Wednesday, May 31, 2023

 जिल्ह्यातील 2 हजार 620 महिलांचा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित  

 

·   शासन आपल्या दारी अभियानानिमित्त मंगलसांगवीत महिला मेळावा

·    महिला शक्ती एकवटली याचे समाधान- वर्षा ठाकूर-घुगे

·   1 हजार 310 ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी दोन कतृत्त्वान महिलांची स्थानिक समित्यांकडून निवड

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- महिला व बालविकासासाठी झटणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या समंजस कार्यशैलीचा गौरव व्हावा या उद्देशाने प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर दोन कर्तबगार महिलांचा आज गौरव करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या नावे महिला सन्मान पुरस्कार राज्यातील सर्व ग्रामपंचायत, गटग्रामपंचायतीमध्ये आज प्रदान करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 310 ग्रामपंचायत क्षेत्रातील 2 हजार 620 कतृत्त्वान महिलांचा या पुरस्काराने सन्मान झाला. ग्रामपंचाय पातळीवर स्थानिक समित्यांकडून पुरस्कारार्थींची निवड करून सर्व सहमतीच्या सकारात्मक कार्याचा नवापायंडा पाडला याचा मला मनापासून आनंद व समाधान असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

 

कंधार तालुक्यातील मंगलसांगवी या खेड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी जि.प. महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, पुरस्कार प्राप्त स्नेहलता उपाध्ये, चौतराबाई वाघमारे, सुनित्रा कदम व मान्यवर उपस्थित होते.  

 

जिल्ह्यात महिला बचतगटाचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. लाखो महिला बचतगटाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साध्य करून घेत आहेत. कुटुंबातील एक महिला पुढे आली तर संपूर्ण कुटूंब पुढे येते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या जीवन कार्यातून महिला कतृत्त्वाचा आदर्श मापदंड निर्माण करून दिला आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या आदर्शाला अधोरेखीत करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत कामाचा आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. शासनाची यामागची भूमिका ही महिला शक्तीच्या कतृत्त्वाला चालना देण्याची असून हे पुरस्कार यापुढेही सुरू राहतील, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

 

नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन महिलांची निवड या गौरवासाठी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त हे पुरस्कार आज वितरीत करण्यात आले. मंगलसांगवी येथील कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती सांगून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी आपल्या मनोगतात शासनाच्या योजनांची माहिती दिली.

 

समाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय व्यक्तीसाठी असलेल्या दुग्ध व्यवसाय योजनांच्या चार लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्राचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ व रोख रक्कम 500 रु. प्रती महिला याप्रमाणे पुरस्काराचे स्वरूप आहे. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट / उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिला, सदर महिला या त्या ग्रामपंचायतीतील / गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी, अशी अट पुरस्कारासाठी ठेवण्यात आली. महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असणाऱ्या कतृत्त्वान महिला पुरस्कारासाठी पात्र असतील. बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचतगट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे महिलांनी पुढाकार घेतलेला असावा. याचबरोबर त्यांचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती / गट ग्रामपंचायतीमध्ये किमान 3 वर्ष कार्य केलेले असावे, असे अटी व नियमामध्ये शासन निर्णयात स्पष्ट केलेले आहे.  

000000





Tuesday, May 30, 2023

शासन आपल्या दारी अभियानात समाज कल्याण विभाग विविध उपक्रम राबविणार

 शासन आपल्या दारी अभियानात

समाज कल्याण विभाग विविध उपक्रम राबविणार

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- संपूर्ण राज्यात शासन आपल्या दारी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. या अभियानात नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

या अभियानात दिव्यांग कल्याण व पुनर्वसन योजना जिल्हा परिषद 5 टक्के सेस निधीतून 616 लाभार्थी, जिल्हा परिषद उपक्रर 20 टक्के मागासवर्गीय निधी सन 2022-23 अंतर्गत 43 मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अनुदान, जिल्हा परिषद उपकर 20 टक्के मागासवर्गीय निधी सन 2022-23 अंतर्गत 65 लाभार्थ्यांना गाय/म्हैस खरेदीसाठी अनुदान तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नांदेड यांच्या माध्यमातून 10 अंध लाभार्थ्यांना स्मार्ट केन, गरजू 10 दिव्यांग लाभार्थ्यांना व्हील चेअर तसेच 10 दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकलचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप केले जाणार आहे असे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

कापूस लागवड 1 जूननंतर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 कापूस लागवड 1 जूननंतर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात कापूस पिकाचे 1 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. गतवर्षीची कापूस उत्पादकता विचार घेता कापूस पिकाचे क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कापूस पिकाची लागवड नगदी पिक म्हणून केली जाते.

कापूस पिकाची उत्पादकता मागील काही वर्षापासून गुलाबी बोंडअळीमुळे कमी झालेली आहे. येत्या खरीप हंगामात कापूस पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी व चांगल्या प्रकारे उत्पादन होण्यासाठी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्की पावती घेवूनच करावी. तसेच कापूस पिकाची लागवड 1 जूननंतरच करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी बि.बी. भोसले यांनी केले आहे.

