Thursday, January 24, 2019


शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
सी.एन.सी. प्रोग्रामिंगवर प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड, दि. 24 :- प्राध्यापकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करुन घेणे आवश्यक असून  प्रशिक्षणातून याबाबी शिकावयास मिळतात, असे प्रतिपादन डॉ. व्ही. एम. नांदेडकर यांनी केले.  
राज्यातील तंत्रनिकेतनमधील यंत्र अभियांत्रिकी अध्यापकांसाठी आयोजित शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील यंत्र अभियांत्रिकी विभागाने सी.एन.सी. प्रोग्रामिंगवर आधारित एक आठवडयाचे प्रशिक्षणाचे उद्घाटन डॉ. नांदेडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही गर्जे हे होते.
डॉ. गर्जे यांनी नव अभ्यासक्रमाची गरज पाहता शिक्षकांच्या निरंतर प्रशिक्षणाची आवश्यकता ओळखून हे प्रशिक्षण आयोजित केले असे सांगितले. प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यंत्र अभियांत्रिकी विभागाने पुढाकार घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षणाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे प्राचार्यांचे डॉ. नांदेडकर यांनी अभिनंदन केले.
राज्यातील गडचिरोली, ठाणे, वाशिम, यवतमाळ, उस्मानाबाद या विविध शासकीय तंत्रनिकेतन, मधील प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे. आठवडयाभरात तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने विविध प्रकारच्या सी.एन.सी. मशिनवर आधारित प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रास्ताविक समन्वयक यंत्र विभाग प्रमुख प्रा. आर. एम. सकळकळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एस. ए. कुलकर्णी केले. शेवटी आभार डॉ. एस. एस. चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्र विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाने आपले योगदान दिले.     
0000000


26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी कालावधीत
लोकशाही पंधरवडाचे आयोजन
नांदेड, दि. 24 :-  प्रत्येक निवडणुकांमध्‍ये मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावावा. तसेच लोकशाही निवडणूक आणि सुशासन याविषयाच्‍या अनुषंगाने स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था व महाविद्यालयांनी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रम घेऊन लोकशाही पंधरवाडा यशस्‍वी करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.  
भारतीय संविधानातील 73 व 74 व्‍या घटनादुरुस्‍तीस 25 वर्षे पुर्ण झाल्‍याच्‍या निमित्‍ताने नोव्‍हेंबर 2017 पासुन लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय परीषदेचे नियोजन करण्‍यात आलेले होते. त्‍याअनुषंगाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्‍याचे निर्देश राज्‍य निवडणुक आयोगाने दिले आहेत. 
        विविध प्रयत्‍नाने आपली लोकशाही अधिकाधिक मजबुत करणे, लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणाऱ्या राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधीचे 150 वे जयंती वर्ष आहे. त्‍यांच्‍या स्‍वप्‍नाची पुर्तता करणाऱ्या 73 व्‍या व 74 व्‍या घटना दुरुस्‍तीचे रौप्‍य महोत्‍सव वर्षानिमित्त यावर्षात व पुढील सर्व निवडणुकात मतदारांचा राष्‍ट्रीय कर्तव्‍य भावनेतून सहभाग कसा वाढवता येईल याबाबत लोकशाही पंधरवाडयात 26 जानेवारी च्‍या मुख्‍य ध्‍वजारोहण कार्यक्रमामध्‍ये चित्ररथ तयार करुन त्‍याचे सादरीकरण करण्‍यात येणार आहे. ध्‍वजारोहणास उपस्थित प्रमुख वक्‍त्‍यांच्‍या भाषणात सदरील विषय अंतर्भुत करण्‍यात आला आहे. तसेच मतदारांना मतदानासाठी प्रोत्‍सा‍हीत करणे, मतदान टक्‍केवारी वाढविण्यासाठी विविध उपाय योजना करण्‍यात येत आहेत. तसेच जिल्‍ह्यातील विविध महाविद्यालयात या पंधरवाड्याच्‍या कालावधीत निबंध स्‍पर्धा, वकृत्व स्‍पर्धा आदी स्‍पर्धा स्‍वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड मार्फत आयोजीत करण्‍यात येणार आहेत. त्‍याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना या स्‍पर्धांमध्‍ये  मोठया प्रमाणावर सहभाग नोंदविण्‍याबाबत नांदेड जिल्‍हा प्रशासनामार्फत आवाहन करण्‍यात आले आहे.
मतदार जनजागृतीबाबत जिंगल्‍स तयार करुन त्‍या आकाशवाणी केंद्रावरुन 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत सर्वत्र प्रक्षेपित करण्‍यात येणार आहेत. महानगरपालीका व जिल्‍हा परीषद कार्यक्षेत्रात पोस्‍टर्स, बॅनर्स तयार करुन पंधरवाडयाची व्‍यापक प्रसिद्धी करण्‍यात आली आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त
आज रॅलीचे आयोजन 
नांदेड दि. 24 :- नऊ वा राष्‍ट्रीय मतदार दिवस शुक्रवार 25 जानेवारी 2019 रोजी साजरा करण्‍यात येणार असून सकाळी 7 वा. मोटार सायकल / मोपेड रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे. या रॅलीस मान्‍यवरांचे हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून महात्‍मा फुले पुतळा आयटीआय येथुन सुरुवात करण्‍यात येणार आहे.  
            या रॅलीचा मार्ग महात्‍मा फुले पुतळा–आय टी आय –गणेशनगर वाय पॉईंट – मोरचौक -छत्रपती चौक राज कॉर्नर - वर्कशॉप कॉर्नर –आनंदनगर- हिंगोली गेट -शहीद भगतसिंग मार्ग -बाफना -जुना मोंढा टॉवर–शिवाजीनगर- महात्मा फुले पुतळा ते डॉ. शंकरराव चव्‍हाण पेक्षागृह असा राहील. या रॅलीचा समारोप व राष्‍ट्रीय मतदार दिनाचे मुख्‍य कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्‍यात आले आहे. या राष्‍ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात जास्‍तीत जास्‍त नगरिकांनी / नव मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा‍ निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


