Tuesday, January 9, 2024

वृत्त क्र. 29

 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात

15 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 9 :- शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास करणे यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यत सहभागासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

या अभियानात 15 फेब्रुवारी 2024 पर्यत नोंदणी करावयाची असून या स्कुल पोर्टल लिंकवर https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4 नोंदणी करावी. तसेच संदेश, कात्रणे, जाहिरात, व्हिडीओ शेअर करण्यासाठीची https://drive.google.com/drive/folders/1SLpCMNhoiOAlfeJZ6rYzSVaD9IVXTzHn?usp=sharing  या लिंकचा वापर करावा, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

 

जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा मध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना या अभियानात सहभागी होता येईल.  तसेच शाळांना पुढील प्रमाणे गुणांकन देण्यात येईल.

विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग 60 गुण. शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग 40 गुण. सहभागी शाळांचे कामगीरीच्या आधारे मूल्यांकन, आपला जिल्हा उर्वरीत महाराष्ट्र कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे तालुकास्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर व राज्यस्तर असे एकुण 4 टप्पे अभियानाचे स्वरुप आहे.

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यांना पुढील  प्रमाणे बक्षीसे आहेत. तालुकास्तर पहिले बक्षीस 3 लक्ष, दुसरे बक्षीस 2 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 1 लक्ष रुपये आहे. जिल्हास्तर पहिले बक्षीस 11 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 5 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 3 लक्ष रुपये. विभाग स्तर पहिले बक्षीस 21 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 11 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 7 लक्ष रुपये. राज्यस्तर पहिले बक्षीस 51 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 21 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 11 लक्ष रुपये आहे.

 राज्य स्तरावरील स्पर्धा प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी राज्यस्तरीय विजेता निवडण्यात येईल. जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग सर्वस्वी अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...