वृत्त क्रमांक 96
‘हिंद की चादर’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी ५० पेशन्ट ट्रान्सफर शीट्सचे वितरण
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास साहित्य सुपूर्द
नांदेड, दि. २३ जानेवारी :-नांदेड शहरात दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह देश-विदेशातून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची पूर्वतयारी व सज्जता युद्धपातळीवर सुरू आहे.
लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय व्यवस्थेची तत्काळ सुविधा उपलब्ध राहावी, या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड राहुल कर्डिले यांच्याकडे ५० पेशन्ट ट्रान्सफर शीट्स (स्ट्रेचर) उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीस जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मान्यता देत आज दि. २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास त्यांच्या हस्ते सदर साहित्य वितरीत केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कु-हे, महसूल सहायक बारकुजी मोरे, गौरव तिवारी (डीडीएमएस) तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ही ५० पेशन्ट ट्रान्सफर शीट्स आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना कार्यक्रमस्थळावरून मुख्य रस्त्यापर्यंत, रुग्णवाहिकेपर्यंत व रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ‘हिंद दी चादर’ या भव्य सोहळ्यासह नांदेड शहर व जिल्ह्यात होणाऱ्या इतर मोठ्या कार्यक्रमांदरम्यान तसेच भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीतही या साहित्याचा कायमस्वरूपी उपयोग होणार आहे.
***
No comments:
Post a Comment