Tuesday, March 27, 2018


दिव्यांग व्यक्तींनी मतदानासाठी जागरुक रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 27 :- दिव्यांग व्यक्तींनी मनातील उदाशीनता दूर करुन मतदार यादीत नाव नोंदणी करावी व मतदानासाठी जागरुक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदणी करणे, दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरावर चर्चासत्र जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दिलीप कच्छवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चर्चासत्रात जिल्हा समाज कल्याण अधिकारी आ. व. कुंभारगावे, नायब तहसिलदार डी. एन. शास्त्री, गजानन नांदगावकर, स्नेहलता स्वामी, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. डी. शेवाळे, जे. व्ही. रायेवार, के. टी. कणे, बी. के. आडेपवार, अर्चना बियाणी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. हर्षवर्धन सोनकांबळे, जिल्हा आरोग्य कार्यालयाचे डॉ. एस. व्ही. फुलवरे आदीने सहभाग घेतला होता.
यावेळी दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविणे. त्यांना मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी व्हिलचेअर, रॅम्प व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याबाबत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होतील, असेही सांगण्यात आले. शासकीय अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात सहभागी करण्यात येणार नाही त्याबाबत संबंधीत विभागांना निर्देश देण्यात येतील. ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराची जास्त संख्या असेल तेथे विशेष लक्ष देऊन सुविधा देण्यात येतील. दिव्यांग मतदारांची मतदार नोंदणी अर्जात दिव्यांग म्हणून नोंदणी होते. जिल्ह्यात सरासरी 35 हजार दिव्यांग पात्र व्यक्तीची मतदार नोंदणी होणे असल्याची माहिती देण्यात आली. मतिमंद मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा. 90 ते 100 टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी पोस्टल मतदान किंवा  मोबाईल मतदान केंद्राद्वारे सुविधा देण्याची सुचना सहभागींनी मांडली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 18 वर्षावरील पात्र दिव्यांग मतदारांची मतदान टक्केवारी वाढून त्यांचेतील उदाशीनता दूर करण्याच्या उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात दिव्यांग व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदणी व मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर लागणाऱ्या विविध सोई-सुविधा विषयी सहभागींनी उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
000000


No comments:

Post a Comment