Saturday, December 5, 2020

 

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम

नवीन मतदारांना मतदार यादीत

नाव समाविष्ट करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- मा. निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. त्याअंतर्गत दिनांक 5 व 6 डिसेंबर तसेच 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सर्व बिएलओ हे मतदान केंद्रावर बसणार आहेत. मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेवून नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे. 

या अनुषंगाने यशवंत महाविद्यालय नांदेड येथे विशेष कॅम्पचे आयोजन आज करण्यात आले होते. या कॅम्पचे उद्घाटन औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय सहाय्यक आयुक्त आर. एच. अहिरे  यांच्या हस्ते करण्यात आले. या कॅम्पमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली असून मतदारांनी आपले दावे व हरकती तहसिल कार्यालय नांदेड येथे 15 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. दावे व हरकती 5 जानेवारी 2021 पर्यंत निकाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी नायब तहसिलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी, यशवंत कॉलेजचे प्राचार्य श्री. शिंदे, श्रीमती कविता इंगळे, तलाठी श्री. गाढे यांच्यासह इतर मतदार उपस्थित होते. 

00000

 

उमरी येथे 18 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही

21 हजार 100 रुपयाचा दंड आकारला   

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने उमरी येथे अचानक धाडी टाकून 18 तंबाखू विक्रेत्यांकडून 21 हजार 100 रुपये दंड आकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवावी. जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास व कोरोना संक्रमनास प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

या कार्यवाहीची माहिती मिळताच शहरातील अनेक पानटपरीधारकांनी पळ काढला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील मुजळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. 

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास अथवा धुम्रपान केल्यास कोरोना संक्रमनाचा धोका वाढतो. देगलूर शहर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात नोडल अधिकारी डॉ. पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर तसेच ग्रामीण रुग्णालय उमरी येथील डॉ. मोरे, डॉ. पूजा काळे तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार श्री कोठुळे, पो.कॉ. संतोष वागतकर,श्री उसकलवाड  श्री दिनकरवाड आदी होते.

00000

 

कृषि विभागाच्यावतीने जागतिक मृदा दिन साजरा

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- राज्य शासनाच्या कृषि विभागांतर्गत नांदेडचे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी यांच्यावतीने जिल्हास्तरीय शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते.  

शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य सांभाळावे माती-पाणी परिक्षण करुन घेणे काळाजी गरज असून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषि पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम रावणगावकर यांनी केले. 

शेतकऱ्यांना माती परिक्षणासाठी नमुना कसा घ्यावा तयार झालेल्या आरोग्य पत्रिकाप्रमाणे अन्नद्रव्यांचा संतुलित वापर कसा करावा याविषयी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञा श्रीमती बी. आर. गजभिये यांनी दिली. 

जिल्ह्या जमिन आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबी तसेच घेण्यात येणारे प्रशिक्षण, मेळावे आदीची माहिती देऊन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक डॉ. देवसरकर डी.बी. यांनी विद्यापीठातील नव संशोधित वाणांची माहिती देवून जमिनीतील सेंद्रीय कर्ब कसा वाढवावा याविषयी मार्गदर्शन केले. 

प्रास्ताविक जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी श्रीमती ए.एस. गुंजकर यांनी केले. यावेळी कृषि उपसंचालक श्रीमती एम. आर. सोनवणे, पंचायत समिती सभापतीचे प्रतिनिधी नारायण वाघमारे, तालुका कृषि अधिकारी श्री मोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वसंत जारिकोटे यांनी केले तर शेवटी एस. ए. शिंदे यांनी आभार मानले.  कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी एन.डी. बारसे, डी. के. चिंतावार, श्रीमती सोनवणे, श्रीमती सुर्यवंशी, डी. बी. पाटील, श्री. पडलवार, संतोष मंन्नोवार, अनुसयेश तपासे यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000





 

43 कोरोना बाधितांची भर तर

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 18 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 1 हजार 38 अहवालापैकी 952 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 559 एवढी झाली असून यातील 19 हजार 476 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 339 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 13 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 550 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 18, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, मुखेड कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 2 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 17, लोहा तालुक्यात 2, वसमत 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 3, यवतमाळ 1 असे एकुण 25 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 12, लोहा तालुक्यात 3, मुदखेड 1, कंधार 2 असे एकुण 18 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 339 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 33, मुखेड कोविड रुग्णालय 20, किनवट कोविड रुग्णालय 2,  हदगाव कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 75, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 134, खाजगी रुग्णालय 19 आहेत. 

शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 184, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 56 हजार 647

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 32 हजार 54

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 559

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 476

एकूण मृत्यू संख्या- 550

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-487

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-339

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-13. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...