Tuesday, August 4, 2020


वृत्त क्र. 726 
लोहा तालुक्यात सात कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबनासाठी 
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर  

नांदेड, (जिमाका) दि. 4:- लोहा तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्रांनी तपासणीअंती उणिवांची पुर्तता न केल्याने या कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यासाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे गुण नियंत्रण निरिक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती लोहा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

खरीप हंगामात लोहा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात त्रुटी आढळल्याने कृषी सेवा केंद्रधारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. वारंवार सूचना देवूनही कृषी सेवा केंद्र दुकानदारांनी भावफलक, परवाना दर्शनी ठिकाणी न लावणे, भावफलक अपुर्ण भरणे, उगम  प्रमाणपत्र व प्रिंसिपल सर्टिफिकेट परवान्यात समावेश न करणे, गोदाम परवान्यात समाविष्ट न करणे, सत्यतादर्शक प्रमाणिकरण बियाणांचे प्रमाणपत्र न ठेवणे या उणिवांची पुर्तता न केल्याने लोहा तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.

परवाने निलंबनात  मे. माऊली कृषि सेवा केंद्र, कापसी बु., मे.भाग्यश्री कृषि सेवा केंद्र, सोनखेड, मे. साईबाबा फर्टिलायझर लोहा, मे. ओम साई कृषि सेवा केंद्र लोहा, मे. बारको कृषि सेवा केंद्र लोहा, मे. न्यु माऊली फर्टिलायझर्स, जुना मोंढा लोहा, मे. बालाजी फर्टिलायझर्स, मेन रोड लोहा  यांचा समावेश आहे, अशी माहिती दिली आहे.
00000





 वृत्त क्र.  725  
उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे अनोखे रक्षाबंधन साजरे
नांदेड, (जिमाका) दि. 4 :-  हदगाव उपजिल्हा रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्रातील अधिपरिचारिकांनी कोरोना बाधितांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. भाऊ-बहिणीच्या नात्याला उजाळा देणारा रक्षाबंधनाचा सण हदगाव कोविड आरोग्य केंद्रात अनोख्या पद्धतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 

स्वत:च्या संरक्षणासाठी बहिणीने भावाकडे घातलेले साकडे म्हणजे रक्षाबंधन. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आरोग्य केंद्रातील अधिपरिचारिकांनी कोरोना बाधितांची कोरोना रोगापासून सुटका व्हावी यासाठी त्या आरोग्य सेवा देत आहेत. कोरोना बाधित व्यक्तींना एकटे व परिवारापासून दूर असल्याची जाणीव होऊ नये यासाठी रक्षाबंधना सारख्या सणातून त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होत आहे.  

अधिपरिचारिकांनी राखीची भेट म्हणून बाधित भावाने सोशल डिस्टसिंगचे पालन करुन स्वच्छतेची काळजी घेऊन सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. याबाबत इतरांना परावृत्त करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. याबाबत हदगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसह, सर्व अधिपरिचारिकांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढगे यांनी कौतूक केले.
00000


कोरोनातून आज 37 व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 137 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  जिल्ह्यात आज 4 ऑगस्ट रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 37 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 137 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण  729 अहवालापैकी 573 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 2 हजार 496 एवढी झाली असून यातील 1 हजार 57 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 329 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 37 महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे.

सोमवार, दि. 3 ऑगस्ट रोजी  सिडको नांदेड येथील 56 वर्षाचा पुरुष खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना, मंगळवार 4 ऑगस्ट 2020 रोजी इस्लामपूर नांदेड येथील वय 45 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर विद्युतनगर येथील वय 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 97 एवढी झाली आहे.  

आज बरे झालेल्या 37 कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल  नांदेड येथील 1, बिलोली कोविड केअर सेटर 11, मुंबई येथील संदर्भित 1 , मुखेड कोविड केअर सेंटर येथील 7, नायगाव कोविड केअर सेंटर येथील 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 6, हैद्राबाद येथील संदर्भित 1, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 5, अशा एकूण 37 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये लोह तालुक्यात 03, भोकर तालुक्यात 03, देगलूर तालुक्यात 11, हदगाव तालुक्यात 12, कंधार तालुक्यात 01, नांदेड ग्रामणी 01, किनवट तालुक्यात 01, मुखेड तालुक्यात 09, नायगाव तालुक्यात येथे 08, उमरी तालुक्यात 03, नांदेड शहरी 18, उजैन मध्यप्रदेश 01, तोफखाना मस्जिद परिसर हिंगोली 01 याप्रमाणे 72 बाधित तर  अँटिजेन तपासणीद्वारे हिमायतनगर 18, लोहा 05, देगलूर 21, बिलोली 06, मुखेड 01, नांदेड शहर 14 असे याप्रमाणे अँटिजेन तपासणीद्वारे 65 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 329 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 126, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 472, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 41, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 70, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 33, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 107, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 102, लोहा कोविड केअर सेंटर येथे 7, हदगाव कोविड केअर सेंटर 90, भोकर कोविड केअर सेंटर 04, उमरी कोविड केअर सेंटर 14, कंधार कोविड केअर सेंटर येथे 15, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 29, किनवट कोविड केअर सेंटर येथे 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 11, मुदखेड कोविड केअर सेटर 10, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  खाजगी रुग्णालयात 147 औरंगाबाद येथे संदर्भित 05, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 1 तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 518,
घेतलेले स्वॅब- 17 हजार 758,
निगेटिव्ह स्वॅब- 13 हजार 537,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 137,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 496,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 12,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 07,
मृत्यू संख्या- 97,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 97,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 329,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 574. 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा परिपूर्ण करण्यासाठी
संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – पालकमंत्री अशोक चव्हाण  

जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा-सुविधांचा मंत्रालयस्तरावरुन
पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा  

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षात घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या.  

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर, जिल्ह्यातील तपासणी मोहिम, आरोग्यविषयक अत्त्यावश्यक असणाऱ्या सेवा सुविधा याचा आढावा घेऊन शासनस्तरावर लागणारी मदत तात्काळ उपलब्ध करुन देता यावी यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, वैद्यकिय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. कुलदिपराज कोहली यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या सर्व विभागा प्रमुखासमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी नांदेड जिल्ह्यात कुठल्याही वैद्यकिय सेवा-सुविधा कमी पडता काम नयेत याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. 

जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांना ज्या दराने कोविड संदर्भात औषधोपचार व हॉस्पिटलच्या खर्चाची मर्यादा आखून दिली आहे त्या मर्यादेत नांदेडच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा प्रकारची मागणी जिल्ह्यातील अनेक आर्थिक सक्षम असलेल्या वर्गाने केली आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या परिसरात यासाठी जागा उपलब्ध आहे. या जागेवर विद्युतीकरण, बेडस् व फर्निचर, इतर अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्यास जे लोक खाजगी दवाखान्यात खर्च देण्यापेक्षा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयासाठी खर्च करु इच्छितात त्यांना प्रायोगिक तत्वावर या सुविधा कशा देता येऊ शकतील याची पडताळणी करुन योग्य प्रस्ताव देण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना दिले.

शासकिय रुग्णालयातील स्वच्छतेबाबत अनेकांच्या तक्रारी आल्या असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे हा प्रश्न अधिक जटिल होण्याचे निदर्शनास आले आहे. स्वच्छतेचा हा प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकित खाजगीकरणातून हे काम करुन घेण्यास या बैठकित मंजुरी देण्यात आली. याचबरोबर जिल्ह्यात अधिपरिचारिकेची कमरता आहे. यासाठी नांदेड येथील नर्सींग कॉलेज यांच्याशी समन्वय साधून यातील गुणवत्ताधारक इच्छुकांना कोविड-19 च्या निर्देशांतर्गत सेवा घेण्यास वैद्यकिय सचिवांनी अनुमती दिली.      

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा दर आजच्या घडिला 14 टक्क्यांपर्यंत जरी असला तरी याची काळजी करण्याचे कारण नाही. या तपासण्या जितक्या अधिक प्रमाणात वाढतील त्या प्रमाणात बाधितांचे प्रमाण हे दहा टक्क्यांपर्यंत स्थिरावत कालांतराने कमी होत जाईल. प्राथमिक अवस्थेतच जितक्या लवकर निदान होईल तेवढे बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण सुधारेल, हे लक्षात घेत अधिकाधिक चाचण्यांवर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना दिले.
0000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...