Tuesday, March 27, 2018


एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी    
कार्यपालन अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड, दि. 27 :- बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात एमएचटी-सीईटी परीक्षा महत्वाची असून परीक्षेचे काम सुव्यवस्थीत नियोजनानुसार व चोखरितीने पार पाडण्यासाठी कार्यपालन अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
एमएचटी-सीईटी परीक्षा गुरुवार 10 मे 2018 रोजी  नांदेड शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील अंदाजे 10 हजार विद्यार्थी परीक्षा देतील. या परीक्षेचे काम चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा परीक्षेचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश पोपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, महावितरणचे कार्यकारी अभियंता एन. के. ठाकरे, प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, परीक्षेचे उपजिल्हा समन्वय अधिकारी डी. एम. लोकमनवार, पोलीस निरीक्षक पी. जी. देशपांडे, तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर,  गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एस. आर. कोकणे, शासकीय तंत्रनिकेतनेचे सर्व जिल्हा संपर्क अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कार्यपालन अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, परीक्षेच्यावेळी मोबाईल व तत्सम साहित्य विद्यार्थ्यांनी घेऊन येऊ नये. त्यासाठी प्रत्येक केंद्राच्या गेटवर तपासणी करुन विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात सोडण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत हेल्पलाईन सेवा सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.  
एमएचटी-सीईटी परीक्षेची विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत असून नव्याने कृषि शास्त्र अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश एमएचटी-सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे मागील वर्षापेक्षा नांदेड जिल्ह्यात 22 टक्के विद्यार्थी आजपर्यंत वाढण्यात आले आहेत. परिक्षेसाठी नियुक्त कर्मचारी/अधिकारी यांचे  मानधन हे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार आहे. त्यामुळे त्यांना बँक खात्याची सविस्तर माहिती  पहिल्या परिक्षणाच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी कार्यपालन अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश व पुरेसा पोलीस बंदोबस्त (महिला पोलीसांसह) लावावा. परीक्षेचे महत्वाचे साहित्य ने-आण करणाऱ्या वाहनासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविणे. परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स, फॅक्स सेंटर, टंकलेखन संस्था, एसटीडी केंद्र बंद ठेवणे तसेच मोबाईल यंत्र व शिघ्र संचाराची साधने नेण्यास प्रतिबंध करणे. परीक्षा संपल्यानंतर परीक्षेचे साहित्य मुंबई येथे पोलीस संरक्षणासह पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परीक्षेचे गोपनीय साहित्य प्राप्त झाल्यानंतर विभागातील चारही जिल्हा केंद्राचे जिल्हा संपर्क अधिकारी यांना सुपूर्द करणे. परीक्षा संपल्यानंतर गोपनीय साहित्य जमा करण्याबाबत सुचना देण्यात आली.  परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  परीक्षेच्या दिवशी परीक्षा उपकेंद्रावर नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांची भोजनाची व्यवस्था, परीक्षेचे पेपर्स आणण्यासाठी व परत पोचविण्याची व्यवस्थेची जबाबदारी निश्चित करण्यात आली. गोपनीय साहित्य स्ट्रांग रुममध्ये जमा करुन घेण्याबाबत, सिलबंद पेट्या परीक्षेच्या दिवशी उपकेंद्रावर पाठविण्यात येणार आहेत. त्यानुसार संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत आदेशित केले. परीक्षेसाठी उपकेंद्र म्हणून निवड झालेल्या शाळा, महाविद्यालय प्राचार्य, मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन परीक्षेसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे सूचना. परीक्षा उपकेंद्रावर आरोग्य पथक आवश्यक साहित्यासह नेमणूक करणे. परीक्षा कालावधीत परीक्षा उपकेंद्रावरील विद्युत वितरण खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी. परीक्षा उपकेंद्राचे अंतर लक्षात घेऊन शहरात जादा सिटी बसची व्यवस्था करावी. जेणेकरुन सर्व परीक्षार्थी यांना वेळेवर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे शक्य होईल, अशीही सुचना देण्यात आली.   
00000

No comments:

Post a Comment