Friday, September 7, 2018


महाराष्ट्र भूजल नियम मसुदाबाबत सूचना,
हरकती पाठविण्यास 30 सप्टेंबरची मुदतवाढ
नांदेड दि. 8 :- महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 या मुसदा नियमासंबंधी कोणत्याही व्यक्तीस हरकती / सूचना पाठविण्यासाठी रविवार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) नियम 2018 या मसुदा नियमासंबंधी कोणत्याही व्यक्तीस हरकती / सूचना अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचेकडे 31 ऑगस्ट 2018 पर्यंत लेखी स्वरुपात अथवा psec.wssd@maharshtra.gov.in या ईमेलवर पाठवावयाच्या होत्या. आता शासन परिपत्रक दि. 5 सप्टेंबर 2018 नुसार महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 हे मुसदा नियम शासनामार्फत विचारात घेण्यास रविवार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मसुदा नियमासंबंधी कोणत्याही व्यक्तीस हरकती / सूचना पाठवायच्या असतील तर त्या अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, 7 वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत संकुल लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई या पत्त्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2018 पर्यंत लेखी स्वरुपात अथवा psec.wssd@maharshtra.gov.in या ईमेलवर स्विकारण्यात येतील, असे आवाहन पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी केले आहे.
000000

राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख क्र. २ : -



स्तनपान म्हणजे अमृतपानच
दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभर राष्ट्रीय पोषण महिनासाजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून बाळाच्या सकस आणि पोषण आहारासाठी स्तनपानाचे महत्व सांगणारा हा लेख ...
बाळाच्या जीवनातील पहिले १ हजार दिवस हे बाळाच्या आरोग्यविषयक विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. यादृष्टीने स्तनपान व शिशुषोषण मिळण्यासाठी मातेला प्रोत्साहन, आधार व संरक्षण देणे आवश्यक आहे. जन्मानंतर लगेच अर्ध्या तासाच्या आत स्तनपान केल्यामुळे गर्भाशय आकुंचन पावून रक्तस्त्राव कमी होतो आणि दूध तयार होण्यास चालना मिळते. तसेच गर्भाशय साधारण स्थितीत येण्यास मदत होते. निव्वळ स्तनपान म्हणजे बाळ सहा महिन्याचे होईपर्यत मातेचे दूध देणे व इतर कोणतेही पदार्थ न देणे होय. पहिले महिने बाळाला मध, साखरेचे पाणी, साधे पाणी, गायीचे दूध, डब्यातले दूध, फळाचा रस, ग्राईप वॉटर, जीवनसत्वाचे थेंब इ. काहीही देऊ नये. या पदार्थांमधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे बालके आजारी पडून दगावण्याचा धोका असतो. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाच्या संपूर्ण शारीरिक व मानसिक वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटक मातेच्या दुधात पुरेशा व आवश्यक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे इम्युनोग्लोब्यूलिन्स, पांढऱ्या पेशी, बायाफिड्स घटक, लॅक्टोफेरिन लायसोझाईन इ. रोगप्रतिकारक संरक्षण द्रव्ये मातेच्या दुधात भरपूर प्रमाणात असल्यामुळे जंतूसंसर्ग टाळण्यास मदत होते. शिवाय ॲलर्जीपासूनही बाळाचे संरक्षण होत असल्यामुळे जंतुसंसर्ग टाळण्यास मदत होते. त्यामुळे बाळाला पहिले महिने निव्वळ स्तनपान देणे गरजेचे आहे. 
निव्वळ स्तनपान न करणाऱ्या मुलांमध्ये निव्वळ स्तनपान करणाऱ्या मुलांपेक्षा मृत्यूचे प्रमाण जास्त असते. जुलाबामुळे मृत्यू 14.2 पटीने जास्त, श्वसनाच्या आजारामुळे मृत्यू 3.6 पटीने जास्त आणि इतर जंतूदोषामुळे मृत्यू 2.5 पटीने जास्त प्रमाणात आढळतात.
स्तनपान करताना येणारे दूध
सुरुवातीचे दूध जास्त पातळ असते. स्निग्ध पदार्थ कमी असून साखर (लॅक्टोज), प्रथिने, जीवनसत्वे, खनिजपदार्थ यांचे प्रमाण जास्त असते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाळाची तहान भागते.
नंतर येणारे दूध :-  घट्ट असते. स्निग्ध पदार्थ भरपूर असून त्यामुळे बाळाची भूक भागते. म्हणून बाळाला एका स्तनावरच स्तन पूर्ण रिकामे होईपर्यंत पाजावे. म्हणजे प्रथम येणाऱ्या दुधामुळे बाळाची तहान आणि नंतर येणाऱ्या दुधामुळे  बाळाची भूक भागते. नंतर किंवा दुसऱ्या वेळेस बाळास दुसऱ्या स्तनावर पाजावे.
