Thursday, January 24, 2019


माध्यमांचा सकारात्मक दृष्टिकोण
विकासाचा मार्ग प्रशस्त करेल
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
पत्र सूचना कार्यालय मुंबईतर्फे वार्तालाप कार्यक्रमाचे नांदेड येथे आयोजन  

नांदेड, दि. 24 :- सरकारी योजना आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात माध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोण ठेवून वार्तांकन केल्यास विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त होऊ शकतो असा विश्वास नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केला. पत्र सूचना कार्यालय मुंबई द्वारा नांदेड येथे आज माध्यम कार्यशाळा (वार्तालाप) आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे आवर्जून उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यासह राज्यातील जलयुक्त शिवार, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, कॅन्सरमुक्त नांदेड आदि विविध विकासात्मक योजनांचा आढावा श्री डोंगरे यांनी यावेळी घेतला. अस्वच्छता ही अनेक आजारांचे मूळ असल्याचे सांगत स्वच्छतेसाठी प्रबोधन करण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर याकामी प्रशासनाला सक्रिय सहयोग करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सुमारे साडेचार लाख शौचालये बांधण्यात आली असून गेल्यावर्षी पावणे दोन लाख शौचालये बांधण्याचा उच्चांक केला गेला असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वच्छतागृहांचा मुद्दा हा आरोग्याबरोबरच शिक्षणाशीही निगडीत आहे. मुलींमध्ये शाळा सोडण्याच्या अनेक कारणांपैकी स्वच्छतागृहांचा अभाव हा एक प्रमुख मुद्दा असल्याचा एका अहवालात उल्लेख आहे, असेही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यामध्ये एक लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट असून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आतापर्यंत 80 हजार घरांसाठी पहिला हप्ता दिला गेला आहे. अर्धापूर तालुक्यातील लहान गावात या योजनेअंतर्गत चांगली घरकुले बांधण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कॅन्सरमुक्त नांदेड अभियानांतर्गत 261 जणांवर प्राथमिक स्तरावर उपचार करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
सनसनाटी, गुन्हेगारी आणि राजकीय विषयांनाच प्राधान्य न देता विकासात्मक बातम्यांनाही महत्व देणे गरजेचे असल्याचे सांगत या कार्यशाळेचे आयोजन ग्रामीण पत्रकारांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अभ्यास दौरे आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून योजनांची माहिती सरकारी प्रसिद्धी यंत्रणेने पत्रकारांपर्यंत पोहचवावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विकासात्मक पत्रकारीता ही एक व्यापक संकल्पना असून पत्रकारांमध्ये विकासाची संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत दै. प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी या कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले. विकसीत देश आणि विकसनशील देशांमध्ये विकासाचे प्रश्न आणि विकासामुळे होणारे प्रश्न वेगळे आहेत. सरकारी योजनांच्या साधक-बाधक अभ्यासानंतर भुमिका मांडणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. माहितीच्या अधिकारा सारख्या आयुधाचा नकारात्मक वापर टाळून योजनेच्या अंमलबजावणीसाठी याचा वापर करुन पत्रकारांनी लोकशिक्षणाचे कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन श्री. डोईफोडे यांनी केले.
इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक या नव्याने सुरु झालेल्या उपक्रमासह पोस्टाच्या अनेक उपक्रमांबद्दल नांदेड विभागाचे डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी कार्यशाळेतील उपस्थित पत्रकारांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी राज्य शासनाकडून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासह अन्य सुविधांची माहिती या कार्यशाळेत दिली. सहभागी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शंकाचे मान्यवरांनी निरसन केले. जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत कार्यालयातर्फे लोकराज्य अंकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजाविषयी पत्र सूचना कार्यालय, मुंबईचे सहायक संचालक, नितीन सप्रे यांनी या कार्यशाळेत सादरीकरणासह सविस्तर माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवून आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या.                                                     000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...