Monday, April 3, 2017

जिल्ह्यात 1 जूनपासून खतविक्री ऑनलाईन पद्धतीने
            नांदेड दि. 3 :- विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यास थेट खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु झाल्यानंतर आता खत खरेदीही ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात खत विक्रेत्यांना पॉईट ऑफ सेल (पीओएस) मशीन देण्यात येणार असून खत खरेदी करताना शेतकऱ्याच्या बोटाचा ठसा घेऊन आधारकार्ड नंबर नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्याने बिलाची रक्कम अदा करुन खत खरेदी करायचे आहे. त्यानंतर ही नोंद पीओएस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय सर्व्हरवर नोंद होणार आहे. त्यानुसारच खतांवर देण्यात येणारे अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्याना देण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा दुरुपयोग टाळता येणार असून राज्यात 1 जून 2017 पासून या पध्दतीचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
अशा प्रकारे कार्यवाहीचा प्रायोगिक प्रकल्प शासनाने नाशिक रायगड जिल्हयात राबविला होता. देशातील 16 जिल्हयात राबविण्यात आलेल्या या प्रायोगिक प्रकल्पात महाराष्ट्रातील या दोन जिल्हयांचा समावेश होता. तेथे हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता 1 जून 2017 पासून संपूर्ण राज्यभरातच या पध्दतीने खताची विक्री करण्यात येणार आहे.
रासायनिक खतांवर केंद्र शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा दुरुपयोग टाळावा तसेच शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ व्हावा, यासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, किरकोळ खत विक्रेत्यांना याबाबत प्रशिक्षण देऊन पीओएस (पॉईंट ऑफ सेल) हे मशीन देण्यात येणार आहे. त्यानुसार खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्षात माहिती शासनाला मिळणे सोपे होणार आहे.
 या पध्दतीने खताची विक्री करताना किंवा शेतकऱ्याने खत खरेदी करताना शेतकऱ्याला आधारकार्ड असणे आवश्यक आहे. कारण पीओएस मशिनवर संबंधीत शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा घेऊन त्याचा आधारकार्ड नंबर नोंद करायचा आहे. त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्याला खताची विक्री होणार आहे.नंतर त्या शेतकऱ्याने खताच्या खरेदीची रक्कम अदा करायची आहे.
रासायनिक खत विक्री करीता थेट लाभ हस्तांतरण (DBT) 1 जून 2017 पासून राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  यांच्या अध्यक्षतेखाली  रासायनिक खत उत्पादक प्रतिनिधी, खत विक्रेते यांची  बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार रासायनिक खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी यांचीही बैठक झाली. त्यानंतर आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी तालुकास्तरीय अधिकारी यांचा आढावा घेऊन तालुकास्तरीय प्रशिक्षण, तालुका जिल्हास्तरावर कक्षाची स्थापना करुन हा प्रकल्प जिल्हयात यशस्वीरीत्या राबविण्याबाबत कृषि विभागास सूचना दिल्या. जिल्हयातील घाऊक खत विक्रेते, रासायनिक खत उत्पादक प्रतिनिधी, तालुकास्तरीय कृषि अधिकारी यांना कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी रासायनिक खत विक्री करीता थेट लाभ हस्तांतरण (DBT) बाबत सविस्तर माहिती दिली. हा प्रकल्प जिल्हयात यशस्वीरित्या राबविला जाईल या बाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले.
            बैठकीस मोहीम अधिकारी ए.जी. हंडे, जिल्हा कृषि अधिकारी (सा.) ए.एल.शिरफुले, नांदेड जिल्हा कृषिनिविष्ठा विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, विपीन कासलीवाल तसेच तालुका स्तरीय घाऊक खत विक्रेते, खत कंपनी प्रतिनिधी, तालुका स्तरीय कृषि अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