मागणीनुसार स्तनपान देणे:- दिवसा किंवा रात्री केव्हाही बाळ भुकेमुळे रडले तर आईने त्याला दूध पाजायला घ्यावे. याला मागणीनुसार स्तनपान म्हणतात.
अनिर्बंध स्तनपान : बाळाला हवे तेव्हा हवा तितका वेळ दूध पाजणे याला अनिर्बंध स्तनपान म्हणतात. म्हणून बाळाला हवे तितका वेळ दूध द्यावे. बाळाला तहान लागली असेल तर पहिले पातळ दूध 2-4 घोट पिऊन बाळ स्तन सोडून देईल आणि भूक लागली असेल तर नंतर येणारे घट्ट दूध पिऊनच दूध पिणे बंद करील. बाळाचे  पोट भरले की बाळ आपोआप स्तन सोडून देते. बाळ साधारणत: 24 तासात 10 ते 12 वेळा स्तनपान करतो. बाळंतपणानंतर लगेचच ( अर्ध्या तासाच्या आत ) स्तनपान सुरु करावे.
स्तनपानाची सुरुवात :-  जन्म झाल्यानंतर लगेच अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करावे. सुरुवातीला दूध कमी येत असले तरीसुध्दा ते ( चिकाचे दूध ) बाळासाठी अत्यावश्यक आहे. कारण यात भरपूर रोगप्रतिकारक द्रव्ये असतात. लवकर स्तनपान केल्याने मातेला दूध येण्याचे प्रमाण वाढते. आई व बाळ याच्यातील भावनिक संबंध मजबूत होतात. स्तनपान देताना बाळाचे डोके मातेच्या दंडावर विसावले पाहिजे. दुसऱ्या हाताने स्तनाला आधार देऊन स्तनाच्या टोकाने बाळाच्या तोंडाला स्पर्श केला की बाळ आपोआप स्तनाकडे तोंड वळवून दूध ओढते. बाळाला स्तनपान देण्यात अडचणी येत असतील किंवा बाळ स्तनपान करीत नसेल तर त्वरित संदर्भसेवा केंद्रात तपासणी करावी.
स्तनपानामुळे बाळाला होणारे फायदे :-
आईचे दूध हे परिपूर्ण अन्न असून पहिले सहा महिने बाळाची आहारविषयक गरज स्तनपानाद्वारे पूर्ण होते. बाळाच्या वाढीकरिता आवश्यक ते सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात. पचनास सोपे, योग्य तापमान असलेले व निर्जंतूक असते. दूध ओढण्याच्या क्रियेमुळे बाळाच्या जबड्याचे स्नायू बळकट होतात. माता व बालकात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. आईच्या दुधातील रोगप्रतिकारक द्रव्यांमुळे बाळाला जंतूसंसर्ग व किरकोळ आजारापासून बचाव होतो (उदा. न्युमोनिया, जुलाब इ.). आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौध्दिक व मानसिक  क्षमता अधिक असते. भावी आयुष्यात दात व कानाचे विकार, स्थुलता, रक्तदाब, हृदयविकार,मधुमेह या रोगापासून संरक्षण मिळते. कुपोषण आजाराचे प्रमाण कमी होते व बालमृत्यू टाळता येतात.
मातेला होणारे फायदे :-
स्तनपानामुळे ऑक्सिटोसीन व प्रोलॅक्टिन हे नैसर्गिक तयार होऊन ते रक्तात मिसळतात. ऑक्सिटोसीनमुळे गर्भाशय आंकुचन पावते, त्यामुळे वार गर्भाशयापासून लवकर वेगळी होऊन बाहेर पडते आणि रक्तस्त्राव कमी होतो. प्रोलॅक्टिनमुळे दूध निर्माण होते. बिजकोशांच्या कार्यात बदल होतो व मासिक पाळी उशिरा येते. मातेचा बांधा पूर्ववत होण्यास मदत होते. बाळाला  केव्हाही, कुठेही स्तनपान देता येते. बाळाची तहान व भुकेची गरज भागते. उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण होते. स्तनांचा, गर्भाशयाचा तसेच अंडाशयाचा कर्कराग टाळता येतो. आर्थिकदृष्ट्या बचत होते. शिवाय स्तनपान केल्याने बाळ वारंवार आजारी पडत नाही. त्यामुळे बाळाच्या औषधपाणावरील खर्च वाचतो. मातेचा वेळ व शक्तीची बचत होते.
कुटुंबाला होणारे फायदे :-
पैसे आणि वेळ वाचतो. वरचे दूध, भांडी, इंधन इ. चे पैसे वाचतात. स्तनपान करणाऱ्या बालकात आजाराचे प्रमाण कमी असून औषधांचा खर्च कमी होतो. दोन मुलामध्ये अंतर ठेवता येते, त्यामुळे मुलांचे संगोपन/ देखभाल नीट करता येते.