0000  

मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे 

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- राज्यात मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतूसुविधा केंद्र, गावातील कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

लाभार्थी पात्रता

अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळेसामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची पध्दत

महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईलसंगणकलॅपटॉपटॅबलेटसामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

शेततळयासाठी आकारमान

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी कमाल मर्यादा रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. शेततळयाच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील. रक्कम 75 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील. जिल्ह्यात आज पर्यत सन 2022-23  व 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 376 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. यापैकी किनवट तालुक्यात 2 व माहूर तालुक्यात 1 असे एकूण 3 शेतकऱ्यांना काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान त्यांचे वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  या योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Monday, May 29, 2023

 अपघात संदर्भातील एमएलसी आता

जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनला

 

·   खासदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकिय सुविधांबाबत बैठक    

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :-  नांदेड महानगरातील वैद्यकिय सेवा-सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. वैद्यकिय क्षेत्रातील व्यावसायिक अडचणी व यासंदर्भात शासनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांचा निपटारा जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनासमवेत एकत्र बसून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. पर्यावरणासंदर्भात काही प्रश्न हे केंद्र सरकारशी संबंधीत असून यासाठी दिल्ली येथे वेळप्रसंगी संबंधीत विभागासमवेत नांदेड आयएमएची बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावू असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले.  

 

नांदेड शहरातील डॉक्टरांच्या विविध समस्यांबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्र. जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मनिष देशपांडे, डॉ. सुधीर कोकरे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, व्यंकटेश गोजेगावकर, प्रवीण साले आदी उपस्थित होते.

 

कोणत्याही अपघातात रुग्णांवर तातडीने उपचाराला प्राधान्य देणे हे कोणत्याही रुग्णालयाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य आणखी चोख पार पाडता यावे यासाठी महानगराच्या हद्दीत कोणत्याही पोलीस स्टेशनला एमएलसी (न्याय वैद्यकिय प्रमाणपत्र) प्रक्रिया करता येईल, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महानगरातील संबंधीत पोलीस स्टेशन प्रमुखांना दिले. याचबरोबर पोलीस विभागाशी तात्काळ संपर्क साधता यावा यादृष्टीने 112 क्रमांकावर डायल करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही स्थितीत नागरिकांची, व्यावसायिकांची अडचण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.   

 

महानगरपालिकेच्या हद्दीत डॉक्टरांना व्यवसाय परवानाची सक्ती, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार अग्निशमन नाहरकत प्रमाणपत्र नुतनीकरण, विविध परवानासाठी नांदेड मनपाकडून आवश्यक असणारी सुसूत्रता व एक खिडकी योजना, एमएलसीसाठी जवळच्या पोलीस स्टेशनचा पर्याय, मल निस्सारण प्रकल्पाची सक्ती याबाबत आयएमएतर्फे शासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनाबाबत जिल्हा प्रशासन पातळीवर विचार होऊन येथील प्रश्न जिल्हा पातळीवरच निकाली निघावेत यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हा प्रशासनाला कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी ही बैठक बोलावली होती.

00000




 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे बुधवारी भोकर येथे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 29 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकर यांच्यावतीने इयत्ता दहावी, बारावी तसेच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार 31 मे 2023 रोजी माउली मंगल कार्यालय, किनवट रोड भोकर येथे सकाळी 10 वा. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
या शिबिरात प्रामुख्याने दहावी-बारावी नंतरच्या विविध अभ्यासक्रमातील शैक्षणिक संधी, स्थानिक शैक्षणिक संस्थेची माहिती, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना, रोजगार व स्वयंरोजगारासाठी कर्ज विषयक योजना, कलमापन चाचणी तसेच परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीच्या विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. भोकर विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन भोकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केले आहे.
0000

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- ३१ मे हा जागतिक तंबाखू नकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने इंडियन डेंटल असोसिएशनशासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ३१ मे रोजी सकाळी ६ ते ७ पर्यंत सायकल रॅली व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिनाचे औचित्य साधून तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीपर चित्रकला ३० मे रोजी सायं. ५ वाजेपर्यंत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षश्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयवजिराबादनांदेड येथे प्रत्यक्ष जमा करावेत. ही सायकल रॅलीप्रभात फेरी व चित्रकला सहभाग सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ३१ मे रोजी सर्व नोंदणीकृत डेंटल क्लिनिक मध्ये तंबाखू व्यसन असलेल्या व्यक्तींसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्ष यांनी कळविले आहे.

 

00000

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती मोहिमेच्या चित्रफीतीचे उदघाटन

                                          डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

जनजागृती  मोहिमेच्या  चित्रफीतीचे उदघाटन

नांदेड (जिमाका) दि. 29 :- वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत विविध आरोग्य विषयक जनजागृती मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यभर राबविल्या जाणाऱ्या या जनजागृती अभियानासाठी एल.ई.डी. व्हॅनद्वारे प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे. नांदेड जिल्हयामध्ये 31 मेपर्यंत विविध ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आरोग्य विषयक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी एल.ई.डी. व्हॅनची सेवा शासनाद्वारे देण्यात आली आहे. या एल.ई.डी. व्हॅनद्वारे दाखविण्यात येणाऱ्या चित्रफितीचे उदघाटन नुकतेच प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ तथा अधिष्ठाता डॉ. एस.आर.वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.


