Monday, April 24, 2023

 लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य

- जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह राणा
▪️देगलूर तालुक्यातील शहापूर येथे जल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया
नांदेड, (जिमाका) दि. 24 :- ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरची गावातही समृद्धी प्रत्ययास येते. नदीला ज्या गावकुशीमध्ये स्वातंत्र्य असते तेथील समाजही अधिक प्रगल्भ व सभ्यता बाळगून असतो. मात्र जिथे नदीला स्वातंत्र्य उरत नाही तिचे तिथे समाजालाही उजाडपण येते या शब्दात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी नदीच्या अस्तिवाप्रती वास्तवाचे भान आणून दिले. “चला जाणुया नदीला” या अभियानांतर्गत देगलूर तालुक्यातील शहापूर येथे आयोजित जलग्राम सभेत ते बोलत होते.
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव ग्रामसभेची रूजूवात राजेंद्रसिंह यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, शहापुरचे सरपंच वंदना माडपत्ते, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष तथा जलनायक प्रमोद देशमुख, तहसीलदार राजाभाऊ कदम, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, डॉ. सुमंत पांडे, नदी प्रहरी शिवाजी देशपांडे, वसंत रावणगावकर, यादव बोरगावकर, कैलास येसगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मन्याड नदीच्या काठावरही कधीकाळी श्रीमंती होती. इथल्या नदीकडे जसे दुर्लक्ष झाले तसे इथल्या समृद्धीला आळा बसत गेला. समाजाबरोबर राज व्यवस्थेकडून जेंव्हा दुर्लक्ष होते तेंव्हा समाजही क्षीण बनत जातो. अशा स्थितीत समाजाला भानावर आणण्याचे काम वेळोवेळी संतांनी केले आहे. आज मन्याडच्या काठावर तिन्ही घटक सोबत असून समाजाकडूनही अधिक लोकसहभागाच्या माध्यमातून बांधिलकी वृद्धींगत होईल, असा विश्वास जलपुरूष राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला.
जल साक्षरतेच्यादृष्टिने जलग्रामसभा हा अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे. गावाच्या काठावर असलेल्या झाडांपासून, छोटे नदी-नाले, ओहोळ, विहिरी, झरे, लहान मोठी डोंगर ही त्या गावची संपत्ती असते. याला आपण नैसर्गिक संपत्ती म्हणतो. एखाद्या गावाच्या शिवारात जर नदी असेल तर स्वाभाविकच ही नदी सुद्धा त्या गावचा अभिमान असू शकते. नदीचे आरोग्य, तिची स्वच्छता, तिची निगा ही गावाच्या लोकसहभागाशिवाय केवळ अशक्य आहे. जिथे लोकसहभाग आहे तिथे प्रशासनही अधिक सजग व तत्पर होत जाते, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
00000




 गोदावरी नदी परिसर विकास कामाचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला आढावा

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- नांदेडच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख देऊ पाहणाऱ्या गोदावरी काठमार्ग आणि राज्यमार्ग 247चा लिंक रोड सुशोभीकरण प्रकल्प कामाचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आढावा घेतला. प्रस्तावित रस्ते विकास व सुशोभीकरण कामात गोदावरी नदीच्या काठावर एकुण 12 झोन देण्यात आले असून यात देगलूर नाका ब्रिजपासून पश्चिम वळण पुलापर्यंतच्या अंतराचा समावेश आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उपकार्यकारी अभियंता नाईक, मनपा उपायुक्त गिरीष कदम आदी उपस्थित होते. यात नदीच्या काठाने पादचारी मार्ग देण्यात आला असून ग्रीन झोन इकोपार्क आदी कामांचा अंतर्भाव आहे. नांदेडचे ऐतिहासिक वैभव म्हणून नांदेड किल्लाचा परिसर या कामात प्रस्तावित आहे. याचबरोबर विविध अध्यात्मिक स्थळांचाही विकास कामांबाबत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आढावा घेतला.
000000



 शेतकऱ्यांनी एचटीबीटी  कापूस बियाणे खरेदी व लागवड करु नये

-         जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- बाजारात  बोगस कंपन्या, परवाना नसलेली अनाधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. अशा अनधिकृत बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी, आर-आरबीटी व बीटीबीजी-3 या नावाने संबोधतात. या अवैध बियाणांना शासनाची मान्यता नाही. शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत कंपन्याच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच एचटीबीटी बियाण्यांची खरेदी करु नये व त्या बियाणांची शेतात लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

अवैध बियाणांची विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे लागवड केलेल्या कापूस पिकाच्या पानांचे नमुने यांची एचटीबीटी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत आहे. नमुना तपासणीअंती एचटीबीटी जनुके आढळल्यास संबंधितावर कारवाई होवू शकते. कृषी विभाग व पोलीस विभाग एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत त्यामूळे हे बियाणे विक्रीचा प्रयत्न करु नये असे निर्देश कृषी विभागाच्यवतीने देण्यात आले आहेत.

