Tuesday, March 27, 2018


एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी    
कार्यपालन अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड, दि. 27 :- बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात एमएचटी-सीईटी परीक्षा महत्वाची असून परीक्षेचे काम सुव्यवस्थीत नियोजनानुसार व चोखरितीने पार पाडण्यासाठी कार्यपालन अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
एमएचटी-सीईटी परीक्षा गुरुवार 10 मे 2018 रोजी  नांदेड शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील अंदाजे 10 हजार विद्यार्थी परीक्षा देतील. या परीक्षेचे काम चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा परीक्षेचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश पोपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, महावितरणचे कार्यकारी अभियंता एन. के. ठाकरे, प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, परीक्षेचे उपजिल्हा समन्वय अधिकारी डी. एम. लोकमनवार, पोलीस निरीक्षक पी. जी. देशपांडे, तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर,  गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एस. आर. कोकणे, शासकीय तंत्रनिकेतनेचे सर्व जिल्हा संपर्क अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कार्यपालन अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, परीक्षेच्यावेळी मोबाईल व तत्सम साहित्य विद्यार्थ्यांनी घेऊन येऊ नये. त्यासाठी प्रत्येक केंद्राच्या गेटवर तपासणी करुन विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात सोडण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत हेल्पलाईन सेवा सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.  
एमएचटी-सीईटी परीक्षेची विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत असून नव्याने कृषि शास्त्र अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश एमएचटी-सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे मागील वर्षापेक्षा नांदेड जिल्ह्यात 22 टक्के विद्यार्थी आजपर्यंत वाढण्यात आले आहेत. परिक्षेसाठी नियुक्त कर्मचारी/अधिकारी यांचे  मानधन हे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार आहे. त्यामुळे त्यांना बँक खात्याची सविस्तर माहिती  पहिल्या परिक्षणाच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी कार्यपालन अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश व पुरेसा पोलीस बंदोबस्त (महिला पोलीसांसह) लावावा. परीक्षेचे महत्वाचे साहित्य ने-आण करणाऱ्या वाहनासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविणे. परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स, फॅक्स सेंटर, टंकलेखन संस्था, एसटीडी केंद्र बंद ठेवणे तसेच मोबाईल यंत्र व शिघ्र संचाराची साधने नेण्यास प्रतिबंध करणे. परीक्षा संपल्यानंतर परीक्षेचे साहित्य मुंबई येथे पोलीस संरक्षणासह पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परीक्षेचे गोपनीय साहित्य प्राप्त झाल्यानंतर विभागातील चारही जिल्हा केंद्राचे जिल्हा संपर्क अधिकारी यांना सुपूर्द करणे. परीक्षा संपल्यानंतर गोपनीय साहित्य जमा करण्याबाबत सुचना देण्यात आली.  परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  परीक्षेच्या दिवशी परीक्षा उपकेंद्रावर नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांची भोजनाची व्यवस्था, परीक्षेचे पेपर्स आणण्यासाठी व परत पोचविण्याची व्यवस्थेची जबाबदारी निश्चित करण्यात आली. गोपनीय साहित्य स्ट्रांग रुममध्ये जमा करुन घेण्याबाबत, सिलबंद पेट्या परीक्षेच्या दिवशी उपकेंद्रावर पाठविण्यात येणार आहेत. त्यानुसार संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत आदेशित केले. परीक्षेसाठी उपकेंद्र म्हणून निवड झालेल्या शाळा, महाविद्यालय प्राचार्य, मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन परीक्षेसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे सूचना. परीक्षा उपकेंद्रावर आरोग्य पथक आवश्यक साहित्यासह नेमणूक करणे. परीक्षा कालावधीत परीक्षा उपकेंद्रावरील विद्युत वितरण खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी. परीक्षा उपकेंद्राचे अंतर लक्षात घेऊन शहरात जादा सिटी बसची व्यवस्था करावी. जेणेकरुन सर्व परीक्षार्थी यांना वेळेवर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे शक्य होईल, अशीही सुचना देण्यात आली.   
00000


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे
उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांचा दौरा
नांदेड, दि. 27 :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव ( राज्यमंत्री दर्जा ) मधुकरराव कांबळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 28 मार्च 2018 रोजी औरंगाबाद येथुन शासकीय वाहनाने दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यासमवेत बैठक व राखीव. दुपारी 4.30 वा. नांदेड येथुन कळमनुरी जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.
0000000

दिव्यांग व्यक्तींनी मतदानासाठी जागरुक रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 27 :- दिव्यांग व्यक्तींनी मनातील उदाशीनता दूर करुन मतदार यादीत नाव नोंदणी करावी व मतदानासाठी जागरुक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदणी करणे, दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरावर चर्चासत्र जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दिलीप कच्छवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चर्चासत्रात जिल्हा समाज कल्याण अधिकारी आ. व. कुंभारगावे, नायब तहसिलदार डी. एन. शास्त्री, गजानन नांदगावकर, स्नेहलता स्वामी, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. डी. शेवाळे, जे. व्ही. रायेवार, के. टी. कणे, बी. के. आडेपवार, अर्चना बियाणी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. हर्षवर्धन सोनकांबळे, जिल्हा आरोग्य कार्यालयाचे डॉ. एस. व्ही. फुलवरे आदीने सहभाग घेतला होता.
यावेळी दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविणे. त्यांना मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी व्हिलचेअर, रॅम्प व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याबाबत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होतील, असेही सांगण्यात आले. शासकीय अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात सहभागी करण्यात येणार नाही त्याबाबत संबंधीत विभागांना निर्देश देण्यात येतील. ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराची जास्त संख्या असेल तेथे विशेष लक्ष देऊन सुविधा देण्यात येतील. दिव्यांग मतदारांची मतदार नोंदणी अर्जात दिव्यांग म्हणून नोंदणी होते. जिल्ह्यात सरासरी 35 हजार दिव्यांग पात्र व्यक्तीची मतदार नोंदणी होणे असल्याची माहिती देण्यात आली. मतिमंद मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा. 90 ते 100 टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी पोस्टल मतदान किंवा  मोबाईल मतदान केंद्राद्वारे सुविधा देण्याची सुचना सहभागींनी मांडली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 18 वर्षावरील पात्र दिव्यांग मतदारांची मतदान टक्केवारी वाढून त्यांचेतील उदाशीनता दूर करण्याच्या उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात दिव्यांग व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदणी व मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर लागणाऱ्या विविध सोई-सुविधा विषयी सहभागींनी उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
000000



लोकशाही दिनाचे
2 एप्रिल रोजी आयोजन
नांदेड, दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 2 एप्रिल 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.                             
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून मंगळवार 27 मार्च पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 मार्च 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 26 एप्रिल 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...