Wednesday, January 24, 2018

 राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2017 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 24 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जानेवारी 2018 अशी आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  
 राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे- बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे- अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000


उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्काराचे
26 जानेवारीला वितरण
नांदेड दि. 23 :- उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार सन 2016-17 साठी अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र नांदेड यांनी दिली आहे.

000000
नांदेड जिल्हा परिषदेची
31 जानेवारीला सर्वसाधारण सभा   
नांदेड दि. 24 :- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार 31 जानेवारी 2018 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे विषय सुचीमध्ये उल्लेखिलेले कामकाज चालविणेसाठी भरविण्यात येणार आहे. सर्व जिल्हा परिषद सदस्य व संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) यांनी केले आहे.

000000
मृद व जलसंधारण कामांसाठी 
मशिनधारकांची कृषि कार्यालयात नोंदणी
नांदेड दि. 24 :- मृद व जलसंधारण कामे करण्यासाठी इच्छुक मशिनधारकांनी नोंदणी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांचे कार्यालयात कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 10.30 ते सायं 5 यावेळेत करण्यात येत आहे. इच्छुकांनी विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जलसंधारण विभागाचे शासन परिपत्रकान्वये मशिनधारकांची नोंदणी करुन त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदाराप्रमाणे सिमेंट नालाबांध व वळण बंधारे वगळता मृद व जलसंधारणाची इतर कामे करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास मान्यता दिली आहे.
कंत्राटदार नोंदणी अर्जाची किंमत 1 हजार रुपये नापरतावा आहे. एक हजार रुपये भरणा करुन विहित नमुन्यात अर्ज करावा. अर्जासोबत शंभर रुपयाचे बॉडपेपरवर प्रतिज्ञापत्र जोडावे. अर्जासोबत मशिन नोंदणी शुल्क आरसी बुक, टीसी बुक, मशिनरी खरेदी पावती, मशिनरी विमा पावती धारकाने पॅनकार्ड, आधार कार्ड, राष्ट्रीय बँकेतील खाते, जीएसटी क्रमांकाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. मशिनधारक हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा. त्यांना फक्त स्व:जिल्ह्यातच नोंदणी करता येईल. एक्साव्हेटर किंवा बॅकहोल लोडर एक्साव्हेटर्स या प्रवर्गातील तत्सम मशिनरी ( जेसीबी, पोकलॅन, टाटा हिताची, हुंदाई व इतर ) धारकांना नोंदणीसाठी अर्ज करता येईल. परिपुर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर मशिनधारकांना कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.  

00000
प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी ध्वजवंदनाचा
मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर
नांदेड, दि. 24 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000
सामाजिक न्याय राज्यमंत्री
दिलीप कांबळे यांचा दौरा
 नांदेड दि. 24 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 25 जानेवारी 2018 रोजी मुंबई येथुन विमानाने दुपारी 2.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन शासकीय वाहनाने अर्धापूर-कळमनुरी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण करतील.
शुक्रवार 26 जानेवारी 2018 हिंगोली येथुन वाहनाने रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
शनिवार 27 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.30 वा. नांदेड विमानतळ येथून टु जेट एअरलाईन्सच्या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

000000
पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
 नांदेड दि. 24 :- राज्याचे पर्यावरण तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 25 जानेवारी 2018 रोजी औरंगाबाद येथुन शासकीय वाहनाने रात्री 9 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9.15 वा. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायात मैदान, पोलीस मुख्यालय, वजिराबाद नांदेड. दुपारी 2 वा. जिल्हा नियोजन विकास समिती बैठकीस उपस्थित. स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 3 वा. शासकीय वाहनाने नांदेड येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...