Friday, September 7, 2018


41 कोटी 17 लक्ष किंमतीच्या दहा नळ पाणी पुरवठा योजनांचे ई-भुमिपूजन
पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करावेत
- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर  
नांदेड, दि. 7 :- पाणी पुरवठा योजनेची सर्व कामे वेळेत पूर्ण करुन नागरिकांना शाश्वत व शुध्द पाणी दिले जाईल यासाठी संबंधीत विभागाने प्रयत्न करावेत, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य-2 पाणी पुरवठा योजनेतील 41 कोटी 17 लक्ष किंमतीच्या दहा नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचे ई-भूमीपूजन श्री. लोणीकर यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाले. त्यावेळी ते  बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती मधुमती कुंटूरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, पाणीपुरवठा मुख्य अभियंता व्ही. पी. जगतारे, भुजल सर्वेक्षणचे उपसंचालक डॉ. पी. ल. साळवे, संतुकराव हंबर्डे, देविदास राठोड, मिलींद देशमुख, जि.प.चे कार्यकारी अभियंता मिलींद गायकवाड, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. बोडके आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
श्री. लोणीकर म्हणाले, पाणी पुरवठा योजनेमुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असून मराठवाड्याच्या विकासासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेबाबत देशाला आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्याने राज्यात स्वच्छता अभियानात चांगले काम केले आहे. राज्यात सर्वात जास्त शौचालय नांदेड जिल्ह्यात बांधली आहेत. यासाठी नांदेड जिल्ह्याला 350 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. हागणदारी मुक्त करण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहिले आहे. राज्याचा पाणी पुरवठा आराखडा केंद्राने मंजूर केला आहे. मराठवाडा टंचाई मुक्त करण्यासाठी वाटरग्रीडचे काम इज्राईलच्या धर्तीवर करण्यात येत आहे. पाणी हे जीवनातले अमृत आहे. पाणी जमिनीत जिरविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून विविध कामे करण्यात येत आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे सातत्याने पुढे चालू ठेवण्यात येणार आहेत.  
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या नांदेड तालुक्यातील गोपाळचावडी व वाजेगाव, किनवट तालुक्यातील गोकुंदा, उमरी तालुक्यातील तळेगाव, तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बिलोली तालुक्यातील केरुर व तांडा, धर्माबाद तालुक्यातील जारीकोट, नांदेड तालुक्यातील कांकाडी, नायगाव तालुक्यातील बरबडा, देगलूर तालुक्यातील करडखेड आणि हदगाव तालुक्यातील पळसा या नांदेड जिल्ह्यातील 41 कोटी 17 लाख रुपयांच्या दहा नळ पाणी पुरवठा योजनांचे ई-भुमिपूजनात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व शौचालय बांधकामासाठी दिलेला निधी पुढील प्रमाणे आहे. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमातंर्गत :- योजना संख्या 39, गाव व वाड्यांची संख्या 39 त्याची रक्कम 41 कोटी 94 लक्ष. जलस्वराज्य टप्पा-2 :- योजना संख्या -6, गाव व वाड्यांची संख्या- 6 रक्कम 49 कोटी 74 लक्ष. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल (अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी) योजना संख्या 47 तर गाव व वाड्यांची संख्या 52 रुपये 43 कोटी 20 लक्ष. राष्ट्रीय पेयजल नवीन योजनांसाठी मंजूर निधी योजना संख्या 129 गाव व वाड्यांची संख्या 289 साठी रुपये 326 कोटी 30 लक्ष. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) :- 3 लक्ष 8 हजार 180 शौचालये बांधकाम पूर्ण यासाठी रुपये 340 कोटी 54 लक्ष. अशी एकूण योजनांची संख्या :- 221 व गाव व वाड्यांची संख्या 386 व एकूण रुपये 801 कोटी 72 लक्ष अशी आहे. तर राष्ट्रीय पेयजल अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी व नवीन योजना दोन्ही मिळून 369 कोटी 50 लक्ष एवढी तरतूद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकरी 1 लाख 76 हजार आहेत. रक्कम 1 हजार 23 कोटी 89 लक्ष अशी असून आजपर्यंत 1 लक्ष 35 हजार 47 लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये 701 कोटी 85 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.
पीककर्ज वाटपामध्ये नांदेड जिल्ह्याला एकूण उद्दिष्ट 1 हजार 683 कोटी (खरीपासाठी) होते. आजपर्यंत एकूण 76 हजार 37 शेतकऱ्यांना रुपये 462 कोटी 83 लाख पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बोंडअळी अनुदान नांदेड जिल्ह्यासाठी 176 कोटी 12 लक्ष मंजूर करण्यात आला आहे. प्रथम हप्ता प्राप्त 46 कोटी 97 लक्ष, दुसरा हप्ता प्राप्त 70 कोटी 45 लक्ष असे एकूण 117 कोटी 42 लक्ष रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी पाणी पुरवठा योजनेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सुत्रसंचालन मिलींद व्यवहारे यांनी केले तर आभार पाणीपुरवठा मुख्य अभियंता व्ही. पी. जगतारे यांनी मानले.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...