Tuesday, October 12, 2021

अपघातातील हिरकणीना सावरण्यासाठी जेंव्हा जिल्हा प्रशासन धावून जाते

 

अपघातातील हिरकणीना सावरण्यासाठी जेंव्हा

जिल्हा प्रशासन धावून जाते

 

नांदेड, (जिमाका) 12 :- नवरात्र उत्सवानिमित्त रोजच्या सारखी आजची सकाळही तशीच भारलेली होती. नांदेडहून माहुरकडे जाणाऱ्या रस्त्याला नकळत एक भक्तीचा संदर्भही तेवढाच प्रसन्नता देणारा होता. आज या राष्ट्रीय महामार्गावरुन सातारा येथून निघालेल्या हिरकणींचा एक गट दुचाकी वाहनावरुन माहुरगडाकडे निघाला होता. तुळजापूरचे दर्शन करुन नऊ महिला व तीन पुरुष असे बारा सदस्य असलेला गट दिनांक 11 ऑक्टोबर रोजीच रात्रीला नांदेडच्या मुक्कामाला होता. मुक्काम करुन हा गट राष्ट्रीय महामार्गाने भोकर मार्गे माहुरकडे आज सकाळी 8.00 ला नांदेड येथून रवाना झाला.

 

महिलांच्या आरोग्याची काळजी व विशेषत: ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षितता याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा हे ध्येय घेऊन या हिरकणी निघाल्या होत्या. सकाळी नऊच्या सुमारास हा महिला हिरकणी रायडर्सचा गट नांदेड अर्धापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भोकर फाट्याजवळ पोहोचला. येथील शिवाजी महाराज चौकात यातील एक हिरकणी मोठ्या कंटेनरच्या अपघातात बळी पडली. क्षणाचाही विलंब न करता स्थानिक प्रशासन यांनी धावपळ करुन इतर हिरकणींना धीर देऊन या आघातातून सावरण्यासाठी बळ दिले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना ही माहिती अपघात झाल्याच्या काही क्षणांतच दुरध्वनीद्वारे कळाली. त्यांनी तात्काळ तालुका दंडाधिकारी किरण अंबेकर यांना सूचना देऊन आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले. ज्यांच्यासमोर अपघात झाला त्यातील आठ हिरकणी व इतर सदस्यांना एका विशेष वाहनातून नांदेड येथे आणण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी महिला नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांना दिवसभर व्यवस्था होईपर्यंत मदतीसाठी ठेवण्यात आले.

 

अपघातासंदर्भात अत्यावश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया व यात बळी पडलेल्या हिरकणी शुभांगी संभाजी पवार हिचे शवविच्छेदन व कायदेशीर बाबी पुर्ण करुन जिल्हा प्रशासनाने विशेष अँम्बुलंसद्वारे हे पार्थिव साताऱ्याला रवाना केले. याचबरोबर गटात असलेल्या इतर हिकरणींना धीर देऊन एका विशेष वाहनाने या दुखात सहभागी होत त्यांनाही विशेष वाहनाने आज सायंकाळी पाच वाजता रवाना केले. त्यांची दुचाकी वाहने इतर वाहनाद्वारे पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनतर्फे व्यवस्था केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

या अपघाताने आम्ही सुन्न पडलो आहोत. जवळची एक हिरकणी आम्ही गमावली आहे. अपघात झाल्याबरोबर जिल्हा प्रशासन ज्या तत्परतेने धावून आले म्हणून आम्हाला सावरता आले अन्यथा आमचे सारेच अवघड होते. अशी भावून प्रतिक्रीया या गटातील मोना निकम हिने दिली. मोना निकम या सातारा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.

000000

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 1  व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाले बरे


नांदेड (जिमाका) दि. 12:- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 692 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 345 एवढी झाली असून यातील 87 हजार 675 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 18 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 18 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 42 हजार 164

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 38 हजार 646

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 345

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 675

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-18

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

देगलूर विधानसभा मतदार संघात 21 उमेदवारांचे अर्ज दाखल

 

देगलूर विधानसभा मतदार संघात 21 उमेदवारांचे अर्ज दाखल

 

नांदेड दि. 12 : बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापुरकर, भाजपाचे सुभाष साबने, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम रामाराव इंगोले, जनता सेक्युलर पक्षाचे विवेक केरूरकर, बहुजन भारत पार्टीचे परमेश्वर वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डी.डी.वाघमारे, आंबेडकर नॅशनल पार्टीचे प्रल्हाद हाटकर, अपक्ष म्हणून अरूण दापकेकर, साहेबराव गजभारे, धोडिंबा कांबळे,भगवान कंधारे, सूर्यकांत भोरगे, रामचंद्र भराडे, मारोती सोनकांबळे, रामचंद्र भराडे, आनंदराव रूमाले, अँड . लक्ष्मण देवकरे, विमल वाघमारे, पिराजी शाबुकसार, विश्वंभर वरवंटकर, सदाशिव भुयारे, सिध्दार्थ हाटकर यांनी आज अर्ज दाखल केले.

0000

संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे चित्रिकरण करण्यास प्रतिबंध

 

संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे चित्रिकरण करण्यास प्रतिबंध 

नांदेड दि. 12 : संवेदनशील व महत्वाच्या  ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन चित्रिकरण करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत 12 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे.

सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन आवश्यक  असलेले जिल्ह्यातील मर्मस्थळे, आस्थापना, मंदिरे व महत्वाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. डॉ.शंकराराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प नांदेड, दुरदर्शन केंद्र राजेंद्र नगर किनवट  वर्गवारी, आकाशवाणी केंद्र वरसणी नांदेड  वर्गवारी, 220 के.व्ही.उपकेंद्र वाघाळा नांदेड यांचा समावेश आहे.

 ब वर्गवारीतील आस्थापना - श्री गुरू गोंविदसिंघजी विमानतळ नांदेड, डॉ.शंकराराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  नांदेड, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड, रेल्वे स्टेशन नांदेड,  पी.व्ही.आर मॉल लातूर फाटा नांदेड, डी मार्ट कॅनालरोड नांदेड

महत्वाची धार्मिक स्थळे  सचखंड गुरूव्दारा नांदेड, रेणुकामाता मंदिर संस्थान , दत्तशिखर मंदिर , संस्थान माहुर ता.माहुर जि.नांदेड, हेमाडपंथी महादेव मंदिर होटल ता.देगलूर जि. नांदेड या धार्मिक स्थळे यांची सुरक्षा लक्षात घेवून संभाव्य हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने वरील ठिकाण प्रतिबंध क्षेत्र घोषित म्हणून चित्रिकरणास मनाई करण्यात आली असून ड्रोण उडविणे यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अतंर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू  करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...