शासनाची मान्यता नसलेली एचटीबीटी बियाणे लागवडीनंतर ग्लायफोसेट हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतील. अनधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या खाजगी एजंट, खाजगी व्यक्तींच्या आमिषास व प्रलोभणास शेतकऱ्यांनी बळी पडू नये.  ग्लायफोसेट तणनाशक कार्सिनोजेनीक गुणधर्माचे असून त्यांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यास कॅन्सरसारखे रोग उदभवण्याची शक्यता आहे. ग्लायफोसेट तणनाशकाच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन भविष्यात त्या जमिनीत कोणतेही पिक लागवड करता येणार नाही. त्यामुळे जमिन नापिक होईल व सर्व शेतकरी शेतमजूर यांचे आरोग्य धोक्यात येईल. तसेच ग्लायफोसेट तणनाशकाचा पिके नसलेल्या जमिनीवर व चहा मळयासाठी वापर करण्याची करण्याची शिफारस केंद्र शासनाने केली आहे.

ग्लायफोसेट हे तणनाशकाचा इतर पिकांवर वापरता येणार नाही. मान्यता नसलेल्या एचटीबीटी कापसाची  लागवड रोखण्यासाठी व कार्सिनोजेनिक गुणधर्म असलेल्या ग्लायफोसेट अतिवापरामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी उत्पादित व अधिकृत बियाणे विक्री परवाना धारकाकडूनच परवानगी असलेले कापूस बीटी बियाणे खरेदी करावेत. शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून अधिसूचित बियाणे पावतीसह खरेदी करावेत. अनाधिकृत बीटी बियाणे खरेदीसाठी बनावट कंपन्या, खाजगी एजंट प्रलोभण देत असतील तर याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांना देण्यात यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.    

0000

लेख

 लेख                                                                                        दि. 24 एप्रिल 2023

डंख छोटा धोका मोठा

हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी

 

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणुन जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत २५ एप्रिल २०२३ रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Malaria : Invest, Innovate, Implement असे असुन भविष्यात या आजाराचा उद्रेक होवु नये म्हणुन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिने पुढील माहिती देण्यात येत आहे.

 

मागील तीन वर्षात नांदेड जिल्हयातील हिवताप आजाराची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. सन 2020 मध्ये 2,74,183 सन 2021 मध्ये 2,75,221 , सन 2022 मध्ये 4,41, 904 तर मार्च 2023 अखेर 1,26,527 याप्रमाणे घेतलेले व तपासलेले रक्त नमुने आहेत. तर हिवताप आजारात मागील तीन वर्षात मृत्यू निरंक आहेत.  

 

हिवताप

हिवताप हा आजार "प्लाझमोडीअम" या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादी मार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

 

डासांची उत्पत्ती

स्वच्छ साठवुन राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेतीस्वच्छ पाण्याची डबकीनालेनदीपाण्याच्या टाक्याकालवे इ. मध्ये होते.

 

हिवतापाचा प्रसार

हिवताप प्रसारक अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होवुन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होवुन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.

 

हिवतापाची लक्षणे

थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येवु शकतो, ताप नंतर घाम येवुन अंग गार पडणेडोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात.

 

रोग निदान

प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी :- हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासुन करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात.

 

तात्काळ निदान पध्दती :- आर. डी. के. ( Rapid Dignostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्तनमुना घेऊन पी.एफ./पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते.

 

औषधोपचार

औषधोपचार कोणताही ताप हा हिवताप असु शकतो. प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्त नमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशी पोटी घेवु नये. गरोदर स्त्रीयांनी प्रायमाक्वीन औषधी घेवु नये व ० ते १ वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देवु नये.

 

हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनाः

 

1.      आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका.

2.      घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.

3.      अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.

 

4.    झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावेपांघरूण घेवून झोपावे.

 

5.     संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यातखिडक्यांना जाळया बसवाव्यातझोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.

 

6.      आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) नये.