प्रजासत्ताकदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा
वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 24 :- येत्या 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करु नये, असे आवाहन राज्यशासनातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले असतात. हे राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी हे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या कार्यरत आहेत. शासनाने प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरु केली आहे. प्लास्टिक बंदीचा कायदा लागू केला आहे. प्लास्टिकची वस्तू वापरल्यास दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे  प्लास्टिकचे ध्वज न वारण्याबाबत शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था यांनी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ध्वजाचा योग्य सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
00000

प्रजासत्ताक दिनानिमित्त
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 24 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार 26 जानेवारी 2019 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000

पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड, दि. 24 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
शुक्रवार 25 जानेवारी 2019 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने रात्री 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार 26 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9.15 वा. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस मुख्यालय क्रिडांगण नांदेड. सकाळी 10 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने हानेगाव ता. देगलूरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. हानेगाव तलावाची पाहणी. दुपारी 1 वा. मरखेल तलावाची पाहणी व मरखेल येथून शासकीय वाहनाने देगलूरकडे प्रयाण. दुपारी 1.20 वा. आमदार सुभाष साबणे यांचे निवासस्थान शिवनेरी देगलूर येथे आगमन व राखीव.  दुपारी 2.15 वा. देगलूर, बिलोली व मुखेड येथील दुष्काळग्रस्त भागांची आढावा बैठक स्थळ- तहसिलदार कार्यालय देगलूर. दुपारी 3 वा. देगलूर येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.30 वा. नांदेड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायं. 6 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


माध्यमांचा सकारात्मक दृष्टिकोण
विकासाचा मार्ग प्रशस्त करेल
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
पत्र सूचना कार्यालय मुंबईतर्फे वार्तालाप कार्यक्रमाचे नांदेड येथे आयोजन  

नांदेड, दि. 24 :- सरकारी योजना आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात माध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोण ठेवून वार्तांकन केल्यास विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त होऊ शकतो असा विश्वास नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केला. पत्र सूचना कार्यालय मुंबई द्वारा नांदेड येथे आज माध्यम कार्यशाळा (वार्तालाप) आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे आवर्जून उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यासह राज्यातील जलयुक्त शिवार, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, कॅन्सरमुक्त नांदेड आदि विविध विकासात्मक योजनांचा आढावा श्री डोंगरे यांनी यावेळी घेतला. अस्वच्छता ही अनेक आजारांचे मूळ असल्याचे सांगत स्वच्छतेसाठी प्रबोधन करण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर याकामी प्रशासनाला सक्रिय सहयोग करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सुमारे साडेचार लाख शौचालये बांधण्यात आली असून गेल्यावर्षी पावणे दोन लाख शौचालये बांधण्याचा उच्चांक केला गेला असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वच्छतागृहांचा मुद्दा हा आरोग्याबरोबरच शिक्षणाशीही निगडीत आहे. मुलींमध्ये शाळा सोडण्याच्या अनेक कारणांपैकी स्वच्छतागृहांचा अभाव हा एक प्रमुख मुद्दा असल्याचा एका अहवालात उल्लेख आहे, असेही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यामध्ये एक लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट असून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आतापर्यंत 80 हजार घरांसाठी पहिला हप्ता दिला गेला आहे. अर्धापूर तालुक्यातील लहान गावात या योजनेअंतर्गत चांगली घरकुले बांधण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कॅन्सरमुक्त नांदेड अभियानांतर्गत 261 जणांवर प्राथमिक स्तरावर उपचार करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
सनसनाटी, गुन्हेगारी आणि राजकीय विषयांनाच प्राधान्य न देता विकासात्मक बातम्यांनाही महत्व देणे गरजेचे असल्याचे सांगत या कार्यशाळेचे आयोजन ग्रामीण पत्रकारांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अभ्यास दौरे आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून योजनांची माहिती सरकारी प्रसिद्धी यंत्रणेने पत्रकारांपर्यंत पोहचवावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विकासात्मक पत्रकारीता ही एक व्यापक संकल्पना असून पत्रकारांमध्ये विकासाची संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत दै. प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी या कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले. विकसीत देश आणि विकसनशील देशांमध्ये विकासाचे प्रश्न आणि विकासामुळे होणारे प्रश्न वेगळे आहेत. सरकारी योजनांच्या साधक-बाधक अभ्यासानंतर भुमिका मांडणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. माहितीच्या अधिकारा सारख्या आयुधाचा नकारात्मक वापर टाळून योजनेच्या अंमलबजावणीसाठी याचा वापर करुन पत्रकारांनी लोकशिक्षणाचे कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन श्री. डोईफोडे यांनी केले.
इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक या नव्याने सुरु झालेल्या उपक्रमासह पोस्टाच्या अनेक उपक्रमांबद्दल नांदेड विभागाचे डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी कार्यशाळेतील उपस्थित पत्रकारांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी राज्य शासनाकडून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासह अन्य सुविधांची माहिती या कार्यशाळेत दिली. सहभागी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शंकाचे मान्यवरांनी निरसन केले. जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत कार्यालयातर्फे लोकराज्य अंकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजाविषयी पत्र सूचना कार्यालय, मुंबईचे सहायक संचालक, नितीन सप्रे यांनी या कार्यशाळेत सादरीकरणासह सविस्तर माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवून आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या.                                                     000000

  वृत्‍त क्र.   362 निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा नांदेड दि. १९ : मुंबई,...