विशेष वृत्त क्र. 123
नांदेड भक्तिमय; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लाखो भाविक नतमस्तक
नांदेड,दि.24 (जिमाका )हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्यावतीने नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण केले.विविध राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे नांदेड शहर भक्तिमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान,महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावत दर्शन घेतले.
गुरु गोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने राज्यस्तरीय समागम समितीच्या सहाय्याने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या जवळपास एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी प्रशासन आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या माध्यमातून सुरू होती. यासाठी मोदी मैदानाच्या 52 एकर परिसरात गुरुद्वाराची प्रतिकृती असलेला मंडप उभारण्यात आला असून लंगर सेवेसाठी आठ मंडप, आरोग्य शिबिर, चित्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत. प्रशस्त पार्किंग,स्वच्छतेच्या उपाययोजना,पिण्याचे पाणी यासह सर्व आवश्यक सुविधांची उभारणी या मैदानावर करण्यात आली आहे.
भाविकांचा जनसागर:
पारंपारिक वेशभूषा आणि बोलीभाषेतील गीतांतून जागविला भक्तिभाव
याठिकाणी उभारण्यात आलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी दरबार या मुख्य मंडपात गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला. अबालवृद्ध भक्तांनी अतिशय शिस्तबद्धपणे गुरुचरणी माथा टेकत गुरुनाम स्मरण केले.या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतलेल्या शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील भाविकांचा यामध्ये समावेश होता. आंध्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.यापैकी काही महिलांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या मंडपात आपापल्या बोली भाषेतील भक्तिगीते सादर करत अनोख्या पद्धतीने भक्तिभाव जागविला.
प्रशासनाचे चोख
नियोजन; भाविकांची स्वयंशिस्त आणि परिसराची स्वच्छता अबाधित
52 एकराच्या विस्तीर्ण
परिसरात होत असलेल्या या भव्य कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने भाविकांनी
उपस्थिती लावूनही परिसराची स्वच्छता कायम होती. इतक्या मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती
अपेक्षित असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि राज्य समागम समितीचे समन्वयक रामेश्वर
नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अशासकीय सदस्यांच्या मदतीने जिल्हा प्रशासन आणि
विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतेसाठी चोख नियोजन केले होते. यासोबतच याठिकाणी येणाऱ्या
भाविकांनी दाखविलेल्या स्वयंशिस्तीमुळे स्वच्छता कायम राहण्यास मदत झाली.
******
No comments:
Post a Comment