Friday, June 19, 2020

वृत्त क्र. 556


21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस
साजरा करण्यासाठी सर्वांनी घ्यावा पुढाकार 
नांदेड (जिमाका) दि. 19 :- संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणाऱ्या योग विद्येची भारताने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. सदृढ आरोग्यासाठी सहज साधा व कोणताही खर्च न लागणारा योगा सारखा उपाय नाही. मानवाच्या शाररिक व आत्मिक विकासासाठी योग विद्या अत्यंत सहाय्यभूत असून याच्या प्रचार व प्रसारासाठी सर्व संस्थांनी पुढाकार घेऊन रविवार 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 या कालावधीत योग दिवस साजरा करावा, असे आवाहन आयुष संचालनालय महाराष्ट्र शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.   
योग दिवसानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करतांना कोरोना विषाणु संदर्भात शासनाने दिलेल्या सूचना व निर्देशाचे तंतोतंत पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यात खालील कार्यक्रमाचे नियोजन करता येईल.
योगा तज्ज्ञ / एनजीओ यांचे मार्गदर्शनाखाली ऑनलाईन योगा व्याख्यान कार्यशाळेचे आयोजन करावे. महाविद्यालयातील स्वस्थवृत्त विभागामार्फत, महाविद्यालय व रुग्णालयातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे 15 दिवसांचे प्रति दिवशी 1 तास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. योगा या विषयावर महाविद्यालय व रुग्णालयातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग नोंदवून प्रश्न मंजुषा, रांगोळी, चित्रकला, भित्तीपत्रके आदी स्पर्धेचे आयोजन करावे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे बॅनर महाविद्यालयाचे दर्शनी स्थळावर लावण्यात यावे.  
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने सामाजिक अंतर तसेच मास्क लावण्याच्या व आवश्यक काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. याबाबत शासनाने दिलेले निर्देश, सुचनांचे पालन करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावयाचा आहे. यासाठी संस्था / सुचनांचे पालन करुन आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करावयाचा आहे. याकरीता आपले संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच संस्थेचे आजूबाजूचे परिसरातील जनतेला व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल सारख्या मोबाईल, संगणकीय ॲप या सारख्या अन्य ऑनलाईन पद्धतीद्वारे संपर्क साधून 21 जून 2020 रोजी सकाळी 7 वा. कॉमन योगा प्रोटोकॉलचे मार्गदर्शक तत्वानुसार योगाचे ऑनलाईन प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. जेणेकरुन सदर घरातून सुद्धा सहभागी होतील.
त्याचप्रमाणे केंद्र शासनाने आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्ताने माय लाईफ, माय योगा या व्हिडिओ ब्लॉगिंग काँन्टॅस्टचे आयोजन केले आहे. त्यानुसार सदर ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच संस्थेच्या आजूबाजूच्या परिसरातील जनतेला या ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता प्रोत्साहन देण्यात यावे. https://yoga.ayush.gov.in/yoga/idy-2020 https://www.mylifemyyoga2020/home या संकेतस्थळावर नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. जेणेकरुन सर्व सहभागी घरुनच या कार्यक्रमामध्ये सहभागी होती. तसेच सदरहून कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरोना या विषाणुचे प्रतिबंधानाकरिता शासनाने दिलेल्या सुचना / निर्देशांचे पालन करावे व त्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मुंबई आयुष संचालनालयाचे संचालक वैद्य कुलदीप राज कोहली यांनी कळविले आहे.  
000000

माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे 14 जुलै रोजी वितरण
 पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित
प्रथम विजेत्यास पाच लाख रूपयेप्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह
मुंबई दि. 19-  भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येत्या 14 जुलै रोजी जलसंपदाजलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपयेप्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाईल.
            'पाणी अडवापाणी जिरवा'ची संकल्पना अंमलात आणणारे तसेच जलसंस्कृतीचे जनक म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येणाऱ्या माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जलसंधारणजलसंपदा व पाणी पुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्व. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाला 5 लाख रूपये व प्रशस्तीपत्रस्मृतीचिन्हद्वितीय क्रमांकासाठी 3 लाखप्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी 2 लाखप्रशस्तीपत्रस्मृतीचिन्ह असे स्वरुप आहे.  या पुरस्काराचे वितरण माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण यांच्या जन्मदिनी येत्या 14 जुलै, 2020 रोजी करण्यात येणार आहे.
            या पुरस्काराच्या निवडीसाठी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिवग्रामविकासपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिवकृषी विभागाचे प्रधान सचिवलाभक्षेत्र विकासचे सचिवयशदामधील जलसाक्षरता केंद्राचे संचालकजलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (पा.)जलसाक्षरता केंद्राने निवडलेले दोन जलनायक यांचा समावेश असून जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकासचे उपसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.
            या पुरस्कार समारंभाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतील जलसाक्षरता केंद्राच्या मार्फत होणार असून त्यांच्यामार्फत पुरस्काराची नामांकने मागविण्यात येणार आहेत. या संबंधीचा शासन निर्णय 12 जून रोजी काढण्यात आला आहे.
0000

वृत्त क्र. 555   
सहा महिन्यांच्या बालकासह 4 व्यक्ती 
कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी
 नवीन एक पॉझिटिव्ह 
नांदेड (जिमाका) दि. 19 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील सहा महिन्याचा एक बालक बरा झाला असून डॉ. पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 4 बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 186  व्यक्तींना ते कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड शहरातील सुंदरनगर येथील 23 वर्षाचा एक पुरुष पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 297 एवढी झाली आहे.  
जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 48 अहवालापैकी 47 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात 98 बाधितांवर औषधोपचार चालू असून त्यातील त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52  54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात 98 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 61, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 6 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शुक्रवार 19 जून रोजी 87 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 751,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 604,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 888,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 1,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 297,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 232,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 91,
मृत्यू संख्या- 13,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 186,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 98,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 87 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000

वृत्त क्र. 551


सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी
नांदेड जिल्ह्याचा लवकरच मास्टर प्लॅन
- पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील कुठलाही गोरगरिब अन्न धान्यावाचून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे. शासनातर्फे यासाठी लागणाऱ्या अन्न-धान्याचा मुबलक प्रमाणात जो पुरवठा  झाला आहे त्याची गुणवत्ता टिकून राहण्याकरीता गोदाम व्यवस्थाही अधिक परिपूर्ण कशी करता येईल याचा तालुकानिहाय समतोल आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची आढावा बैठक आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाली. याबैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी आर. के. परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या लक्षात घेता अन्न-धान्य पुरवठा व सुरक्षिततेच्यादृष्टिने शासकीय गोदामे तेवढीच समतोल असली पाहिजेत. एकाच तालुक्यात शासकीय गोदामांची संख्या जर अधिक झाली तर अन्न-धान्याच्या वाहतुकीसह अनेक प्रश्न निर्माण होतील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. आजच्या घडीला जिल्ह्यात गोदामाची असलेली संख्या व प्रत्येक तालुक्यातील समतोल यादृष्टिने जिल्ह्याला एका परिपूर्ण मास्टर प्लॅनची गरज आहे. भविष्यातील प्रश्नाचा वेध घेऊन याचे अधिक चांगले नियोजन करा. साखरेच्या भावाबाबतही मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. ही तफावत दूर झाली पाहिजे, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अनेक गैरप्रकार निर्माण झाले. गोरगरिबांच्या तोंडाचा घास जर कोणी हिरावून घेत असेल तर दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जिल्ह्यातील काही तालुक्यात मका आणि हरभरा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याच्या साठवणुकीसाठी तेवढीच सक्षम गरज आहे. भोकर तालुक्यात मक्याच्या साठवणुकीसाठी गोदामची गरज असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.  
दृष्टिपथात योजना निहाय लाभार्थी
जिल्ह्यात सद्यस्थितीत पाच योजना कार्यान्वित आहेत. यात प्राधान्य कुटूंब योजनेचे 4 लाख 9 हजार 188 संख्या असून 18 लाख 32 हजार 869 लोकसंख्या आहे. अंत्योदय अन्न योजनामध्ये 78 हजार 388 कार्ड संख्या असून यातील 3 लाख 36 हजार 583 लोकसंख्या आहे. या दोन्ही योजनेतील कार्डधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू आहे. एपीएल शेतकरी योजनेत 98 हजार 500 कार्डधारकांची संख्या असून यातील 4 लाख 23 हजार 560 लोकसंख्या आहे. एपीएल (एनपीएच) मध्ये 41 हजार 612 कार्डसंख्या असून यातील लोकसंख्या 2 लाख 22 हजार 950 एवढी आहे. आत्मनिर्भर भारत शिधापत्रिका धारक लाभार्थीमध्ये कार्डधारकांची संख्या 42 हजार 55 असून यातील लोकसंख्या 2 लाख 24 हजार 528 एवढी आहे.
या सर्व लाभार्थींना त्यांना प्रतिव्यक्ती मंजूर असलेल्या धान्याचे वाटप वेळेत झाले पाहिजे. यात जर कोणी स्वस्तधान्य दुकानदार चुकत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना दिल्या. 
0000000



