वृत्त क्रमांक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १७ बालकांना मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी ठाण्याला रवाना
१०९ बालकांची हृदय तपासणी; पात्र बालकांवर कीम्स हॉस्पिटलमध्ये होणार उपचार
नांदेड, दि. २७ जुलै : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात १०९ बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली. यापैकी जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त १७ बालकांची हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ठाणे येथील कीम्स हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी तपोवन एक्सप्रेसने आज रवाना करण्यात आले.
राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बालकांमधील जन्मजात व्यंग, कुपोषण, विकासात्मक अडचणी तसेच विविध आजारांचे लवकर निदान व उपचार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात ४५ आरोग्य पथकांमार्फत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील आणि एकदा शाळेतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते.
या कार्यक्रमांतर्गत जन्मजात व्यंग (Defects), पोषणमूल्यांची कमतरता (Deficiencies), विकासात्मक विलंब (Developmental Delays) आणि विविध आजार (Diseases) यांचे निदान व उपचार केले जातात. तसेच हृदयरोग, नेत्रविकार, आकडी (फेफरे) आदींसाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करून आवश्यक औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात (NRC) दाखल करून उपचारासह पालकांना बुडीत मजुरीचा लाभही दिला जातो. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) मार्फत जन्मजात व्यंग किंवा विकासातील अडचणी असलेल्या बालकांवर वेळेत उपचार करून भविष्यातील गुंतागुंत टाळण्याचे कामही केले जाते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर डॉ. रेखा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि डॉ. अविनाश दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या १७ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरबीएसके समन्वयक अनिल कांबळे, डीईआयसी व्यवस्थापक विठ्ठल तावडे, अनिता चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment