Sunday, May 19, 2019


जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा
दुष्काळ निवारणाच्या कामाला प्राधान्य द्यावे
-         पालक सचिव एकनाथ डवले

नांदेड दि. 19 :- टंचाईकाळात नागरिकांशी संवाद साधणे आवश्यक असून नागरिकांना पिण्याचे पाणी, रोजगार, चारा छावणी यासारखी महत्वाची कामे हाती घेऊन दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्राधान्यांनी कामे करावीत, असे निर्देश मृद, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठक पालक सचिव श्री. डवले यांचे अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांचेसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालक सचिव श्री. डवले पुढे म्हणाले, यावर्षी मान्सूम पुढे जाण्याची शक्यता असून त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. मागणीनुसार नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा यंत्रणेची असून यासंदर्भात नागरिकांची कोणतीही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. ज्या ठिकाणी पाणीटंचाईची कामे सुरु आहेत ती वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही प्रस्तावित करावी. ग्रामीण भागात 30 जून पर्यंत तर शहरी भागात 31 जुलै पर्यंत पाणी पुरवठा होईल असे नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात टँकर, विंधन विहिर, बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच नळयोजना दुरुस्तीची प्रस्तावित असलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत. जेणेकरुन नागरिकांना पाणी पुरवठा करणे सोयीचे जाईल. जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा, बोअर व विंधन विहिर अधिग्रहणाची देयक संबंधितांना त्वरीत अदा करावे त्यामुळे नियमित पाणी पुरवठा सुरु राहिला पाहिजे, असे निर्देश दिले.      
राज्यात दुष्काळ सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. पाण्याचा वापर करतांना काटकसरीने वापर करावा. प्रकल्पातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी आरक्षीत करण्यात आले असून शेती, उद्योगासाठी प्रकल्पातून पाणी उपसा करु नये, असे आवाहन श्री. डवले यांनी यावेळी केले. याकाळात अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमित आढावा घेतला जात असून जिल्ह्यात विविध पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर व उमरी तालुक्यातील सरपंचाशी ऑडिओ ब्रीजद्वारे संवाद साधला होता. संवादातून या तीन तालुक्यातील 23 गावातील सरपंचानी चारा छावणी, बोअर अधिग्रहण, टँकर मिळणे, पाणी पुरवठा योजना, बंधारा, जनावरांना पाणी, नरेगासह आदी कामांची मागणी केली होती त्या कामांचा  तसेच जलयुक्त शिवार, रोहयोच्या कामांचा आढावा श्री. डवले आढावा श्री. डवले यांनी यावेळी घेतला.      
विष्णुपुरी जलाशयासह मुखेड तालुक्यात टंचाई गावांची पाहणी
पालक सचिव श्री. डवले यांनी असना व विष्णुपुरी जलाशयातील पाण्याच्या पातळीची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर मुखेड तालुक्यातील मोटरगा, बोरगाव, भगनुरवाडी व तांदळीतांडा या गावातील नागरिकांशी संवाद साधून टँकर, पाणीटंचाई व मनरेगाच्या कामांची पाहणी केली. गावात जलसंधारणाची जास्तीतजास्त कामे हाती घेतल्यास टंचाई परिस्थितीवर मात करता येईल, असे सांगून मुखेड तालुक्यात चारा छावणीची मागणी लक्षात घेऊन ती सुरु करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.    
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले. नांदेड शहराला महानगरपालिकेच्यावतीने दर चार दिवसाला पाणी पुरवठा केला जात आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे निर्देशात आले आहे. नागरिकांनी नळाला तोट्या बसवाव्यात, आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाण्याची बचत करावी. विष्णुपुरी जलाशयात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार महापालिकेने येत्या 25 जुलै पर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी सुचना श्री. डवले यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषद, नगरपालिका यांनी नियोजन करावे. सुनेगाव तालावातून पाण्याच्या नियोजनासाठी तलावात विहिर, बोर तसेच चराची कामे घेऊन तलावातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न करुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
सुरुवातील जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी टंचाई संदर्भात प्रास्ताविक करुन जिल्ह्यात पाणी व टंचाई संबंधीत असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे नमूद केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेबाबत सुरु असलेल्या कामांविषयी माहिती दिली. 
00000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...