Wednesday, December 30, 2020

 

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात

ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 जानेवारीपर्यंत वाढ

नांदेड (जिमाका) दि. 30 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे. 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 31 ऑक्टोंबर 2020, 4, 15 व 28 नोव्हेंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 30 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

00000

 

 65 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 30 :- बुधवार 30 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 65 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 37 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 669 अहवालापैकी 894 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 425 एवढी झाली असून यातील 20 हजार 333 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 318 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 30 डिसेंबर रोजी लोहा तालुक्यातील देऊळ गल्ली येथील 83 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 573 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, हदगाव कोविड रुग्णालय 5, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, मुखेड कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.90 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 9, बिलोली तालुक्यात 1, देगलूर 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 4, नायगाव 11 असे एकुण 28 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, कंधार तालुक्यात 1, भोकर 1, नायगाव 5, हदगाव 3, उमरी 1, नांदेड ग्रामीण 2, लोहा 1, बिलोली 2, मुखेड 4, देगलूर 8, लातूर 2 असे एकुण 37 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 318 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 25, मुखेड कोविड रुग्णालय 16, देगलूर कोविड रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 1,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 140, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 63, हैद्राबाद येथे  संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 20 आहेत.   

बुधवार 30 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 174, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 59 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 80 हजार 354

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 54 हजार 653

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 425

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 333

एकुण मृत्यू संख्या-573

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-631

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-318

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.           

000000

 

भवानी चौक वाडी बु ते लिंबगावचा रस्ता

सकाळी 6 ते 9 यावेळेत जडवाहनास प्रतिबंध  

नांदेड, (जिमाका)दि. 30 :- भवानी चौक (निळा जंक्शन) वाडी बु. नांदेड पासून ते लिंबगाव पर्यंतचा रस्ता शनिवार 9 जानेवारी 2021 पर्यंत सकाळी 6 ते 9 यावेळेत सायकलींगसाठी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवासी वाहने, शासकिय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने सायकलींगसाठी हा रस्ता 11 डिसेंबर 2020 पासून 9 जानेवारी 2021 या 29 दिवसासाठी सकाळी 6 ते 9 या कालावधीत अत्यावश्यक सेवेची वाहने, शासकीय प्रवासी वाहने व शासकीय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंधीत केला आहे. या मार्गावरुन केवळ हलकी वाहने वगळता उर्वरित सर्व जडवाहनास पुर्णपणे प्रतिबंध करण्यात आले आहे. प्रतिबंधीत करण्यात आलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्ग लिंबगाव-नाळेश्वर-वाघी-नांदेड असा राहिल. या कालावधीत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

 

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकस्पर्धा

नांदेड, (जिमाका) दि. 30:- शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पिकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पिकस्पर्धांचे आयोजन कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे. 

खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, सुर्यफुल या 11 पिकांचा तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या 06 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान 10 आर. (0.10 हेक्टर) सलग क्षेत्र असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित केला आला आहे. ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे. अशा सर्व पिकांकरीता पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी तीनशे प्रति शेतकरी प्रति पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असून त्यासाठी एकदाच तीनशे प्रति शेतकरी प्रति पिक प्रवेश शुल्क भरुन पिककापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. त्याबाबचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे, असेही प्रसिध्दपत्रकान्वये कृषि आयुक्तालयाने कळविले आहे.

0000

 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर

पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज

17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिमीचे आयोजन  


नांदेड
, (जिमाका) दि. 30 :- 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर नियमितपणे राबविण्यात येत असूनही पोलिओचे आव्हान पूर्णत: संपुष्टात आले असे नाही. महाराष्ट्रात 2010 मध्ये मालेगाव शहरात 4 व बीड जिल्ह्यात 1 असे एकुण 5 पोलिओ रुग्ण आढळले होते. यातील मालेगाव शहरातील 4 पोलिओ रुग्णांनी नियमित लसीकरणांतर्गत एकही लसीची मात्रा घेतली नव्हती तर बीड जिल्ह्यातील रुग्ण हा स्थलांतरीत कुटुंबातील असल्याने त्याला पोलिओची लस मिळाली नव्हती. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनातर्फे सातत्याने पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जात असून नांदेड जिल्ह्यात ही मोहिम यशस्वी राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आवश्यक असणारी प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून ही मोहिम यशस्वी करु असा निर्धार जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त केला.  

या समन्वय समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) एस. व्ही. शिंगने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष शिरसीकर यांची उपस्थिती होती.  

संपूर्ण देशात 13 जानेवारी 2011 नंतर आज पर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आला नाही हे आजवर सातत्यपूर्ण राबविल्या गेलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे यश आहे. तथापि आजूनही या मोहिमेची अत्यावश्यकता असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 17 जानेवारी 2021 रोजी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. या मोहिमेत (BOPV) बायव्हायलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येईल. मे 2016 पासून नियमित लसीकरणांतर्गत शुन्य ते 1 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची इंजेक्शन माध्यमातून आयपीव्ही लस देण्यात येते. या मोहिमेत 17 जानेवारी रोजी बुथवर व त्यानंतर ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस याप्रमाणे घर भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्र व स्थलांतरित / भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रात लसीकरणांतर्गत विशेष लक्ष दिले जात आहे. यात अतिदुर्गम भाग, डोंगराळ भागातील पाडे, वस्त्या, शहरी भागातील झोपडपट्टी, विट भट्ट्या / बांधकामे, स्थालांतरीत वस्त्या / ऊसतोड वस्त्या, सलग तीन सदरे रद्द झालेली गावे यावर भर दिला जात आहे. या भागातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य विभागाचा संक्षिप्त आढावा घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले.



000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...