Sunday, September 25, 2022

 नांदेड जिल्ह्यात 100 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित*

▪️2 लाख 1 हजार 615 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण
नांदेड (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 100 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. रविवार दिनांक 25 रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन 59 हजार 870 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 2 लाख 1 हजार 615 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.
लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
आजच्या घडिला नांदेड जिल्ह्यातील 21 गावे लम्पी बाधित आहेत. या 21 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 10 हजार 266 एवढे आहे. यातील 100 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 141 एवढी आहे. एकुण गावे 162 झाली आहेत. या बाधित 21 गावांच्या 5 किमी परिघातील 162 गावातील (बाधित 21 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 59 हजार 138 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 5 एवढी झाली आहे. उपलब्ध लसमात्रा 2 लाख 60 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
000000

 सर्वसामान्य लोकांचे शासन दरबारी प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी सेवा पंधरवडा

- महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

 

नांदेड (जिमाका) दि. 25:- सर्वसामान्य, गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी यांना विकासाच्या प्रवाहात समावून घेण्यासाठी शासन दरबारी असलेले त्यांचे जे काही कामे असतील ते मार्गी लावण्यासाठी आपण सेवा पंधरवाडा हाती घेतला आहे. जनतेचे आपण सेवक आहोत अशी उत्तरदायीत्वाची भावना प्रशासनाच्या अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. या सेवा पंधरवाडाच्या काळात सर्व सामान्यांची प्रलंबीत असलेली कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भागवत देवसरकर, शाम बापू भारती महाराज, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार जीवराज डापकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त प्रत्येक तालुकापातळीवर सर्व समावेशक उपक्रम झाली पाहिजेत. अशा उपक्रमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मोलाची मदत होईल. प्रशासनात दिरंगाई करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्यास शासन मागे-पुढे पाहणार नाही असे  मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. खेड्याकडे चला असे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे. यात खेड्यातील लोकांना विकासाच्या वाटेवर आणण्याचा उद्देश त्यांचा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने आम्ही अधिकाधिक विकास योजना लोकांपर्यंत पोहचवू. राज्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी हदगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार जीवराज डापकर यांनी  76 कोटी 73 लाख 2 दोन हजार 208 रुपये एवढ्या रक्कमेचा धनादेश पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वितरणासाठी बँकेच्या नावे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांचे समयोचित भाषण झाले.

 

हदगाव तालुक्यात जुन ते ऑगस्ट 2022 या कालाधीत अतिवृष्टी / पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकाचे 33 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक बाधित झालेल्या क्षेत्रासाठी व तीन हेक्टरच्या मर्यादेत गावनिहाय बाधित शेतकऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या मदतीत 135 गावांचा समावेश आहे. यात 70 हजार 297 बाधित शेतकऱ्यांची संख्या असून एकुण बाधित क्षेत्र 56418.21 एवढे आहे. वितरित करावयाच्या रक्कमेत जिरायत पिकात बाधित क्षेत्र शून्य ते दोन हेक्टर पर्यंत 55305.3 हेक्टर एवढे आहे. प्रति हेक्टर रुपये 13 हजार 600 प्रमाणे रुपये 75 कोटी 21 लाख 67 हजार 040 आहे. 2 ते 3 हेक्टर मध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 2 हजार 39 एवढी आहे. बाधीत क्षेत्र 2 ते 3 हेक्टर पर्यंत 1112.88 असून प्रति हेक्टर 13 हजार 600 प्रमाणे 15 कोटी 13 लाख 5 हजार 168 एवढी रक्कम. याप्रमाणे एकुण वितरीत रक्कम 76 कोटी 73 लाख 02 हजार 208 एवढी आहे.

0000000



कृपया सुधारीत वृत्त

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात

- महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

·       शासन पशुपालक व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

नांदेड (जिमाका) दि. 25 :- संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला असून मी प्रत्यक्ष फिरुन आढावाही घेत आहे. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. 

नांदेड येथील मिनी सह्याद्री अतिथी गृहाच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनील लहाने, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. यु. बोधनकर, डॉ. अरविंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. 

ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे अशा जनावराना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तात्काळ सुरु केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लम्पी आजार लसीकरण दृष्टीकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. सध्या ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघा पर्यत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. 5 किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 

लम्पी आजारामूळे ज्या पशूपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी 30 हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

00000

 





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...