Saturday, September 2, 2017

जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर  
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यात नोव्‍हेंबर व डिसेंबर 2017 या महिन्यात मुदत संपणाऱ्या 171 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.  या निवडणुकीचे मतदान शनिवार 7 ऑक्टोंबर 2017 रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्‍हा  परिषद पंचायत समिती  निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.  
जिल्ह्यात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. माहुर- 26, किनवट- 48, हिमायतनगर- 1,  हदगाव- 6 अर्धापूर- 2, नांदेड- 7, मुदखेड- निरंक, भोकर- 3 उमरी- 1, धर्माबाद- 3, बिलोली- 9, नायगाव खै.- 7, लोहा- 28, कंधार- 15, मुखेड- 15, देगलूर- निरंक याप्रमाणे एकुण 171 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल.  
निवडणुक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. तहसिलदार निवडणुकीची नोटीस गुरुवार 7 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिध्‍द करतील. नामनिर्देशन पत्रे मागविण्‍याचा व सादर करण्‍याचा कालावधी (‍ नमुना अ अ मध्‍ये नमुद केलेल्‍या ठिकाणी) शुक्रवार 15 ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत राहील. सार्वजनिक सुट्टीचा 17 व 21 सप्टेंबर हा दिवस वगळून राहील. नामनिर्देशनपत्र छाननी (नमुना अ अ.मध्‍ये नमूद केलेल्‍या ठिकाणी) सोमवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 पासून ते छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्‍यासाठी (नमुना अ अ मध्‍ये नमुद केलेल्‍या ठिकाणी) बुधवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द बुधवार 27  सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेनंतर. आवश्‍यक असल्‍यास मतदान शनिवार 7 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होईल. मतमोजणी सोमवार 9 ऑक्टोंबर 2017 रोजी. (मतमोजणीचे ठिकाण, वेळ जिल्‍हधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्‍यानुसार राहील) निवडणुकांचा निकाल बुधवार 11 ऑक्टोंबर 2017 रोजी प्रसिध्‍द करण्यात येईल.
कार्यक्रम पत्रातील परिच्छेद क्र. 2 मध्‍ये नमुद केल्‍यानुसार पहिल्‍या टप्‍प्‍यात फक्‍त ऑक्‍टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 13 जिल्‍हयातील 114 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्‍याप्रमाणे किनवट तालुक्‍यातील 4 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम कार्यान्‍वीत आहे. या निवडणूकीमध्‍ये प्रथमतः सरपंच पद थेट पध्‍दतीने निवडून द्यावयाचे असल्‍याने निवडणूक आचारसंहितेच्‍या अंमलबजावाणीबाबत विशेष उपाययोजना करण्‍यात येणार आहे.  तसेच प्रत्‍यक्ष मतमोजणीच्‍यावेळी संवेदनशील मतमोजनी केंद्राच्‍या परिसरात विशेष पोलीस बंदोबस्‍त पुरविण्‍यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे जिल्‍हयात मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल.
आचारसंहिता : सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये शुक्रवार 1 सप्टेंबर पासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्‍वात राहील. निवडणुका निर्भय, मुक्‍त व पारदर्शक वातावरणामध्‍ये होणे आवश्‍यक असल्याने राज्‍य निवडणूक  आयोगाने 14 ऑक्टोंबर 2016 रोजी निर्गमित केलेल्‍या आचारसंहिता विषयक आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत  सर्व तहसिलदार यांना सुचित करण्‍यात आले आहे.
आचारसंहिता पुढील ग्रामीण क्षेत्रामध्‍ये लागू राहील : ज्‍या जिल्‍हयामध्‍ये 50 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूका आहेत त्‍या संपूर्ण जिल्‍हयामध्‍ये आचारसंहिता लागू राहील.  ज्‍या तालुक्यात 50 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका आहेत त्‍या संपूर्ण तालुक्‍यात आचारसंहिता लागू राहील. निवडणुका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या सीमेलगत गावामध्‍ये सुध्‍दा आचारसंहिता लागू राहील. आदर्श आचारसंहिता जरी संपूर्ण जिल्‍हा, तालुका, लगतच्‍या गावामध्‍ये लागू असेल तरी जेथे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणुका नसतील त्‍याठिकाणी विकासाच्‍या विविध कामावर कसलाही निर्बंध राहणार नाही. मात्र या क्षेत्रात अशी कोणतीही कृती कोणालाही करता येणार नाही. ज्‍यामुळे निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्‍या मतदारांवर विपरीत प्रभाव पडेल, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...