विशेष वृत्त
लातूर दि.१६ (विमाका): धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शालेय स्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड येथे होणाऱ्या ऐतिहासिक मुख्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लातूर: डिजिटल सादरीकरणातून इतिहासाचा जागर
जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून विशेष उपक्रमांना प्रारंभ झाला. शासकीय आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना एलईडी स्क्रीनद्वारे गुरुजींच्या जीवनपटावर आधारित माहितीपट (Documentary) दाखविण्यात आले. यावेळी शाळांचा परिसर ‘हिंद दी चादर’ गीतांच्या सामूहिक गायनाने दुमदुमून गेला. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, दृक-श्राव्य माध्यमातून गुरुजींचा त्याग विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला आहे.
धाराशिव: प्रभात फेरीने वेधले लक्ष
धाराशिव जिल्ह्यातील शिंगोली (ता. जि. धाराशिव) येथील विद्यानिकेतन माध्यमिक व आदर्श प्राथमिक आश्रमशाळेत गुरुजींना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भव्य ‘प्रभात फेरी’ काढत परिसरात जनजागृती केली. कार्यक्रमात श्रीमती ज्योती राठोड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी रत्नाकर पाटील यांनी गुरुजींच्या बलिदानाचे महत्त्व विशद करताना, "अन्यायाविरुद्ध लढणारे 'हिंद-दी-चादर' म्हणजे देशाचा गौरव," अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
स्पर्धांमधून गुणांचा सन्मान
दोन्ही जिल्ह्यांत निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूरजींचा ज्वलंत इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
000000
No comments:
Post a Comment