सामाजिक आणि राष्ट्रीय फायदे :-
            बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. आजारपण कमी झाल्याने त्यावरील खर्चात बचत होते. नैसर्गिकपणे पाळणा लांबल्यामुळे लोकसंख्या आटोक्यात रहायला मदत होते.
बाळाला चीक दूध पाजल्यामुळे होणारे फायदे :-
त्यांत प्रथिने, जीवनसत्व अ व क भरपूर प्रमाणात असते. यातील सारक गुणांमुळे बाळाला शौचास साफ होते. चीक दूध पोटात गेल्यामुळे बाळाच्या आतड्याची वाढ पूर्ण होण्यास मदत होते. रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
मातेच्या दुधात पाण्याचे प्रमाण जवळपास 88 टक्के असते. त्यामुळे बाळाला पहिल्या सहा महिन्यात मातेच्या दुधाव्यतिरिक्त इतर काहीही देऊ नये. बाळाला प्रती 1 किलो ग्रॅम शरीर वजनास 170 मिली दुधाची आवश्यकता असते. बाळाचे जन्म वजन साधारणत: 2.8 ते 3 कि ग्रॅम असते. म्हणजेच त्याला 510 मिली दूध रोज लागते.
स्तनपानानंतर बाळाची ढेकर काढणे
बाळाला खांद्यावर छातीशी उभे धरुन किमान 15 ते 20 मिनिटे थोपटून ढेकर काढावी. किमान 2 ते 3 ढेकर निघणे आवश्यक आहे.
स्तनपानाबाबत :-
पहिले 2- 3 दिवस येणारे पिवळसर घट्ट दूध म्हणजेच चिकाचे दूध फेकून न देता बाळाला द्यावे. कारण त्यात भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक द्रव्ये, प्रथिने, क्षार, जीवनसत्वे असतात. बाळ किंवा माता आजारी असेल तरी स्तनपान सुरु ठेवावे. किमान 2 वर्षापर्यत स्तनपान द्यावे. 6 महिन्यापासून पूरक आहाराची जोड द्यावी. 5 वर्षापर्यत स्तनपान देता येईल.
-डॉ. दिलीप टी. रणमले,
प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण
प्रशिक्षण केंद्र, अमरावती
००००


41 कोटी 17 लक्ष किंमतीच्या दहा नळ पाणी पुरवठा योजनांचे ई-भुमिपूजन
पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करावेत
- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर  
नांदेड, दि. 7 :- पाणी पुरवठा योजनेची सर्व कामे वेळेत पूर्ण करुन नागरिकांना शाश्वत व शुध्द पाणी दिले जाईल यासाठी संबंधीत विभागाने प्रयत्न करावेत, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य-2 पाणी पुरवठा योजनेतील 41 कोटी 17 लक्ष किंमतीच्या दहा नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचे ई-भूमीपूजन श्री. लोणीकर यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाले. त्यावेळी ते  बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती मधुमती कुंटूरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, पाणीपुरवठा मुख्य अभियंता व्ही. पी. जगतारे, भुजल सर्वेक्षणचे उपसंचालक डॉ. पी. ल. साळवे, संतुकराव हंबर्डे, देविदास राठोड, मिलींद देशमुख, जि.प.चे कार्यकारी अभियंता मिलींद गायकवाड, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. बोडके आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
श्री. लोणीकर म्हणाले, पाणी पुरवठा योजनेमुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असून मराठवाड्याच्या विकासासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेबाबत देशाला आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्याने राज्यात स्वच्छता अभियानात चांगले काम केले आहे. राज्यात सर्वात जास्त शौचालय नांदेड जिल्ह्यात बांधली आहेत. यासाठी नांदेड जिल्ह्याला 350 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. हागणदारी मुक्त करण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहिले आहे. राज्याचा पाणी पुरवठा आराखडा केंद्राने मंजूर केला आहे. मराठवाडा टंचाई मुक्त करण्यासाठी वाटरग्रीडचे काम इज्राईलच्या धर्तीवर करण्यात येत आहे. पाणी हे जीवनातले अमृत आहे. पाणी जमिनीत जिरविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून विविध कामे करण्यात येत आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे सातत्याने पुढे चालू ठेवण्यात येणार आहेत.  
