Friday, August 25, 2017

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा
नांदेड दि. 25 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 30 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन मोटारीने सगरोळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शेतकरी कंपनीच्या बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन स्थळ कृषि विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी. सकाळी 11.30 वा. "संकल्प ते सिद्धी" कार्यक्रम व शेतकरी कर्जमाफी अर्ज भरणे मेळावा. स्थळ कृषि विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी. दुपारी 2.30 वा. सगरोळी येथुन मोटारीने नायगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. शेतकरी कर्जमाफी अर्ज भरणे मेळावा व पीक परिस्थिती आढावा बैठक (कृषि, पणन व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) स्थळ तहसिल कार्यालय नायगाव बा. दुपारी 4.30 वा. नायगाव बा. येथुन मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं. 6 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000
महाअवयवदान अभियानात
अवयवदानाचे संमतीपत्र भरुन दयावीत ;
संपर्क साधण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
नांदेड, दि. 25 :- महाअवयवदान अभियान कार्यक्रम मंगळवार 29 बुधवार 30 ऑगस्ट 2017 रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. अवयवदानामुळे गरजू रुग्णांना जीवनाचा आनंद घेता येतो. महाअवयवदान अभियानात जास्तीतजास्त अवयवदान करण्याबाबत नागरिकांनी संमतीपत्र भरुन दयावीत, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सी. बी. म्हस्के, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर श्यामकुंवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे. 
अवयवदान केलेले अवयव हे गरजू, प्रतिक्षा यादीनुसार रुग्णांना मोफत दिले जाते. याबाबत समितीद्वारे दक्षता घेतली जाते. अवयवदान देणाऱ्याला व घेणाऱ्यास कोण-कोणास अवयव दान दिले याची माहिती गुप्त ठेवली जाते.  
अवयवदान अभियानाचे संमती पत्र भरुन घेण्याची व्यवस्था पुढील ठिकाणी करण्यात आली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे ग्रंथालय विभाग एस. टी. इंगळे भ्र. 9420415969, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय वजिराबाद नांदेड अधिष्ठाता डॉ. भास्कर श्यामकुंवर भ्र. 9422185622, जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कक्ष संपर्क अधिकारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर भ्र. 7038949739 या भ्रमणध्वनीवर नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अवयवदानाचे संमतीपत्र भरुन दयावे, असेही आवाहन केले आहे.
000000


सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट
नांदेड दि. 25 :-  आगामी सण, उत्‍सवात  ध्‍वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये  ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धक इ. वापर श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्‍या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्‍ह्याच्‍या निकडीनुसार दहा दिवस ध्‍वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
ध्वनीक्षेपकाचा वापरास गणपती उत्सवात दोन दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमी व नवमी ), दिवाळी लक्ष्मीपुजन एक दिवस, ईद ए मिलाद एक दिवस, ख्रिसमस एक दिवस, 31 डिसेंबर एक दिवस या दिवसासाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट राहील. तसेच उर्वरित दोन दिवस हे ध्‍वनी प्राधिकरण तथा जिल्‍हा पोलिस अधिक्षक नांदेड यांच्‍या शिफारसीनुसार जिल्‍हातील महत्‍वाच्‍या कार्यक्रमासाठी गरजेनसार जिल्‍हाधिकारी यांच्‍या परवानगीने दिले जाईल.
या सण उत्‍सवासाठी ध्‍वनीवर्धक व ध्‍वनीक्षेपक वापरण्‍याबाबतची सुट जिल्‍हयातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्‍याची अंमलबजावणी करण्‍याची जाबाबदारी सबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असेही आदेशात म्हटले आहे. 
000000


