, मुख्यमंत्री सहायता निधी राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजितसिंघ कडेवाले, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.

नांदेड येथे राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी  वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मामा चौक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यासह आजूबाजूच्या अकरा जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून भव्य स्वरूपाची तयारी करण्यात येत असून, सर्व नियोजनासाठी २५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समिती प्रमुख व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी वेळेत व परिपूर्ण नियोजनासह पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.  राहुल कर्डिले यांनी दिल्या.

कार्यक्रम नियोजनासाठी गठीत समित्या पुढीलप्रमाणे :

जागरण व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन समिती, सुरक्षा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवक व्यवस्थापन समिती, अतिथी स्वागत समिती, लंगर/भोजन व्यवस्थापन समिती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, वैद्यकीय सेवा समिती, विद्युत व ध्वनी व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी व मीडिया समिती, कार्यक्रम सादरीकरण समिती, ध्वज व सजावट समिती, आर्थिक व्यवस्थापन समिती, शासकीय परवानगी समिती, जुताघर व्यवस्थापन समिती, जलपुरवठा समिती, महिला सेवा समिती, ज्येष्ठ नागरिक समिती, जिल्हा समन्वय समिती, स्वरूपा व्यवस्थापन समिती, सुरक्षा व तपासणी समिती, निवास व्यवस्थापन समिती, प्रदर्शनी समिती व राखीव समिती.

या समित्यांमध्ये शासकीय अधिकारी, गुरुद्वारा प्रशासनातील प्रतिनिधी तसेच विविध समाजातील अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून, सर्वांच्या सहकार्याने “हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रम संस्मरणीय ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

00000










 वृत्त क्रमांक 11

जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नांदेड, दि. ०५ जानेवारी : जनगणना कामासाठी अचूक व विश्वासार्ह माहिती संकलन होणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी योग्य नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जनगणना २०२७ च्या पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते.

सन २०२७ मध्ये होणारी राष्ट्रीय जनगणना ही पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार आहे. यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय पोर्टल कार्यान्वित राहणार आहे.

अचूक लोकसंख्येची आकडेवारी प्राप्त होण्यासाठी जनगणना प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गट नियोजन, पर्यवेक्षक व प्रगणक यांच्या नियुक्तीबाबत योग्य नियोजन करावे. तसेच जनगणना प्रक्रियेतील प्रत्येक तरतूद सखोलपणे समजून घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले.

सन २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेच्या प्रशासकीय तयारीला प्रारंभ झाला असून, त्याअनुषंगाने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जनगणना संचालनालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे ही पूर्वतयारी कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रविण भगत व अरुण साळगांवकर यांनी संगणकीय सादरीकरण तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने प्रशिक्षण दिले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, तहसीलदार विपीन पाटील, सर्व तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगररचना कार्यालयातील अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जनगणनेचे काम अत्यंत महत्त्वाचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय अथवा निष्काळजीपणा केल्यास कठोर शिक्षेस पात्र ठरावे लागेल. त्यामुळे जनगणना कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण व आढावा बैठकीस उपस्थित राहून प्रत्यक्ष सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सूचित केले.

०००००




विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...