Monday, July 27, 2026

वृत्त क्रमांक

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची पारडी येथे फार्मर कप स्पर्धेतील शेतकरी गटांना भेट

नांदेड दि. 27 जुलै:- फार्मर कप स्पर्धेअंतर्गत आज लोहा तालुक्यातील पारडी येथे शेतकरी गटांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी थेट शेतावर भेट दिली. यावेळी त्यांनी विविध शेतकरी गटांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

भेटीदरम्यान एका शेतकरी गटाच्या निमंत्रकांनी ड्रोन प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांनी अशा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले.

याचवेळी कापूस उत्पादक गटांसाठी श्रेडर मशीनचे महत्त्व, त्याचे फायदे आणि शेतीतील उपयुक्तता याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेती अधिक फायदेशीर होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

या भेटीप्रसंगी लोहा उप विभागीय अधिकारी विलास नरवडे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी श्री. कासराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गावचे सरपंच, BRLF प्रादेशिक समन्व्यक  दिनेश खडसे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे, उमेदचे रवि मोरताटे, प्रगतशील शेतकरी आणि शेतकरी गट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे शेतकरी गटांचा आत्मविश्वास वाढला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवचैतन्य मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

00000






No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन  नांदेड दि. 27 जुलै :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक ...