Thursday, December 7, 2023

 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा करण्याचे निर्देश 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- मानवी हक्क दिन येत्या 10 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव डी. बी. गावडे यांनी दिले आहेत. संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. समाजातील तळागाळापर्यत जनतेला मानवी हक्काची माहिती पोहोचावी या उद्देशाने व्याख्याने, भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना जिल्हा प्रशासनानी दिले आहेत.

0000

 आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सोमवार 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. करण्यात आले आहे. 

मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने आयोजित या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. यात इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशीनिस्ट, फिटर, टर्नर, मेकॅनिक, वेल्डर एकुण 180 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन एस. व्ही. सुर्यवंशी अंशकालीन प्राचार्य मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले आहे.

0000

 8 डिसेंबर रोजी वाहतुकीच्या मार्गात बदल   

नांदेड (जिमाका) दि. 7 :- दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्‍या सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राखावी यादृष्‍टीने आदेशात नमूद केल्याप्रमाणे वाहतूकीच्‍या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्‍याबाबत अधिसूचना महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांनी विनंती केल्‍यानूसार प्रसिद्ध केली आहे. ही अधिसुचना दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्‍या कालावधीसाठी तात्‍पूरत्‍या स्‍वरुपात अंमलात राहिल तद्नंतर सदर अधिसुचना रद्द समजण्‍यात येईल. 

राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 161 चंदासिंग कॉर्नर नांदेड ते नरसी तालुका नायगाव जड वाहनाच्या वाहतुकीस बंद राहील. या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग हा जड वाहनास नांदेड-मुदखेड-उमरी-धर्माबाद-कोंडलवाडी-बिलोली-तेलंगना येण्‍या-जाण्‍यासाठी वाहतुकीस चालू राहील. जड वाहनास नांदेड-मुदखेड-उमरी-कारेगाव फाटा-कासराळी-रुद्रापुर-मुतन्‍याळ-थडीसावळी-खतगाव-कोटेकल्‍लुर-शहापुर-सुंडगी-हनुमान हिप्‍परगा -देगलूर येण्‍या-जाण्‍यासाठी वाहतुकीस चालू राहील. जड वाहनांस नांदेड-कंधार-जांब-जळकोट-उदगीर मार्गे लातुर/कर्नाटक येण्‍या-जाण्‍यासाठी वाहतुकीस चालू राहील. जड वाहनास नांदेड-कंधार-मुखेड-हिब्‍बट मार्गे खानापुर- देगलूर येण्‍या-जाण्‍यासाठी वाहतुकीस चालू राहील, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

विभागस्तरीय युवा महोत्सव स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- लातूर विभाग स्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन यंदा जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेडच्यावतीने नांदेड येथे दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. युवक महोत्सवाअंतर्गत नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हा या तिन्ही जिल्ह्याचे प्रथम, द्वितीय आलेले स्पर्धक हे विभागस्तरीय युवक महोत्सवामध्ये सहभाग घेणार आहेत. सुमारे तीनशे युवा स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती लातूर विभागाचे  क्रीडा व युवा सेवा विभागाचे उपसंचालक जगन्नाथ लकडे यांनी दिली आहे. 

या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 11 वा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यानंतर याच रंगमंचावर वैयक्तिक लोकगीत व समूह लोकगीत त्यानंतर वैयक्तिक व समूह लोकनृत्याची स्पर्धा भरणार आहे. या विभागस्तरीय युवा महोत्सवांमध्ये सर्व नांदेडकरांनी उपस्थिती राहून या सर्व कलाकृतींचा आनंद घ्यावा व विविध जिल्ह्यातून येणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन लातूर विभागाचे उपसंचालक क्रीडा व युवा सेवा विभागाचे जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. 

मंच क्रमांक दोन म्हणजे जिल्हा क्रीडा संकुल बास्केटबॉल कोर्ट येथे संकल्पना आधारित स्पर्धा, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या विषयास धरून प्रदर्शनी युवा कृती व विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यासोबत युवा कृतीमध्ये हस्तकला वस्त्रोद्योग ॲग्रो प्रॉडक्ट कृषीला प्राधान्य देत युवकांमध्ये हा संदेश जाण्यासाठी युवकांना कृषी क्षेत्रात प्रवृत्त करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

जिल्हा क्रीडा संकुल इंडोर हॉलमध्ये कथालेखन पोस्टर स्पर्धा व फोटोग्राफी स्पर्धा होतील. मंच क्रमांक एक वर म्हणजे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे 4.30 वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. त्यानंतर या सर्व स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सायं. 6 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

 0000


 विशेष लेख –

(भाग-1)

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023

नाचणीचे आहे आहारात महत्व

 

        यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. डिसेंबर महिना नाचणी या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. आरोग्यदृष्ट्याही नाचणी या तृणधान्याला महत्त्च आहे.

मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरड धान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि पारंपरिक दृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते आणि आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने भात आणि गहू या पिकांचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता वाढल्याने व आहार पद्धतीत झालेल्या बदलामुळे आजच्या काळात या भरडधान्य पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे.  

राज्यात या खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य पी आहेनाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून याचे शास्त्रीय नाव (इलुसिन कोराकाना) Eleusine coracana असे आहे.

नाचणी पिकाची वाढ व सामान्य माहिती:

नाचणी हे गवतवर्गीय कुळातील (Poaceaeमहत्वाचे पीक आहे. त्यामुळे या पिकाची वाढ होताना मुख्य खोडासोबत फुटवे येण्याचा गुणधर्म  आहे. या धान्याचा आकार लहान असून आकार हे एकदलवर्गीय पीक आहे. या पिकामध्ये स्वपरागीभवन प्रक्रियेदवारे बीज निर्मिती होते. सर्वच भरड धान्य पीके ही बदलत्या हवामानास अनुकूल पिके आहेत. या पिकांमध्ये सीपद्धतीने प्रकाश संश्लेषण (मकाऊसज्वारी) होते. त्यामुळे पानाद्वारे अन्ननिर्मिती करताना प्रकाशपाणी व कार्बन डायऑक्साइडचा सुयोग्य वापर या वनस्पतीमध्ये केला जातो. तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ठ वैशिष्ट्ये जसे की, कमी ऊंचीपानांचा लहान आकारकणिस व पाने यामध्ये अन्नपदार्थ पुरविण्यासाठी योग्य पद्धततंतूमय मुळांची खोल वाढ व प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म यामुळे या पिकांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे.

 

नाचणी पिकाच्या कणसातील विविधता:

नाचणीच्या कणसामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. हाताच्या बोटाप्रमाणे असलेल्या अनेक पाकळ्यांचे नाचणीचे कणीस तयार होते. प्रत्येक पाकळीमध्ये समांतर पद्धतीने फुले येतात. त्यापासून धान्य निर्मिती होते. फुलांच्या एका गुच्छामध्ये असलेली लहान आकाराची फुले पहाटेच्या वेळी उमलतात, त्यामुळे प्रामुख्याने फक्त स्वपरागीभवन पद्धतीने बीज निर्मिती होते.    

विविध स्थानिक भागात कणसामध्ये पाकळ्यांच्या रचनेनुसार विविधता आढळते. त्यामध्ये प्रामुख्याने बंद कणीस, थोडे उघडलेले, अर्धवट उघडे, पूर्ण उघडे असे प्रकार आढळतात. नाचणीच्या धान्याचा रंग हा प्रामुख्याने लालसर तपकिरी असतो. काही प्रमाणात पांढऱ्या रंगाच्या नाचणी वाणांची देखील लागवड केली जाते.

नाचणीपौष्टिक गुणधर्म : अ) प्रथिने व खनिज पदार्थ:

नाचणी व तत्सम तृणधान्य वर्गातील पिकांमध्ये पुढील प्रमाणे पौष्टिक तत्वे असतात. त्यात मानवी आहाराच्या दृष्टीने नाचणी हे एक अत्यंत महत्वाचे पौष्टिक तृणधान्य आहेनाचणीमध्ये कॅल्शियम (364 मि.ग्रॅ./100 ग्रॅमया खनिजाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे भात आणि गहू धान्याच्या तुलनते 10 पटीने अधिक आहेत्याचबरोबर मॅग्नेशियम (१४६ मि.ग्रॅ./१०० ग्रॅमव लोह (४.६२ मि.ग्रॅ./१०० ग्रॅमया खनिजाचे प्रमाण भात आणि गहू या धान्यापेक्षा अधिक आहे.

ब) जीवनसत्वे:

या पिकाचे आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. नाचणी धान्यामध्ये जीवनसत्व थायमिन बी-१ (०.३७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम), रायबोफ्लेवीन बी-२ (०.१७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) व फॉलिक असिड (३४.६६ µ.ग्रॅ./१०० ग्रॅम) याचे प्रमाण भात आणि गव्हापेक्षा पेक्षा जास्त आहे.

आहारातील महत्व: नाचणी- Finger millet (शास्त्रीय नाव: Eleusine coracana):

नाचणी हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य आहे. त्याचे काही पौष्टिक आणि आरोग्यदायी फायदे आहेत: पोषक तत्वांनी समृद्ध: नाचणी हे कार्बोहायड्रेट्सआहारातील तंतूमय पदार्थप्रथिनेजीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. त्यात कॅल्शियमलोह आणि फॉस्फरसचे प्रमाण विशेषतः जास्त असते. आहारातील तंतूमय पदार्थाचे उच्च प्रमाण: हे आहारातील तंतूमय पदार्थांचा उत्कृष्ट स्त्रोत आहेजे पाचन आरोग्यासाठी महत्वाचे आहे. तंतूमय पदार्थामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतेगॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरचा धोका कमी करते आणि पोट भरून ठेवते. वजन व्यवस्थापन मदत करते. ग्लूटेन-मुक्त: नाचणी नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त आहेज्यामुळे सेलिआक रोग किंवा ग्लूटेन संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींसाठी एक आदर्श पर्याय बनतो.

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध: यामध्ये फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्ससह विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतातजे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. रक्तातील साखर संतुलित करते: नाचणीचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतोयाचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकत नाही. हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेऊ पाहणाऱ्यांसाठी एक चांगली निवड बनवते. हृदयाचे आरोग्य: धान्यामध्ये तंतूमय पदार्थअँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि हृदयविकाराचा धोका कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देऊ शकते. हाडांचे आरोग्य: नाचणीमध्ये कॅल्शियम या खनिजाचे प्रमाण इतर भात, गहू, ज्वारी, बाजरी या सर्व तृण धान्यापेक्षा सर्वाधिक आहे. त्याच बरोबर फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतातजे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक असतात. गर्भधारणेसाठी पौष्टिक: उच्च लोह सामग्रीमुळेगर्भवती महिलांसाठी अशक्तपणा टाळण्यासाठी आणि गर्भाच्या निरोगी विकासास प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर आहे. वजन व्यवस्थापन: नाचणीमधील उच्च फायबर सामग्रीमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटू शकतेएकूण कॅलरीचे सेवन कमी होते आणि वजन व्यवस्थापनात मदत होते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते: नाचणीतील पोषक तत्वेविशेषत: अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजेरोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करतात. आतड्यांचे आरोग्य: नाचणीतील आहारातील तंतुमय पदार्थ देखील निरोगी आतड्यांतील जीवाणूच्या वाढीस व कार्यक्षमतेस प्रोत्साहन देतेजे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. पचण्यास सोपे: नाचणी धान्य सहज पचण्याजोगे आहेज्यामुळे पचन संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

(संदर्भ:- डॉ.योगेश बन व डॉ.अशोक पिसाळ, अखिल भारतीय समन्वीत नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

श्री.दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी

0000





प्रभावीपणे समाज माध्यमाद्वारे कार्य करणाऱ्या

युवकांशी जिल्हाधिकारी साधणार संवाद

 

·         मतदान जागृतीसाठी आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- सामाजिक सुरक्षितता व साक्षरतेसाठी सोशल मिडिया अर्थात समाज माध्यमांचा अत्यंत प्रभावी उपयोग अनेक व्यक्ती करीत आहेत. इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब, ब्लॉग आदी माध्यमांचा प्रभावी उपयोग करणाऱ्या युवक-नागरिक यांच्यासमवेत मतदान जनजागृतीसाठी चर्चा करता यावी व यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेता यावा या उद्देशाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत संवाद साधणार आहेत. दिनांक 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात हा संवाद दुपारी 5 वा. होईल. 

नांदेड शहरातील जे व्यक्ती राजकीय पक्षांसमवेत निगडीत नाहीत अथावा जे युवा, नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी नाहीत अशा युवकांनी-नागरिकांनी या विधायक उपक्रमासाठी मुक्त संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...