Monday, January 19, 2026

विशेष लेख

 धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात...!

शिख धर्मियांचा एक मोठा उपक्रम साजरा करताना या धर्माने विविध क्षेत्रात दिलेले योगदान आपण बघितले पाहिजे. त्यात सेवा आणि निस्वार्थ सेवा याकडे आपण लक्ष द्यायलाच हवे. पूर असो वा भूकंप किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती यात निःस्वार्थ सेवा या समुदायाकडून  दिल्ली जाते. गरजूंना (सामुदायिक स्वयंपाकघर) अर्थात लंगरच्या माध्यमातून  अन्न व निवारा देण्यासोबतच  आपत्तीतून सुटका करणे व आवश्यक ते मदत कार्य करणे यासाठी शीख स्वयंसेवक योगदान देतात.

सेवा भाव अर्थात सेवा करवाना धर्म-पंथ याचा भेद न पाळता सर्वांना माणुसकीच्या नात्याने शक्यतोपरी मदतीचा हात स्वयंसेवक देताना जगभरात आपणास दिसतील.

गुरुद्वारांमध्ये २४ तास अखंड सेवा,मदतीचा एक भाग बनते त्यावेळी गरजूंना अन्न पुरवण्याचा मोठा स्रोत  समाजासाठी खुला होतो.

जगभरात 'खालसा एड' (Khalsa Aid) च्या माध्यमातून आपत्तीच्या काळात मदत पुरवली जाते. यात शीख स्वयंसेवक जगभरात सर्व भौगोलिक सिमांच्या पलिकडे जाऊन मदत करतात.

आपत्ती काळात जी विविध कामे होतात त्यात भोजन व पिण्याचे पाणी पुरविणे, तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करणे व बचाव कार्यात सहभाग अशी विभागणी आपणास दिसते. यात सर्वाधिक मोलाचे कार्य म्हणजे आपत्तीच्या काळात पिडितांना भावनिक आधार देणे होय. आपत्तीत आप्त स्वकियांना गमावलेल्यांना मोठा मानसिक धक्का बसलेला असतो अशा सर्वांना भावनिक आधार  देणे महत्वाचे असते हे काम स्वयंसेवक करतात.

शीख धर्मावर आणि धर्मतत्वांवर आधारित अशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था म्हणून खालसा एड'ची जगभरात ओळख आहे. केवळ धार्मिक शिकवण न राहता आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारी एक महत्वाची ताकद म्हणून या स्वयंसेवी संस्थेला ओळख मिळाली आहे.

याच स्वरुपाचे आपत्तीकाळात काम करणारी आणखी एक स्वयंसेवी संस्था म्हणजे 'युनायटेड शिख होय. या संस्थेने 2025 मध्ये पंजाब मध्ये आलेल्या महापूरातून लोकांना सावरण्यास खूप मोठी मदत केली .या भूतो-न-भविष्यती महापूरामध्ये पंजाबात अतोनात नुकसान झाले. गावेच्या गावे यात बुडाली. अनेकजण विस्थापित झाले. घरे आणि शेती याचेही या पुरात मोठे  नुकसान झाले. 

या काळात 2000 हून अधिक जणांची पुरातून सुखरूप सुटका करण्यासोबतच 8 हजाराहून  अधिक नागरिकांना वैद्यकीय उपचार तसेच तात्पुरता निवारा, अन्न,  पिण्याचे शुद्ध पाणी , वस्त्रे आणि गरजेचा शिधा पुरविण्यात या संस्थेने  पुढाकार घेतला . या पुरात  ८७ हून अधिक गावात पूर्णतः नुकसान झाले. यातील अनेकांना आर्थिक मदतीची गरज लागणार आहे यासाठी,  एक लक्ष डॉलरचा निधी उभारण्याचे काम ही संस्था करीत आहे.

नैसर्गिक आपत्ती कोणत्या स्वरुपात समोर येईल  हे सांगता येत नाही. या काळात मानवता वादी दृष्टीकोण आणि निःस्वार्थ सेवा याचा वस्तुपाठ शीख बांधवांनी जगासमोर सादर केलाय असं म्हणता येईल. 

प्रशांत दैठणकर /9823199466

(संकलन आभार - गुरमीत कौर  आणि खालसा एड )




No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...