Friday, January 23, 2026

विशेष लेख :

'हिंद दी चादर': त्याग आणि सर्वोच्च बलिदानाचा जिवंत अनुभव

पवित्र तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी नांदेड गुरुद्वाराच्या पवित्र परिसरात भाविकांची मांदियाळी आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविक केवळ नतमस्तक होत नाहीत, तर तिथे सुरू असलेल्या एका विशेष माहितीपटासमोर थबकतही आहेत. हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जींच्या जीवनावरील हा माहितीपट पाहताना अनेकांची पावले तिथेच रेंगाळतायत.

संध्याकाळची वेळ... गोदावरीच्या तीरावर वसलेले सचखंड गुरुद्वारा विद्युत रोषणाईने लख्ख उजळून निघाले आहे. गुरुद्वाराच्या सुवर्ण कळसाचे प्रतिबिंब आणि रोषणाईचा प्रकाश यामुळे परिसर न्हाऊन निघाला आहे. हवेत लंगरचा आणि कडा प्रसादाचा तोच परिचित, पवित्र आणि मनाला तृप्त करणारा सुवास दरवळत आहे.

एकीकडे गुरुजींच्या गुरबानीचे मंगल सूर कानावर पडत आहेत, तर दुसरीकडे समोरच्या भव्य पडद्यावर श्री गुरू तेग बहादूर साहिब जींचा इतिहास जिवंत होत आहे. एरवी भाविकांच्या गजबजाटाने भरलेल्या या परिसरात आज एक वेगळीच, एकाग्रतेची शांतता आहे. तो भव्य डिजिटल पडदा केवळ प्रकाश फेकत नाहीये, तर त्या प्रकाशात ४०० वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडत आहे. अंधारात चमकणारा तो पडदा आणि त्यावरचे प्रसंग पाहून, उपस्थित प्रत्येक जण सध्याच्या काळाचा विसर पडून त्या ऐतिहासिक कालखंडात हरवून गेला आहे.

या वातावरणात भारावून गेलेले भाविक जागचे हलत नाहीत. विशेषतः तरुण पिढीसाठी हा चित्रपट एक अनमोल ठेवा ठरत आहे. पडद्यावर जेव्हा श्री गुरु तेग बहादूर साहिब जींच्या सर्वोच्च बलिदानाचा प्रसंग येतो, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावतात आणि आपसूकच हात जोडले जातात. भक्तीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली की काय होते, याचा हा साक्षात पुरावा आहे.

काळ बदलला, माध्यमं बदलली, पण श्री गुरू तेग बहादूर साहिब जींच्या त्यागाचा संदेश आजही शाश्वत आहे. हे दृश्य आणि हा अनुभव शब्दांत मांडण्यापलीकडचा आहे.

पवित्र तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी नांदेड गुरुद्वारा, नांदेड वाघाळा येथील मैदानावर दोन दिवस चालणाऱ्या श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी आणि श्री गुरू गोबिंद सिंघ जी ३५० व्या गुरता गद्दी शताब्दी समागम या ऐतिहासिक पर्वास  आपणही सहकुटुंब एकदा नक्की भेट द्या.

🔗  पाहायला हवाच असा माहितीपट: https://www.youtube.com/watch?v=w_kI87w6NzA&t=1s

 -डॉ. श्याम टरके , सहायक संचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय, लातूर









No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...