Tuesday, May 9, 2023

 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या

माध्यमातून भक्ती लॉन्स येथे समुपदेशन मेळाव्याचे आयोजन


नांदेड (जिमाका) दि. 8 :- छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात बुधवार 10 मे रोजी भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, तरोडा (खु) नांदेड येथे समुपदेशन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी https://mahacareer.globalsapio.com/  या गुगल फार्म लिंकवर नोंदणी करुन मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणवीर यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 5 हजार प्रशिक्षणार्थ्यांसाठी या समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात दहावी, बारावीनंतरचे, महाविद्यालयीन शिक्षण व इतर अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, कर्ज योजना माहिती करिअर प्रदर्शन या विषयावर तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. जास्तीत विद्यार्थी व प्रशिक्षणार्थ्यांनी या मेळाव्यास नोंदणी करुन सहभागी व्हावे, असेही संयोजक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

00000

 कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी

मतदारांना मतदान करण्यासाठी बुधवारी सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 9 :- भारत निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2023 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी बुधवार 10 मे 2023 रोजी मतदान होणार आहे. कर्नाटक राज्‍यातील जे मतदार महाराष्‍ट्र राज्‍यातील सीमा लगतच्‍या (सिंधुदुर्गकोल्हापुरसांगली, सोलापुर, उस्‍मानाबादलातुर व नांदेड ) जिल्‍हयात कार्यरत आहेत. तथापि ज्यांची नावे कर्नाटक राज्‍यातील मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट आहेत, अशा मतदारांना मतदानाचा हक्‍क योग्‍य रितीने बजावता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय राहील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 0000

 भविष्यातील आव्हाने व विकासाच्या संधीचा वेध घेणारा जिल्ह्याचा व्हिजन आराखडा होणार साकार

▪️विकासासमवेत स्वयंरोजगाराच्या संधी देणाऱ्या
क्षेत्रावर भर - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 9 :- देशाच्या क्रमवारीत महाराष्ट्राने विविध क्षेत्रात आपला अपूर्व ठसा उमटविलेला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची विविधता व संधी लक्षात घेऊन नांदेडचा वैशिष्ट्यपूर्ण असा व्हिजन आराखडा आपल्या अभ्यासपूर्ण अनुभवातून मांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भविष्यातील विकासाच्या संधी, स्वयंरोजगारासाठी उपलब्ध होणारे मार्ग, यासाठी जिल्ह्याची असलेली बलस्थाने, संधी, धोके व आव्हाने लक्षात घेऊन 25 वर्षानंतरही परिपूर्ण ठरेल असा आराखडा तयार होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विकास आराखडा बाबत डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील शिक्षण, कृषि, कृषिपूरक उद्योग, पर्यटन, वैद्यकियक्षेत्र, ऐतिहासिक वारसा, अध्यात्मिक शक्तीस्थळे, सिंचन, वने, आदिवासी क्षेत्र आदीबाबत भविष्यातील विविध संधी जाणून घेण्याच्यादृष्टिने या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
नांदेड जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. चालुक्यापासून इतिहासाच्या पाऊल खुणा इथे उपलब्ध आहेत. कृषिक्षेत्राने आपली जागतिक ओळख निर्माण केली आहे. नांदेड जिल्हातील जंगल, वनसंपदा, वन्यजीव, विविध धरणे, पुरातन मंदिरे, भक्कम शिल्पकला असलेली मंदिरे, शिक्षण, वैद्यकिय क्षेत्रात निर्माण झालेले क्लासेसचे जाळे हे सारे लक्षात घेता मोठ्याप्रमाणात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर कृषिक्षेत्रालाही अनुभव आणि तंत्रकुशल युवकांची गरज निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून भविष्यातील 25 वर्षानंतरच्या काळाला पुरून उरेल असा भव्य विकास आराखडा तयार करून आपण आतापासूनच कामा लागू यात, असा आशावाद जिल्हाधिकारी राऊत यांनी बोलून दाखविला.
000000



 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 9 :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड (आयटीआय) यांच्यावतीने छत्रपती शाहू   महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे आयोजन बुधवार 10 मे रोजी भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे सकाळी 10 वा. करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्रातील 288 मतदार संघात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर बाबत समुपदेशन मेळावा आयोजित केला आहे. भक्ती लॉन्स येथे आयोजित या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सहसंचालक सतीश सुर्यवंशी यांची उपस्थिती असणार आहे.  

या मेळाव्यात दहावी, बारावीनंतरचे, महाविद्यालयीन शिक्षण व इतर अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, कर्ज योजना माहिती करिअर प्रदर्शन या विषयावर तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.  शाळा, महाविद्यालय व ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी मोठया संख्येने क्यआर कोड स्कॅन करुन आपली नोंदणी करावी किंवा https://mahacareer.globalsapio.com/  या गुगल फार्म लिंकवर नोंदणी करुन मेळाव्यात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...