विशेष वृत्त
गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त
आयोजित ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा
छत्रपती संभाजीनगर, दि.16 (विमाका): श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाच्या तयारीचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाने दक्षतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला दुरदृष्य प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विभागातील महसूल, शिक्षण, आरोग्य, माहिती यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त मंजुषा मिसकर, नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
आढावा बैठकीत कार्यक्रमाची एकूण रूपरेषा, जनजागृती उपक्रम, प्रभात फेऱ्या, विद्यार्थी व युवकांचा सहभाग, मुख्य सोहळ्याचे नियोजन तसेच कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता व आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, शौर्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आयुक्त श्री. पापळकर यांनी केले. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेऊन कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततापूर्ण व उत्साहात पार पाडावा यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, प्रत्येक विभागाने प्रचार व प्रसाराचे नियोजन करावे असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, सद्भावना व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी बैठकीस विभागातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आरोग्य, शिक्षण यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment