Wednesday, February 28, 2018


   विवाहसाठी ऑनलाईन नोटीस देता येणार;  
त्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही  
नांदेड, दि. 28 :- विशेष विवाह कायदान्वये विवाहसाठी द्यावयाची नोटीस ऑनलाईन देता येणार आहे. त्यासाठी विवाह अधिकारी कार्यालयात समक्ष जाण्याची गरज नाही. दस्त नोंदणी प्रमाणे विशेष विवाह नोंदणी प्रणालीचे संगणकीकरण करण्यात आले आहे. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर डेटा एन्ट्री करण्या पक्षकारांचा वेळ जाऊ नये  व त्यामध्ये चुका होऊ नाहीत यासाठी पब्लिक डेटा एन्ट्रीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा विभागाच्या igrmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी एस. के. बोधगीरे यांनी दिली आहे.  
राज्यातील सर्व विवाह अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरवर जोडण्यात आली असून कार्यालया विशेष विवाह नोंदणीसाठी संगणकीकृत आज्ञावलीचा वापर होत आहे. विशेष विवाह कायदा 1954 हा केंद्रीय कायदा आहे. यानुसार विवाह अधिकाऱ्यासमोर विवाह संपन्न करण्याची तरतूद आहे. तसेच अलाहिदा झालेल्या विवाहची नोंदणी करण्याची देखील तरतुद आहे.
विवाह संपन्न करण्याविषयी
या कायद्यानुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाह इच्छूक वर-वधू यांनी आपल्या नियोजित विवाहची नोटीस संबंधत जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांना द्यावी लागते. तसेच वय व रहिवासीचे कागदपत्र पुरावे द्यावे लागतात आणि नोटीस शुल्क भरावी लागते. वर-वधू विहित अटींची पूर्तता करीत असल्यास विवाह अधिकारी  नोटीस स्वीकारतात व त्याची प्रत नोटीस बोर्डवर लावतात. तसेच दोघांपैकी एक पक्ष अन्य जिल्ह्यातील असल्यास त्या जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस बोर्डावर लावण्यासाठी पाठवितात.
विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस दिल्यानंतर तीस दिवसाच्या आत नियोजित विवाहाबद्दल आक्षेप न आल्यास , त्यानंतरच्या साठ दिवसात वर-वधू तीन साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाऱ्यांसमोर हजर राहतात व विवाह अधिकारी त्यांचा विवाह संपन्न करुन विवाह प्रमाणपत्र देतात.
प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालयातील एक दुय्यम निबंधक यांना त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. मुंबई, मुंबई उपनगर व पुणे या जिल्ह्यासाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. राज्यात दरवर्षी सुमारे 30 हजार विवाह या पध्दतीने संपन्न होतात.
झालेल्या विवाहांची नोंदणी
अलाहिदा विवाह झालेल्या जोडप्यांनी जर विवाहची नोंदणी केलेली नसेल, तर त्यांना विवाह नोंदणी करुन घेण्याची देखील सुविधा या कायद्यामध्ये आहे. त्यासाठी सदर पती-पत्नी यांना विवाह अधिकारी कार्यालयास अर्ज द्यावा लागतो. या अर्जानंतर 30 दिवसानंतर त्यांना विवाह नोंदणीसाठी विवाह अधिकाऱ्यांसमोर उपस्थित रहावे लागते.
ऑनलाईन नोटीस
विशेष विवाह नोंदणीमध्ये वर-वधुंना विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे व तीस दिवसानंतर विवाह संपन्न करणे अशा दोन कामासाठी जावे लागते. यापैकी नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येईल अशी व्यवस्था दिनांक 1 नोव्हेंबर 2017 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. याचरितीने झालेल्या विवाहाची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज ऑनलाईन देता येईल, अशीही व्यवस्था कार्यान्वित करण्यात येत आहे.
प्रणाली वापरकर्ते व उपब्धता
या प्रणालीमध्ये संबंधित विवाह इच्छूक पक्षकार व विवाह अधिकारी असे दोन वापरकर्ते असणार आहेत. पक्षकारांसाठी ही प्रणाली विभागाच्या igrmaharashtra.gov.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्व्हिस मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस ऑनलाईन मॅरेज नोटीस येथे उपलब्ध आहे. विवाह अधिकारी यांना ही प्रणाली विभागासाठीच्या एमपीएलएस-व्हीपीएन नेटवर्कमध्ये उपब्ध असणार आहे.
ऑनलाईन नोटीस बोर्ड
सद्या विवाह अधिकाऱ्यांना विवाहाची नोटीसची प्रत नोटीस बोर्डवर लावावी लागते. तसेच दोघांपैकी एक पक्ष अन्य जिल्ह्यातील असल्यास त्या जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस बोर्डवर लावण्यासाठी पाठवावी लागते. हा नोटीस बोर्ड नागरिकांना पाहण्यासाठी खुला असतो. नवीन प्रणालीमध्ये हा नोटीस बोर्ड विभागाच्या igrmaharashtra.gov.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्व्हिस मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस मॅरेज नोटीस बोर्डे येथे उपलब्ध आहे. नागरिकांना राज्यातील कोणत्याही विवाह अधिकारी कार्यालयात दिलेल्या विवाहाचा तपशिल येथे पाहता येईल.
वापरासाठी आवश्यक बाबी
विवाह इच्छूक वर-वधूकडे आधार क्रमांक आवश्यक आणि आधार प्रणालीबरोबर ओळख पडताळणी करण्यासाठी सहमती देण्याची तयारी आवश्यक आहे. इंटरनेट सुविधा, वेबकॅम, बायोमॅट्रीक डिवाईस व नेटबँकिग सुविधा असलेले बँक खाते ( या सुविधा स्वत:कडे उपलब्ध नसल्यास महा-ई सेवा केंद्र किंवा ई-रजिस्ट्रेशन सेवा देणाऱ्या व्यक्ती, संस्थांची मदत घेता येईल.)
प्रणालीची महत्वाची वैशिष्ट्य
 नोटीस देण्यासाठी विवाह अधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. वेळेचे बंधन नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही सोयीच्या ठिकाणाहून प्रक्रिया करता येईल. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस येणार. नोटीस बोर्ड संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. नोटीस शुल्क ऑनलाईन भरता येणार आहे.
प्रणालीचे महत्वाचे फायदे
पक्षकाराच्या वेळ व पैशाची बचत. गतीमान-पारदर्शी व विनामध्यस्थ सेवा. विवाह अधिकारी कार्यालयात वर्दळ कमी. प्रत्यक्ष विवाह संपन्न करण्यासाठी अधिक निवांत व प्रसन्न वातावरण. या सर्व फायद्यामुळे विशेष विवाह पध्दतीने विवाह करण्यास प्रोत्साहन मिळून सामाजिक हित साधले जाणार, अशी माहिती सह-जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व्हीआयपी रोड नांदेड यांनी दिली आहे.
       00000


महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे
अध्यक्ष न्या. गायकवाड यांचा दौरा
नांदेड, दि. 28 :- मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण व शासकीय नोकऱ्यामध्ये असलेले प्रमाण याविषयी शासनास अहवाल सादर करण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड हे मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भातील सुनावणीसाठी व इतर अनुषंगीक कामकाजासाठी 1 मार्च ते 6 मार्च 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. त्यांचे 1 मार्च रोजी सकाळी 8 वा. देवगिरी एक्सप्रेसने नांदेड येथे आगमन होणार आहे.
00000


अपंगत्व माजी सैनिकांना
माहिती देण्याचे आवाहन 
       नांदेड, दि. 28 :- राष्ट्रसेवा करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी भारतीय  लष्कराने 2018 हे वर्ष अपंग वर्ष  घोषीत केले आहे.  अपंग झालेल्या सैनिकांचा सन्मानाप्रित्यर्थ  मुख्यालय, सदन  कमाण्ड, पुणे यांनी महाराष्ट्रातील अपंग माजी सैनिकांची माहिती मागितली आहे. जिल्हयातील माजी सैनिक युद्वजन्य परिस्थिती व्यतिरिक्त अपंग झाले असतील तर त्यांनी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात  विहीत नमुन्यातील फॉर्म  भरुन दयावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
00000



Tuesday, February 27, 2018


कुसुमाग्रज यांची श्रेष्ठ कलाकृती
प्रत्येक पिढीला भुरळ घालणारी
- सुनिल हुसे
नांदेड, दि. 27 :- कुसुमाग्रज यांची श्रेष्ठ कलाकृती प्रत्येक पिढीतील वाचकांना भूरळ घालणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने साजर करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. हुसे बोलत होते. याप्रसंगी कुसुमाग्रज यांचे साहित्य तथा मराठी भाषेविषयक ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. हुसे म्हणाले, कुसुमाग्रज यांचे साहित्य सर्वकालीक असून मानवी जीवनातील भावकंगोरेचे यथार्थ चित्रण त्यांच्या साहित्या आहे. हे साहित्य चितनाबरोबरच नव ऊर्जासुध्दा देणारे आहे, असेही सांगितले.
            याप्रसंगी निता पवार यांनी मराठी अभिमान गीत सादर केले, देवकी मुंगल यांनी स्वातंत्र देवतेची विनवणी तर दीक्षा ऐडके यांनी सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता सादर केली. साहेबराव पवार यांनी कोलंबसचे गर्वगीत, माणिक कोडगीरे यांनी वेडात वीर धावले सात ही कविता सादर केली तर लक्ष्मण शेनेवाड, मयुर कल्याणकर, परमेश्वर शिंदे, आशा देशमुख यांनी कुसुमाग्रज मराठी भाषेवर मनोगत व्यक्त केले. सेतू समिती अभ्यासिकेच्या ग्रंथपाल आरती कोकुलवार यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनातील पैलुंचा उलगडा मनोगतात व्यक्त केला.
सुरुवातीला प्रतिमा पूजन करुन ग्रंथप्रदर्शनाचे  द्घाटन करण्यात आले.  प्रास्ताविक प्रताप सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय ट्टमवार यांनी केले.
00000


व्हॉटस्ॲपवरील पीक विमा
यादीवर विश्वास ठेऊ नका
नांदेड, दि. 27 :-  खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याच्या याद्या निरनिराळया व्हॉटस्ॲपग्रुपवर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. अनेक पानांची पीडीएफ फाईल व्हॉटसपवर आल्यावर आपले नाव त्यात आहे का हे पाहण्याचा शेतकरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत. परंतु शासनाने अद्याप पीक विमा जाहिर केलेला नाही. खरीप पिकांचा पीक विमा जाहिर करण्याचे प्रयत्न शासनस्तरावर सुरु आहेत. लवकरच खरीप पिक विमा जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या व्हॉटस्ॲपवर फिरत असलेल्या यादीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.
00000


दारु दुकाने शुक्रवारी बंद
नांदेड, दि. 27 :-जिल्ह्यात धुलीवंदन व हल्लाबोल शुक्रवार 2 मार्च 2018 रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवून अनुचित प्रकार घडणार नाही त्यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी नांदेड यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बीआर- 2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
000000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून मंगळवार 27 फेब्रुवारी पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवार 26 मार्च 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 
00000


शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या
चिठ्ठ्या पंचायत समिती स्तरावर उपलब्ध
नांदेड, दि. 27 :-  भविष्य निर्वाह निधीच्या चिठ्ठ्या संबंधीत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांचेकडून शिक्षकांनी उपलब्ध करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी केले आहे.     
जिल्हा परिषद वित्त विभागाकडून भविष्य निर्वाह निधीचे सन 2016-17 चे शिक्षक संवर्गाच्या भविष्य निर्वाह निधीच्या चिठ्ठ्या संबंधीत गटशिक्षणाधिकारी पंचायत समितीस्तरावर ईमेलद्वारे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्या नेहमी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे उपलब्ध असल्याने वित्त विभागात याबाबत मागणी करण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही आवाहन केले आहे.
0000


अधिपरिचारीका पदासाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 27 :- शासनाने संचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांना सरळ सेवेने अधिपरिचारिकांच्या एकूण 528 पदांसाठी नेमणकीसाठी स्पर्धा परिक्षा घे पदे भरण्याची कार्यवाही करण्याचे  निर्देश केले  आहे. त्याअनुषंगाने या संचालनालयाच्या अधिपत्याखाली वैद्यकीय महाविद्यालये रुग्णालये, शासकीय दंत महाविद्यालये, आरोग्य पथके, आरोग्य केंद्रे आदी संस्थे रिक्त असलेल्या परिचर्या संवर्गातील  अधिपरिचारीकांची रिक्त पदे  भरण्यासाठी  राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षा शनिवार 31 मार्च 2018 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज परिक्षा शुल्क 8 मार्च 2018 पर्यंत भरावेत.
या परिक्षेसाठी पात्र उमेदवारंकडून विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पात्रता, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, सर्वसाधारण अटी शर्ती, परिक्षेसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम, राज्यस्तरीय गुणवत्ता यादीचे निकष, अर्जासोबत सादर करावयाची साक्षांकित प्रमाणपत्रे आणि अर्जाचा नमुना इत्यादींची सविस्तर माहिती अर्जासोबत देण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिके नमूद करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी माहिती पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करुन आपले अर्ज  mahapariksha.gov.in  या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन डॉ. पी एच शिनगारे संचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...