Thursday, December 22, 2022

भक्तीमय वातावरणात माळेगाव यात्रेस प्रारंभ

 

भक्तीमय वातावरणात माळेगाव यात्रेस प्रारंभ

 

§  कोरोनाचे नवे आव्हान लक्षात घेत

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लसीकरणासाठी दिले निर्देश

§  कोरोना लसीकरणासाठी विशेष केंद्राची व्यवस्था

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्रातील लोक संस्कृतीच्या उपासकांचा, भक्तीचा आणि श्रध्देचा महामेळा म्हणून गणल्या गेलेल्या माळेगाव यात्रेचा आज मान्यवरांच्या हस्ते विधीवत पुजा करुन प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक श्री खंडोबाची पुजा करुन दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, प्रणितीताई देवरे- पाटील व मान्यवरांनी खंडोबाचे दर्शन घेवून भाविकांना शुभेच्छा दिल्या.

 

लम्पी समवेत नव्याने कोरोनाचे आव्हान येवू घातले आहे. सद्यपरिस्थितीत  चिंतेचे कारण जरी नसले तरी मागच्या अनुभवावरुन काळजी घेण्याशिवाय गत्यंतर नाही. यावर लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे सिध्द झाले आहे. हे लक्षात घेता अधिकाधिक लसीकरण व्हावे यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असून माळेगाव येथे कोरोना लसीकरणाचे कक्ष सुरु करण्यात येत आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाला निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.  नागरिकांनी स्वयंस्फूर्त पुढे येवून लसीकरणावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.




 

यात्रेचे आजवरचे वैभव लक्षात घेवून जिल्हा परिषदेने यात्रेसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यात पाणी, उर्जा, आरोग्य यावर विशेष लक्ष दिले आहे. लम्पी आजारामूळे गो वंशीय पशुधनावर बंदी घातली असून त्याबाबत काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तथापि इतर पशुधनासाठी याठिकाणी 24 तास वैद्यकीय सुविधा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर भाविकांच्या आरोग्याबाबतही काळजी घेण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या सेवाही तत्पर ठेवल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  संदीप माळोदे यांनी दिली.


 

यावेळी भाविकांनी शिस्तीत रांगेत राहून खंडोबाचे दर्शन घेतले. दोन वर्षाच्या खंडानंतर सुरु झालेल्या यात्रेमुळे जागोजागी चैतन्य पाहावयास मिळाले. बेल-फुल, भंडाऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष यांने मंदिर परिसर निनादून गेला. देवस्वारी आणि पालखीची नगर प्रदक्षिणा मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर आली. खंडोबाच्या देवस्वारीची पुजा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी करुन दर्शन घेतले. परंपरेनुसार रिसनगावचे पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक यांच्यासह इतर मानकऱ्यांचा फेटा बांधून जिल्हा परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला.



 

जिल्हा परिषदेच्यावतीने याठिकाणी लोककल्याणकारी योजनांचे विविध स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कृषि विभाग, पशुसंवर्धन, समाज कल्याण व इतर विभागांचा समावेश आहे. या यात्रेत आश्व, श्वान, कुक्कुट व इतर प्राण्यांची संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यात्रा कालावधीत 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभाग सतर्क ठेवण्यात आला आहे. 

0000 

 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...