 

7.     घराच्या छतावरील फुटके डब्बेटाकाऊ टायर्सकपमडकीइ. ची वेळीच विल्हेवाट लावासंडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावादर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

 

8.     वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

 

वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य खात्याकडुन करण्यात आले आहे.

 

डॉ. आकाश देशमुख

जिल्हा हिवताप अधिकारी

नांदेड

00000  

सुधारित वृत्त_

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव 

लोकाभिमूख करण्यासाठी सर्व सदस्यांचे योगदान मोलाचे

- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर 

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत शासनाने समितीवर जो विश्वास व्यक्त केला त्यानुसार आपला अर्जापूर येथील कार्यक्रम खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मराठवाडा मुक्तिसंग्रामात ज्यांनी योगदान दिले, बलिदान दिले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासमवेत हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा प्रातिनिधिक सन्मान करता आला. हीच कृतज्ञता अधिक दृढ करण्यासमवेत नव्यापिढी पर्यंत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास प्रभावीपणे पोहचविण्यासाठी सर्व सदस्य पूर्ण क्षमतेने आपले योगदान देतील, असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला. नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

 

यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, तहसिलदार संजय वारकड, प्रविण साले, सुनील नेरलकर, दिलीप कंदकुर्ते, दिपकसिंह रावत, ज्येष्ठ गायक संजय जोशी, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, विजय जोशी, श्रीमती आनंदी विकास, संपादक विजय सोनवणे, डॉ. शाम तेलंग, चारुदत्त चौधरी, प्रा. निवृत्ती कौसल्ये, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नांदेड शाखा नियामक मंडळाचे सदस्य नाथ चितळे, बापू दासरी, ॲड. गजानन पिंपरखेडे, ॲड दिलीप ठाकूर, सान्वी जेठवाणी, कृष्णा पापीनवार, आदींची उपस्थिती होती. 

 

यावेळी खासदार तथा समितीचे अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते समितीतील सदस्य नाथा चितळे यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नांदेड शाखा नियामक मंडळाच्या सदस्य पदी निवडून आल्याबद्दल त्याचबरोबर समितीच्या सदस्या डॉ. सान्वी जेठवाणी यांची राज्य निवडणूक आयोगातर्फे आयकॉन म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

 

शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मराठवाडा मुक्तिचा इतिहास पोहचावा यादृष्टीने शालेय पातळीवर नाट्यस्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यातील कलावंतांच्या सहभागातून मान्यवर लेखकांची मराठवाडा मुक्तिसंदर्भातील लिहिलेली प्रकरणे अभिवाचनाच्या सहय्याने पोहचते करणे, विशेष स्मरणिका, येत्या महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत प्रातिनिधीक स्वरुपात मराठवाडा मुक्तिचे स्मरण व्हावे या उद्देशाने राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत व मराठवाडा गिताचे समुहिक गायन याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

0000








 स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसह कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाचीही जोड अत्यावश्यक

- माजी आमदार गंगाधर पटणे 

*      जिल्हा ग्रंथालयात जागतिक ग्रंथ दिन साजरा 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- युवकांनी एखादे स्वप्न बाळगणे व ते साकार करण्यासाठी स्वत:ला झोकून देणे हे निश्चितच चांगले आहे. परंतू नौकरीसाठी स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीपूरतेच स्वत:ला मर्यादित करून घेणे हे अप्रत्यक्षरित्या आपण आपला घात करून घेतल्याचेच द्योतक आहे. पुस्तकी शिक्षणासमवेत आपल्या पारंपारिक चालत आलेल्या शेतीसह इतर व्यवसायाची काही कौशल्य अंगी आत्मसात करून घेणे तेवढेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गंगाधर पटणे यांनी केले. 

जिल्हा ग्रंथालयात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्रंथदिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्षे आहे. यानिमित्ताने युवकांनी आपआपल्या गावाशी निगडीत असलेला मुक्तिसंग्रामाचा इतिहास, संदर्भ हे वाचून घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी युवकांशी संवाद साधून मराठवाडा मुक्तिसंग्रामातील महत्त्वाचे टप्प उलगडून दाखविले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू वाघमारे यांनी केले तर गोविंद फाजगे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. स्थानिक प्रकाशक व ग्रंथ विक्रेत्यांनी या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनही मांडले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. एम. गाडेवाड, संजय पाटील, गजानन कळके, संजय सुरनर आदींने परिश्रम घेतेले.

0000




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...