जिल्हा नियोजन समिती निवडणुकीची
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
नांदेड, दि. 25 :-  जिल्हा नियोजन समिती निवडणुकीची अंतिम मतदार यादी गुरुवार 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात या निवडणुकीसाठी चार मतदार संघात एकुण मतदारांची संख्या 425 तर निवडून दयावयाच्या सदस्यांची संख्या 35 आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी, नांदेड यांनी दिली आहे.
 महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती निवडणूक नियम 1999 नुसार नांदेड जिल्हा नियोजन समितीची निवडणुक घेण्यात येणार आहे. मतदारसंघ निहाय कंसाबाहेर मतदारांची संख्या व (कंसात निवडून दयावयाच्या सदस्यांची संख्या) पुढील प्रमाणे आहे. ग्रामीण निर्वाचन क्षेत्र (जिल्हा परिषद)- 63 (28), संक्रमणकालीन निर्वाचन क्षेत्र (नगरपंचायती)- 68 ( एक ), लहान नागरी निर्वाचन क्षेत्र (नगरपरिषदा)- 224 (4), मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र (महानगरपालिका)- 70 (2) अशी एकुण मतदारांची संख्या 425 तर निवडून दयावयाच्या सदस्यांची संख्या 35 आहे.
या निवडणुकीची प्राथमिक मतदार यादी शनिवार 19 ऑगस्ट 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर बुधवार 23 ऑगस्ट पर्यंत अक्षेप मागविण्यात आले होते. जिल्ह्यात ग्रामीण निर्वाचन क्षेत्र (जिल्हा परिषद), संक्रमणकालीन निर्वाचन क्षेत्र (नगरपंचायती), लहान नागरी निर्वाचन क्षेत्र (नगरपरिषदा), मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र (महानगरपालिका) या चार मतदारसंघात निवडणूक घेण्यात येणार आहे, असेही जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000
किनवट येथे रोजगार मेळावा
नांदेड दि. 25 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्राम परिवर्तक (आरडीएफ) यांच्यावतीने 28 व 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गोकुंदा किनवट येथे रोजगार मेळावा-2 चे आयोजन करण्यात आले आहे.  बेरोजगार पुरुष उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.
या मेळाव्यात एसआयएस कंपनीत सेक्युरिटी गार्ड, सेक्युरिटी सुपरवायझर प्रत्येकी 100 पदासाठी भरती होणार आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण, वयोमर्यादा 20 ते 35 वर्षे, अंदाजीत वेतन 8 ते 22 हजार पर्यंत राहील. उंची 168 सेमी, वजन 50 कि.ग्रॅ. आवश्यक आहे. आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावी व बारावी सनद, असल्यास जातीचा दाखला या कागदपत्राच्या झेरॉक्स दोन प्रती आणाव्यात. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व अण्णासाहेब पाटील बीज भांडवल योजनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर, दुरध्वनी 02469-221801 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

000000
नायगाव येथे रोजगार मेळावा
नांदेड दि. 25 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने 30 व 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. जनता हायस्कुल नायगाव येथे रोजगार मेळावा-3 चे आयोजन करण्यात आले आहे.  बेरोजगार पुरुष उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.
या मेळाव्यात एसआयएस कंपनीत सेक्युरिटी गार्ड, सेक्युरिटी सुपरवायझर प्रत्येकी 100 पदासाठी भरती होणार आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण, वयोमर्यादा 20 ते 35 वर्षे, अंदाजीत वेतन 8 ते 22 हजार पर्यंत राहील. उंची 168 सेमी, वजन 50 कि.ग्रॅ. आवश्यक आहे. आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावी व बारावी सनद, असल्यास जातीचा दाखला या कागदपत्राच्या झेरॉक्स दोन प्रती आणाव्यात. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व अण्णासाहेब पाटील बीज भांडवल योजनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर, दुरध्वनी 02469-221801 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

000000
शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत
नांदेड दि. 25 :- शासकीय तंत्र प्रशाला केंद्र धर्माबाद येथे सहा. अधिव्याख्याता व निदेशक पदावर तात्पुरत्या तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणुक करण्यात येणार आहे. इच्छुकांनी शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा. मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्रासह शासकीय तंत्र प्रशाला केंद्र धर्माबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय तंत्र प्रशाला केंद्र धर्माबादचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.  
सहा. अधिव्याख्याता, निदेशक (पुर्वव्यवसायीक) विद्युतगट, निदेशक (पुर्वव्यवसायीक) यंत्रगट, यांत्रिक कृषित्र, संधाता, जोडारी, कातारी, विजतंत्री या पदासाठी विहित शैक्षणीक अर्हता व अनुभव आवश्यक आहे. शासकीय तंत्र प्रशाला केंद्र या संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या शिल्पनिदेशक / गटनिदेशक व सीटीआय उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयातील अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर तासिका तत्वावर नियुक्ती मिळेल. यापुर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र धर्माबाद येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

000000
विनापरवाना स्टोन क्रेशर चालकांकडून  
115.52 लक्ष रुपयाचा महसूल प्राप्त  
नांदेड दि. 25 :-  विनापरवाना स्टोन क्रेशर चालकाच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. या माहिमेत स्टोन क्रेशर चालकाकडून 115.52 लक्ष रुपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येत आहे.
जिल्हा खनिकर्म अधिकारी रणज्योत सिंघ सोखी व संबंधीत महसुल अधिकारी पथकाने कंधार तालुक्यातील सादलापुरे स्टोन क्रेशर, गोमारे स्टोन क्रेशर, श्री स्टोन क्रेशर, जयकिसान स्टोन क्रेशर तसेच मुखेड तालुक्यातील बालाजी गिट्टी उत्पादक सहकारी स्टोन क्रेशर असे 4 स्टोन क्रेशरला सील करण्यात आले आहे. जिल्ह्यात 117 नोंदणीकृत स्टोन क्रेशर पैकी 48 स्टोन क्रेशर धारकांनी परवाना नुतनीकरण केले आहे. उर्वरीत स्टोन क्रेशर परवाना नुतनीकरण प्रक्रियेत असून त्यांचे तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

00000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पुल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून 26 सप्टेंबर 2017 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...