00000
मंत्रालयात अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
     
  मुंबई दि. 3 :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लॅपदेऊन आज माहिती व जनसंपर्क महासंचानलयाच्या अत्याधुनिक दृकश्राव्य  स्टुडिओचे उदघाटन केले. 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या कार्यकक्षा उत्तमरीत्या विस्तारल्या असून स्टुडिओमुळे महाराष्ट्रातील जनतेशी थेट संवाद साधणे शक्य झाले आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह, संचालक प्रशासन अजय अंबेकर, संचालक वृत्त देवेंद्र भुजबळ, संचालक माध्यम समन्वय शिवाजी मानकर यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अत्याधुनिक स्टुडिओची निर्मिती केली आहे. या स्टुडिओमुळे  सर्व सामान्य जनतेला आपले प्रश्न शासनापुढे मांडण्यासाठी तसेच शासनाला आपले काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सशक्त असे दृकश्राव्य संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
         नवीन स्टुडिओ मध्ये आत २४ व मंत्रालय गेटबाहेर १६ कनेक्टिव्हिटी  पोर्टस् उपलब्ध करून  देण्यात आले आहेत.. त्यामुळे इतर वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅनसना इनपूट देणे शक्य होईल.  जयमहाराष्ट्र दिलखुलास हे महासंचालनालयाचे कार्यक्रम मंत्रालयातच ध्वनीचित्रमुद्रित करणे या स्टुडिओमुळे शक्य होणार आहे. स्टुडिओत क्रोमा, क्रु टेक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला आहे.
माहिती जनसंपर्ककडून नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी
       
आपल्या प्रास्ताविकात महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यावर्षी डिजिटल आणि व्हिज्युअल प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित केले आहे. ट्व्टिर , फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक समाज माध्यमांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा कार्य विस्तार झाला आहे.  आजमितीस महासंचालनालयाचे १०,५०० हून अधिक ट्व्टिर फॉलअर्स आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून सध्या २८ लाख लोकांना मोबाईल संदेशद्वारे शासनाचे निर्णय व बातम्या यांची माहिती पाठवली जाते.  लवकरच हा डेटाबेस १ कोटी पर्यंत वाढवण्याचा महासंचालनालयाचा मानस आहे.  मुंबईत डिजीटल होर्डिंग्जसुराज्य रथ यासारखे नवीन उपक्रम  महासंचालनालय हाती घेणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील चित्रपटाची निर्मिती यावर्षी पूर्ण करण्यात येईल. महासंचालनालयाने डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टिमही सुरु केली असल्याने विषयवार बातम्या आणि लेख यांचा संग्रह करणे, शोध घेणे आता शक्य होईल, असेही ते म्हणाले. 
मी मुख्यमंत्री बोलतोयया कार्यक्रमातून जनतेशी साधल्या जाणाऱ्या संवादासाठी राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. केवळ  चार दिवसात १८ हजार प्रश्न व्हॉटसॅपवर तसेच १२५० प्रश्न ईमेल वर प्राप्त झाले असल्याचेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह यांनी  यावेळी मुख्यमंत्र्यांना मी मुख्यमंत्री बोलतोयया कार्यक्रमाचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौफेर कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी  चित्रफीत ही दाखवण्यात आली.

००००
दारु दुकाने आज बंद
नांदेड दि. 3 :-  जिल्ह्यात श्री रामनवमी उत्सव मंगळवार 4 एप्रिल 2017 रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेचा राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी मंगळवार 4 एप्रिल रोजी रामनवमी साजरी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4 व एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईलयांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

00000
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
बुधवारी प्रा. हांडे यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय धिकारी यांच्यावतीने उज्ज्वल नांदेड" माहिमेअतंर्गत बुधवार 5 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5 वा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये  डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे "मराठी व्याकरण, कायदा व राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षेची तयारी" या विषयांवर औरंगाबाद येथील विषयतज्ज्ञ प्रा. कपील हांडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, नांदेड मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी विविध स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराउपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...