वृत्त क्र. 554   
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड (जिमाका) दि. 19 :-  जिल्ह्यात शुक्रवार 3 जुलै 2020 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात 19 जून 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 3 जुलै 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


वृत्त क्र. 553           
पीक कर्ज मागणी नोंदणीस
30 जून पर्यंत मुदतवाढ
            नांदेड (जिमाका) दि. 19 :-   खरीप पीक कर्ज हंगामात जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणीसाठी मंगळवार 30 जून 2020 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. पीक कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी नमूद संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
            कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशात संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन 2020-21 या खरीप हंगमात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link या संकेतस्थळावर ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27 मे 2020 हा कालावधी दिला होता. या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार 530 शेतकऱ्यांनी ऑनलाईन संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदविली आहे. पीक कर्ज मागणी नोंदणी याद्या व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँक शाखेस पाठविण्यात आली आहे. खरीप पीक कर्ज हंगामात जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मंगळवार 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
00000


वृत्त क्र. 552   
सवलतीच्या वाढीव गुणासाठी
प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
            नांदेड (जिमाका) दि. 19 :-  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस सन 2019-20 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू तसेच एनसीसी, स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांनी सवलतीच्या वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास गुरुवार 25 जून 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सूचित केले आहे की, शासन निर्णय 20 डिसेंबर 2018 नुसार इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतचे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे सादर करण्याची निर्धारित मुदत 30 एप्रिल पर्यंत देण्यात आली होती.  
              तथापि केंद्र व राज्य शासनाद्वारे कोरोना (कोविड 19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे खेळाडूंचे गुण प्रस्ताव तसेच एनसीसी, स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव संबंधीत जिल्हा क्रिडा अधिकारी यांना सादर करण्यास 20 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर होऊ शकलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात लोकप्रतिनिधी व खेळाडू संघटना यांनी मंडळाकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
            त्याअनुषंगाने शासन निर्णय 15 जून 2020 अन्वये संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना खेळाडू विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात 20 जून 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यास व संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन 25 जून 2020 पर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशींसह सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. तसेच एनसीसी व स्काऊट गाईड प्रस्तावाबाबतही या वाढीव मुदतीप्रमाणे कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय केवळ सन 2019-20 या एका शैक्षणिक वर्षाकरीता लागू राहिले. तसेच सदर मुदतवाढ ही अंतिम असून निकाल वेळेवर लावण्याच्यादृष्टिने यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
            मार्च 2020 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 बी परीक्षेस प्रविष्ठ सर्व खेळाडू, एन.सी.सी., स्काऊट गाईड यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी. कोणताही पात्र विद्यार्थी या गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...