Thursday, December 2, 2021

राष्ट्रीय लोकअदालतीचे 11 डिसेंबरला आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 2. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय यांच्यावतीने 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पूर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रक्कमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

 या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्टीªय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश राजेंद्र एस. रोटे यांनी केले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

 

 


 सुधारित वृत्त 

भोजन, स्टेशनरी, इतर साहित्य पुरवठ्यासाठी

दरपत्रके सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- मागासवर्गीय मुलां-मुलीच्या शासकीय वसतिगृहासाठी व शासकीय निवासी शाळेसाठी भोजन, स्टेशनरी व इतर साहित्य या आवश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रके 2 ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत मागविण्यात आली आहेत. अंतिम मुदतीत 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद पाकिटात दरपत्रक सादर करावीत. विहित मुदतीनंतर प्राप्त दरपत्रकाची विचार केला जाणार नाही याची पुरवठाधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

पुरवठा करावयाच्या साहित्यासाठी भोजन व स्टेशनरी पुरवठा करझ्यासाठी पुरवठाधारकाकडे अन्न व औषध प्रशासनाचे वैद्य अनुज्ञाप्ती प्रमाणपत्र आवश्यक आहे. पुरवठा करावयाच्या साहित्याची यादी, इतर तपशिल व अटी शर्तीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

0000

 

 नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 897 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 491 एवढी झाली असून यातील 87 हजार 815 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

आतापर्यंत जिल्ह्यात बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आज जिल्ह्यातील 1 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालयात 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 75 हजार 696

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 71 हजार 742

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 491

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 815

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

00000

 ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना

अनुयायांनी घरी राहूनच अभिवादन करावे 

नांदेड (जिमाका) दि.2 :- गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनहा नवीन विषाणू आढळून आला आहे. सद्यस्थितीत सगळीकडे या संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने सध्या कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मार्गदर्शक सूचनानुसार महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी घरी राहून अभिवादन करावे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आवाहन  केले आहे. 

ओमिक्रॉन विषाणुच्या पार्श्वभूमीवर या संक्रमण रोगाचा प्रभाव पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून 6 डिसेंबर  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी गर्दी न करता करावयाचा आहे.  

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीवर शासन, महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक 4 जून 2021 व सार्वजनिक आरोग्य विभागाचे 11 ऑगस्ट 2021 तसेच 24 सप्टेंबर 2021 च्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी केले आहे.   

महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दु:खाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या संसर्गाचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामूळे चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न जाता घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.  चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जे व्यक्ती अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. 

औष्णिक पटेक्षण (थर्मल स्कनिंग ) च्या तपासणीअंती ज्याचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत. तसेच या परिसरात कोणत्याही सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढण्यास मनाई आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे,तालुके येथेही आयोजित करण्यात येत आहे.

000000

 जेंव्हा एक साधा प्रयत्न त्या गंभीर आजारी

2 हजार बालकांना नवे जीवदान देतो 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी हैद्राबाद व इतर महानगराकडे जायचे काम पडू नये यादृष्टिने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना अधिक सक्षम करण्यावर गत दोन वर्षात विशेष भर देण्यात आला. कोविड-19 च्या आव्हानानंतर बालकांच्या दृष्टिनेही शासकीय पातळीवर चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाल विभागाला अधिक सक्षम केले. अवघ्या 3 महिन्यांपूर्वी बाल रुग्णांच्या सेवेत रुजू झालेल्या एका अद्ययावत वार्डाने डॉक्टरांच्या अथक परिश्रम व दक्षतेतून 2 हजार बालकांना नवे जीवदान मिळाले यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही. ही अद्भूत किमया शासकीय रुग्णालयातील अवघ्या 12 डॉक्टर्स व संबंधित स्टाफ नर्स यांनी लिलया पेलून दाखविली.

कोविडच्या दृष्टिने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या नवीन बाल व नवजात शिशू अतिदक्षता विभागाद्वारे चांगल्या सुविधा निर्माण झाल्याचा निश्चितच सर्वांना लाभ होत आहे. ज्या दूरदृष्टिने येथील सेवा-सुविधा अत्याधुनिक करुन रुग्णांसाठी उपलब्ध झाल्या त्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने अधिक गंभीर बाल रुग्णांना येथे उपचार करून सुखरुप घरी पाठविता आले. नवीन बाल व नवजात शिशु अतिदक्षता विभागाची क्षमता ही 150 बालकांची आहे. ऑक्टोंबर महिन्यात सर्वत्र लहान मुलांच्या निमोनिया, डेंग्यू, मेंदूज्वर, टायफाईड व इतर आजारांचे प्रमाण एकदम वाढले. नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील गंभीर आजारी मुलांसह शेजारील तेलंगणा व परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातून उपचारासाठी मुले येथेच दाखल झाली. अवघ्या ऑक्टोंबर महिन्यात या नवीन वार्डात 900 मुलांवर उपचार करण्याचे आवाहन येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी स्विकारुन ते पूर्ण करुन दाखविले. आज डिसेंबरच्या पहिल्या तारखेपर्यंत या वार्डातून २ हजार मुले सुखरूप बरे होऊ गेले याचा मनोमन आनंद असल्याची भावना बालरुग्ण विभाग प्रमुख डॉ. सलीम तांबे यांनी बोलून दाखविली. 

राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये नांदेड येथील आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागाचा पहिला क्रमांक येतो. या खालोखाल पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजला जातो. इथल्या सुविधा अत्याधुनिक आहेत. मल्टी पॅरामॉनिटर्सपासून सेंट्रल मॉनिटर्स सिस्टीम कार्डीयाक मॉनिटर, क्युबिकल विथ व्हेंटिलेटर, वॉर्मर्स अश्या अत्याधुनिक उपकरणांनी आपले वार्ड सज्ज आहेत. मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात बालरुग्ण आल्याने त्यांना दाखल करुन घेऊन उपचार करणे हे कर्तव्य आहे. डॉक्टर्सच्या सर्व टिमने दिवसाची रात्र करुन गत 3 महिन्यांपासून एक दिवसही सुट्टी न घेता आजवर 2 हजार या नव्या अतिदक्षता विभागात दाखल झालेले बालक व खास कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन बेडच्या वार्डमध्ये जवळपास 1 हजार 300 बाल रुग्णांना चांगले उपचार करुन रुग्णालयातून घरी पाठविले आहे. ही बालरुग्णांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 3 हजार 300 एवढी जात असल्याचे सांगतांना डॉ. तांबे यांना आपल्या चेहऱ्यावरचे समाधान लपविता आले नाही. 

सर्वच स्तरातून या ठिकाणी बालरुग्ण येतात. काही अत्यंत हालाकीच्या परिस्थितील असतात. विशेषत: शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील मुलांना आणि पालकांना धीर देऊन समाधान करणे हे अधिक आव्हानात्मक असते. त्यांच्या सहकार्याने रुग्णालयाचे व्यवस्थापनही अधिक चांगले कार्य करू शकते असे डॉ. तांबे यांनी सांगितले.

दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचा 

असंख्य रुग्णांना लाभ याचे मोठे समाधान

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

संभाव्य कोविड-19 च्या प्रादुर्भावाचा विचार करुन जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यावर शासनाने भर दिला. या अंतर्गत जिल्ह्यातील बाल रुग्णांसाठीही अद्ययावत चांगल्या सुविधा का असू नयेत याचा विचार करुन या वार्डाच्या निर्मितीसाठी आम्ही अग्रही राहिलो. आज याचा चांगला उपयोग नांदेड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील मुलांनाही होत आहे. येथील संपूर्ण वैद्यकिय टिम ज्या मिशन मोडवर काम करते आहे त्याचे विशेष कौतूक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

000000



  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...