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या नांदेड तालुक्यातील गोपाळचावडी व वाजेगाव, किनवट तालुक्यातील गोकुंदा, उमरी तालुक्यातील तळेगाव, तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बिलोली तालुक्यातील केरुर व तांडा, धर्माबाद तालुक्यातील जारीकोट, नांदेड तालुक्यातील कांकाडी, नायगाव तालुक्यातील बरबडा, देगलूर तालुक्यातील करडखेड आणि हदगाव तालुक्यातील पळसा या नांदेड जिल्ह्यातील 41 कोटी 17 लाख रुपयांच्या दहा नळ पाणी पुरवठा योजनांचे ई-भुमिपूजनात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व शौचालय बांधकामासाठी दिलेला निधी पुढील प्रमाणे आहे. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमातंर्गत :- योजना संख्या 39, गाव व वाड्यांची संख्या 39 त्याची रक्कम 41 कोटी 94 लक्ष. जलस्वराज्य टप्पा-2 :- योजना संख्या -6, गाव व वाड्यांची संख्या- 6 रक्कम 49 कोटी 74 लक्ष. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल (अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी) योजना संख्या 47 तर गाव व वाड्यांची संख्या 52 रुपये 43 कोटी 20 लक्ष. राष्ट्रीय पेयजल नवीन योजनांसाठी मंजूर निधी योजना संख्या 129 गाव व वाड्यांची संख्या 289 साठी रुपये 326 कोटी 30 लक्ष. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) :- 3 लक्ष 8 हजार 180 शौचालये बांधकाम पूर्ण यासाठी रुपये 340 कोटी 54 लक्ष. अशी एकूण योजनांची संख्या :- 221 व गाव व वाड्यांची संख्या 386 व एकूण रुपये 801 कोटी 72 लक्ष अशी आहे. तर राष्ट्रीय पेयजल अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी व नवीन योजना दोन्ही मिळून 369 कोटी 50 लक्ष एवढी तरतूद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकरी 1 लाख 76 हजार आहेत. रक्कम 1 हजार 23 कोटी 89 लक्ष अशी असून आजपर्यंत 1 लक्ष 35 हजार 47 लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये 701 कोटी 85 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.
पीककर्ज वाटपामध्ये नांदेड जिल्ह्याला एकूण उद्दिष्ट 1 हजार 683 कोटी (खरीपासाठी) होते. आजपर्यंत एकूण 76 हजार 37 शेतकऱ्यांना रुपये 462 कोटी 83 लाख पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बोंडअळी अनुदान नांदेड जिल्ह्यासाठी 176 कोटी 12 लक्ष मंजूर करण्यात आला आहे. प्रथम हप्ता प्राप्त 46 कोटी 97 लक्ष, दुसरा हप्ता प्राप्त 70 कोटी 45 लक्ष असे एकूण 117 कोटी 42 लक्ष रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी पाणी पुरवठा योजनेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सुत्रसंचालन मिलींद व्यवहारे यांनी केले तर आभार पाणीपुरवठा मुख्य अभियंता व्ही. पी. जगतारे यांनी मानले.
0000000

गुरुवारी दारु दुकाने बंद
नांदेड, दि. 7 :-जिल्ह्यात व शहरात गुरुवार 13 सप्टेंबर 2018 रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. त्याअर्थी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गुरुवार 13 सप्टेंबर 2018 रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बीआर- 2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.                          00000
स्पिटलच्या मागे नागपूर येथे दुपारी 1 ते 5 यावेळेत आपण किंवा आपला प्रतिनिधी यांनी आपल्या तक्रारीसह उपस्थित रहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी
18 सप्टेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन  
नांदेड, दि. 7 :- केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेले महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांनी  सेवानिवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत करण्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी संबंधीत विभागास जसे भारतीय प्रशासन सेवा - सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई, भारतीय पोलीस सेवा- गृह विभाग मंत्रालय मुंबई, भारतीय वनसेवा- महसूल व वन मंत्रालय मुंबई तसेच पेन्शनअदालतमध्ये मंगळवार 18 सप्टेंबर 2018 रोजी साई सभागृह शंकरनगर अंबाझरी रोड, व्होकार्ड हॉस्पिटलच्या मागे नागपूर येथे दुपारी 1 ते 5 यावेळेत आपण किंवा आपला प्रतिनिधी यांनी आपल्या तक्रारीसह उपस्थित रहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

मराठवाडा विकास मंडळाची
जिल्हास्तरीय बैठक 11 सप्टेंबर रोजी
नांदेड, दि. 7 :- मराठवाडा विभागातील विकास कामांना गती देण्यासाठी, पाणी प्रश्न आणि इतर अनुशेष निर्मुलन यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर व मनपा आयुक्त, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, सर्व नगराध्यक्ष व सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद, पाणी पुरवठा संस्था / शेती संबंधी संस्थेचे अध्यक्ष / एनजीओ, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हास्तरावरील कार्यान्वयीन यंत्रणेचे प्रमुख यांची बैठक औरंगाबाद मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) डॉ. भागवत कराड यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार 11 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधीत सर्व अधिकारी, यंत्रणांनी बैठकीस नमुद विषयाच्या अनुषंगिक अद्यावत माहितीसह व्यक्तीश: उपस्थित रहावे. प्रतिनिधी पाठवू नये, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिव अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...