Saturday, January 24, 2026

वृत्त क्र. 127 

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद

 

·         भाविकांनी व्यक्त केले समाधान 

नांदेड, दि. 25 जानेवारी :- श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सेवा स्टॉल्स उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडकरांना केले होते. या आवाहनाला नांदेडवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

विविध शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था, व्यावसायिक आस्थापना, व्यापारी संघटना, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, उत्पादक, उद्योजक तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत सेवा स्टॉल्ससाठी नोंदणी केली. समागम परिसराच्या चहूबाजूंनी निःशुल्क सेवा स्टॉल्स उभारण्यात आले होते. 

या स्टॉल्सवर चहा, बिस्किटे, नाश्ता, फलाहार, पाणी, सरबत, आईस्क्रीम, लस्सी, चिक्की, उसाचा रस आदी विविध पदार्थांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळाली. बीएसएनएलच्या वतीने मोफत सिमकार्डचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रमाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला. 

याशिवाय मेंदूची व्यायामशाळा, पर्यटन विकास, विमान उड्डाण क्षेत्रातील रोजगार संधी, कृषी व पोस्ट विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आबालवृद्धांसह दूरवरून आलेल्या भाविकांनी या सेवा उपक्रमांचा लाभ घेतला. 

सेवा स्टॉल्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निःशुल्क सेवांबाबत बहुसंख्य भाविकांनी समाधान व्यक्त केले. सर्व स्टॉलधारकांनी दोन्ही दिवस योग्य नियोजन करून उत्कृष्ट सेवा बजावली असून ही सेवा निश्चितच प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

या सेवा उपक्रमांमुळे नांदेडकरांचा सेवाभाव भाविकांच्या मनात कायम राहील. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल व्यवस्थापन पथकाने स्टॉल नियोजन, वितरण व संचालनासाठी विशेष परिश्रम घेतले.

0000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...