Saturday, November 13, 2021

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 753 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 441 एवढी झाली असून यातील 87 हजार 761 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 27 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, धर्माबाद 1 असे एकुण 4  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 27 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 27 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 63 हजार 186

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 59 हजार 356

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 441

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 761

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-27

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 पोलीस शिपाई भरती परीक्षा केंद्र

परिसरात कलम 144 लागू 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- मुंबई शहर पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यात 23 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये याबाबत आदेश निर्गमीत केले आहेत. 

या परीक्षा केंद्रापासून 100 मिटरच्या परिसरात रविवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यात  शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती  अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात 16 नोव्हेंबर 2021 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून 30 नोव्हेंबरच्या 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत.   

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना या आदेशात नमूद असलेल्या कृत्ये सार्वजनिक परिसरात किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी तसेच परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी सभा, मिरवणुका मोर्चा, काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलिस अधिक्षक नांदेड यांना प्राधिकृत केलेल्या इतर पोलिस अधिकारी यांना राहतील.

00000

 राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 13 : राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2019-20 साठी नामांकन अर्ज / प्रस्ताव हे  https://innvate.mygov.in/national-youth-award-2020/ या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाने केले आहे. ज्या व्यक्तींना नामांकनासाठी अर्ज सादर करावयाचा आहे त्यांनी प्रथम तो प्रस्ताव ऑनलाईन भरावयाचा आहे. हे नामांकन केंद्र शासनाकडे 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अचूक भरुन पाठवावेत. या प्रस्तावाच्या दोन सारख्या प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

0000

 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

सोमवार 15 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबई  येथून खासगी विमानाने सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने जुना मोंढा पुर्णा जिल्हा परभणीकडे प्रयाण करतील. परभणी येथून मोटारीने नांदेड विमानतळ येथे सायं 7.15 वा. आगमन व खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. 

00000

 वंचित घटकापर्यंत शासकीय योजना पोहचवणे हे न्यायदानाचेच प्रतीक 

-  प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर   

नांदेड (जिमाका) दि. 13 :- तळागाळातील वंचित असलेल्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचवण्या पाठिमागचा उद्देश हा एक प्रकारे त्यांना न्याय उपलब्ध करुन दिल्या सारखाच असतो. सर्वांगीण विकासाच्या परिभाषेत न्यायाच्याही परिघात सामावून घेणे हे अभिप्रेत असल्याने मांडवी येथे संपन्न होणारा हा शासकीय योजनांचा महामेळावा खऱ्या अर्थाने अत्यंत गरजेचा व मौलाचा असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर यांनी केले. 

तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या आदिवासी किनवट तालुक्यातील मांडवी येथे आझादी का अमृत महोत्सवांतर्गंत वैशिष्टपूर्ण कायदेविषयक साक्षरतेचा जागर व शासकीय योजनांचा महामेळाव्याच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते.   

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर किनवट शंकर अंभोरे, सहदिवाणी न्यायाधीश विजय परवारे, उपजिल्हाधिकारी श्रीमती दिपाली मोतीयाळे, तालुकादंडाधिकारी मृणाल जाधव व जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमूख  यावेळी उपस्थित होते. 

न्यायालयामध्ये येणाऱ्या बहुतांश प्रकरणांमध्ये शासकीय पातळीवर निर्माण झालेले तंटे असतात. न्यायालयात हे तंटे आम्ही मिटवतो. या पार्श्वभूमीवर विचार करता शासकीय योजनांच्या अशा महामेळाव्या सारख्या उपक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या माध्यमातून शासनाच्या सर्व विभागांना एकत्र आणून परस्पर समन्वय व समाधानातून लोकांना योजना उपलब्ध करुन दिल्या जात असल्याबद्दल अधिक समाधान असल्याचेही प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी स्पष्ट केले. 

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध विभागाच्या मदतीने हाती घेतलेल्या कायदेविषय साक्षरतेच्या उपक्रमांद्वारे 18 लाख लोकांपर्यंत आम्हाला पोहोचता आले यात 560 कृतीगट, वकील व 2 हजार 15 लोकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत आम्हाला पोहचता आले. यात ग्रामसेवकापासून ते विधी स्वयंसेवकांपर्यंत सर्वांचाच सहभाग महत्त्वपूर्ण होता. हा महामेळावा शासकीय योजनांचा जरी असला तरी अत्यप्रत्यक्षरित्या यात कायदेविषयक साक्षरतेची भूमिका अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.   

राज्याच्या सिमेवर असलेल्या अतिदुर्गम भागातील मांडवी येथे हा महामेळावा घेण्याचा उद्देश मुख्यालयाला मांडवी येथे उपलब्ध करुन देणे असा आहे. चार तासाच्या अंतरावर मुख्यालय गाठून शासन पातळीवरील आपले प्रश्न निस्तारण्यापेक्षा आपणच लोकांच्या मदतीसाठी मांडवी येथे जाऊन ही सुविधा या महामेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता आली, याचा सर्वांनाच आनंद आहे. येथील लोकसहभाग लक्षात घेता हा उपक्रम राज्यातील एक आदर्श मॉडेल म्हणून नावारुपास आला असे म्हणले तर वावगे ठरू नये या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी गौरव केला. 

विधी व न्याय विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, शिक्षण विभाग आणि मिडिया यांच्या समन्वयामुळे हा आदिवासी भागातील मांडवीच्या प्रांगणात शासकीय योजनांचा हा संगम झाल्याचेही त्यांनी सांगितले. आज सुमारे 1 हजारपेक्षा अधिक लाभार्थी यांना शासन स्तरावर असलेल्या त्यांच्या गरजेच्या सेवांची उपलब्धता करुन देता आली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

रोजगाराच्या शोधात इतर राज्यात जाऊन विस्थापीत होणाऱ्या या भागातील लोकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करुन देता यावा यासाठी हा उपक्रम आपण घेतला आहे. याचबरोबर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा तत्पर व तात्काळ मिळाव्यात याचेही नियोजन आम्ही केले असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी सांगितले. किनवट सारख्या आदिवासी भागातील मुला-मुलींचेही डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी गतवर्षापासून आपण खाजगी क्लासेसची मदत घेऊन इथल्या मुलांची नीट परीक्षेची तयारी करुन घेत आहोत. पहिल्याच वर्षी या भागातील 4 विद्यार्थी नीट परीक्षेत पात्र झाले असून इतर विद्यार्थ्यांतही मोठा आत्मविश्वास बळावल्याचे त्यांनी सांगितले. 

उपजिल्हाधिकारी श्रीमती दिपाली मोतीयाळे, तहसिलदार मृणाल जाधव यांचेही यावेळी समयोचित भाषणे झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील युवा-युवतींनी कायदेविषयक साक्षरतेवर पथनाट्य सादर करुन जनजागृती केली. यावेळी पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे साहित्य व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

000000





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...