Friday, April 12, 2024

वृत्‍त क्र. 332

फेक न्‍यूजसाठी मुखेडमध्‍ये तालुका प्रतिनिधीवर गुन्‍हा दाखल

नांदेड जिल्ह्यात 'फेक न्यूज ', संदर्भातील पहिला गुन्हा

नांदेड दि. 12 - निवडणूक काळामध्‍ये वार्तांकन करतांना वस्‍तुस्थिती सोडून दिशाभूल करणारे वृत्‍त प्रकाशित केल्‍याप्रकरणी एका दैनिकाच्‍या तालुका प्रतिनिधीवर मुखेड येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी गुन्‍हा दाखल केला आहे. निवडणूक काळात 'फेक न्यूज ',बाबतचा जिल्हयातील हा पहिला गुन्हा ठरला आहे.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाची नाहक बदनामी करणा-या वृत्‍ताला वस्‍तुनिष्‍ठ नसलेली बातमी (फेक न्यूज) असे परिभाषीत केले आहे. तरी देखील एका वृत्‍तपत्राच्‍या प्रतिनिधीने चुकीची बातमी प्रकाशित केली आहे. यामुळे निवडणूक आयोगाची विनाकारण बदनामी झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 16-नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत 91-मुखेड विधानसभा मतदारसंघात 29 मार्च 2024 रोजी निवडणुकीच्‍या अनुषंगाने मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. या प्रशिक्षणाबाबत सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडून कोणतेही माहितीची खातरजमा न करता एका वृत्‍तपत्रामध्‍ये प्रशिक्षण सुरू होण्‍यापूर्वीच्‍या रिकाम्‍या खुर्चीचे फोटो तसेच प्रशिक्षणास अनुपस्थित असणा-या कर्मचा-यांची पाठराखण प्रशासन करीत असल्‍याचे चुकीचे वृत्‍त दिले होते. (प्रशिक्षणास अनेक कर्मचाऱ्यांची दांडी तर अशा कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून पाठराखण ) त्‍यामुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा मतदारसंघ (91-मुखेड) यांच्‍याकडून कोणतेही खातरजमा न करता वस्‍तुस्थितीला सोडून वृत्‍त प्रकाशित केल्‍याबद्दल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम (भा.प्र.से) यांनी पोलीस स्‍टेशन मुखेड येथे गुन्‍हा दाखल केला आहे. वृत्तपत्रांनी निवडणूक प्रक्रिया संदर्भात वृत्तलेखन करताना, इलेक्ट्रॉनिक्स व कोणत्याही माध्यमांवर बातमी दाखवताना संबंधित विभागामार्फत खातरजमा करावी, दुसरी बाजुही मांडावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

फेक न्‍यूज व निवडणूक आयोग

तथ्‍यहिन बातमी संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारी 2024 च्‍या मिडिया मॅटर हॅन्‍ड बूकमध्‍ये 9.1 या सत्रामध्‍ये आयोगाच्‍या संदर्भात अपप्रचार पसरविणा-या तथ्‍यहिन बातम्‍यांसंदर्भात कडक कारवाई करण्‍याचे निर्देश दिले आहेत. विशिष्‍ट कालमर्यादेत या वृत्‍ताचे खंडन करण्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी तातडीने ही कार्यवाही केली असून संपादकांनी देखील संबंधीत तालुका प्रतिनिधीला समज देण्‍याचे आवाहन केले आहे. यासंदर्भातील गुन्‍हा मुखेड पोलीस स्‍टेशनमध्‍ये दाखल करण्‍यात आला आहे.

०००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 437 21 मे रोजी एक दिवसाचा दुखवटा   नांदेड दि. 20 मे :  इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि ...