Friday, December 11, 2020

 

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील 1 हजार 15 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान  

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  जिल्ह्यातील 1 हजार 15 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 15 जानेवारी 2021 रोजी यासाठी मतदान होईल. 15 डिसेंबर रोजी तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  सांगितले. कोविड-19 अंतर्गत असलेले सर्व निकष ग्रामीण भागातील जनता पार पाडून सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्या दिवस म्हणजेच दिनांक 25,26 व 27 डिसेंबर हे दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपासून होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दुपारी 3 वाजेनंतर प्रसिद्धी केली जाईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तर मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना 21 जानेवारी 2021 पर्यंत प्रसिद्ध केली जाईल.

 

मुखेड तालुक्यात 109 ग्रामपंचायत, हदगाव 108, कंधार 98, देगलूर 85, लोहा 84, नायगाव 68, नांदेड 65, बिलोली 64, भोकर 63, उमरी 57, हिमायतनगर 50, मुदखेड 45, अर्धापूर 43, धर्माबाद 40,‍ किनवट 26, माहूर 10 अशा एकुण 1 हजार 15 ग्रामपंचायतींसाठी हा निवडणुकांचा कार्यक्रम आहे.

00000

 

            

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...