यामध्ये थायरॉईडस्तन कर्करोगअवयवदानरक्तदानस्वच्छमुख अभियान व स्थुलपणा या विषयांवर आरोग्याशी निगडीत चित्रफीतीद्वारे विविध भागामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. आजघडीला जनसामान्यामध्ये आरोग्य विषयक योग्य आणि शास्त्रीय माहिती पोहचविणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य विषयक जागृती वेळेवर मिळाल्यास अनेक दूर्धर आजार आणि मृत्यु रोखता येणे शक्य आहेअसे प्रतिपदान अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी केले. नांदेड जिल्हयामध्ये चार दिवस चालणाऱ्या या प्रचार आणि प्रसार कार्यक्रमासाठी रविवारी वैद्यकीय महाविद्यालय परिसरइतवारा बाजारश्यामनगर या ठिकाणी एल.ई.डी. व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. आर.डी. गाडेकर डॉ. आय.एफ. इनामदारआर.एम.ओ डॉ. अभिजीत देवघरेडॉ. ज्ञानोबा जोगदंडडॉ. कपिल गोरेडॉ. पुजिताडॉ. सानिया   डॉ. देवीडॉ. ऐश्वर्यावैद्यकीय सेवा अधीक्षक वानखेडे यांनी मेहनत घेतली आहे.

0000

 

बारावी विज्ञान शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बुधवारी सायन्स महाविद्यालयात कार्यशाळा

 बारावी विज्ञान शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी

बुधवारी सायन्स महाविद्यालयात कार्यशाळा 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- बारावी विज्ञान शाखेतून 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये गणित विषयासह 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड व एचसीएल टेक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 31 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वा. सायन्स कॉलेज, नांदेड येथे कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व नोंदणीसाठी आमंत्रित केले आहे. अधिक माहितीसाठी 9370064979 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.  

 

दिनांक 6 जून 2022 रोजी महाराष्ट्र शासनसमग्र शिक्षा अभियान, मुंबई यांचा एचसीएल टेकनॉलॉजिज सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार 40 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही संख्या रोज वाढतच आहे.  एचसीएल टेक्नॉलॉजिज सारख्या वरिष्ठ आयटी कंपनीने सुरु केला आहे. अर्ली करिअर प्रोग्रॅाम (बारावीनंतर नौकरी) एचसीएल-टेकबी या उपक्रमानुसार बारावी सायन्समध्ये गणित विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा व मुलाखतची कार्यवाही होवून पास झाल्यानंतर सःशुल्क 6 महिने प्रशिक्षण व 6 महिने लाईव्ह प्रोजेक्ट (इंटरशिपवर काम करण्याची संधी सोबत 10 हजार रुपये स्टायपेंड (ड्युरींग इंटरशिप) मिळतो. अशाप्रकारे एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच या कंपनीमध्ये आयटी प्रोफेशनल म्हणून पूर्ण वेळ नाेकरी २.२ लाख रुपये प्रति वर्ष पगार व सोबतच उच्चशिक्षण घेण्यासाठी नियोजन केलेले आहे. त्यासाठी विद्यार्थी बिट्स पिलानी/शास्त्रा/अमिटी/आयआयएम-नागपूर अशा जगातील नामवंत विद्यापीठामधून उच्च शिक्षण घेऊ शकतात. उच्चशिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशिप स्वरूपात देणार आहे. या उपक्रमात सामील होण्यासाठीचा खर्च बँका एजुकेशन लोन स्वरूपात देतील व त्याची परतफेड एक वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या पगारातून होईल असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन

                                                     बियाणे, रासायनिक खतेकिटकनाशके

खरेदी करताना शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गुणवत्ता  दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे, रासायनिक खतेकिटकनाशके औषधे खरेदी करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले यांनी केले आहे.

 

शेतकऱ्यांनी बनावट,  भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करावेत. पावतीवर शेतकऱ्याची  विक्रेत्याची स्वाक्षरी  मोबाईल नंबरची नोंद करुन पिक निघेपर्यंत पावती ांभाळून ठेवावी.   खरेदी केलेल्या बियाणचे वेष्टन/पिशवी,  टॅग, खरेदीची पावती  त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पॉकेट सिलबंद/मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतीम मुद्दत पाहून घ्या  सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरी तपासणी करुन पेरणी करावे. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतीम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोननंबर दिलेले आहेत.  अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावाअसेही आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

 इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे

आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 29 :- इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रु-मार्च 2023 परीक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थीयापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेतअसे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखानियमित शुल्क शुक्रवार 9 जून 2023 पर्यत आहेत. विलंब शुल्क शनिवार 10 जून ते 2023 ते बुधवार 14 जून 2023 असा आहे.

उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखागुरुवार 1 जून 2023 ते गुरुवार 15 जून 2023उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख शुक्रवार 16 जून 2023 आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाइ्रन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवाररी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीनुसार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रु-मार्च 2023 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट 2023 व फेब्रुवारी-मार्च 2024 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयानी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...