Thursday, June 11, 2026

वृत्त क्रमांक 

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

नांदेड दि. 11 जून :- महाराष्ट्र मुक्त विद्यालय मंडळ, पुणेमार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत इयत्ता 5 वी प्राथमिक स्तर व इयत्ता 8 वी उच्च प्राथमिक स्तराच्या मूल्यमापनासाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यासाठी 15 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत मूल्यमापन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मूल्यमापनाचा निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर 11 जून 2026 रोजी जाहिर करण्यात आला आहे. 

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सदर माहितीची प्रिंट घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे इयत्ता 5 वी ते 8 वी ची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरीत करण्यात येईल असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 

मातोश्री शासकीय मुलांचे वसतीगृहात

15 ते 30 जूनदरम्यान प्रवेश सुरु

नांदेड दि. 11 जून :- मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांचे वसतीगृह, उच्च शिक्षण, तथागत नगर, मालेगाव रोड, नांदेड या वसतीगृहात शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी नांदेड शहर परिसरातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवीसाठी शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येत आहे.

प्रस्तुत वसतीगृहात शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठीच्या पुर्न-प्रवेश / नूतन प्रवेशाबाबत याव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पुर्न- प्रवेश /नूतन प्रवेशाचे अर्ज वसतीगृहात कार्यालयीन वेळेत 15 ते 30 जून, 2026 या कालावधीत (शासकीय सुट्टयांचे दिवस वगळून ) उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

सदर कालावधीत परिपुर्ण पुर्न-प्रवेश / नूतन प्रवेशाचे अर्ज हे संबंधित विहित कागदपत्रांसह स्विकारण्यात येईल. वरील निश्चित केलेल्या कालावधीनंतरचे आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही याची विद्यार्थी पालक तथा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गृहप्रमुख मातोश्री शासकीय इबीसी मुलांचे वसतीगृह नांदेड यांनी केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 

गोटपॉक्स लसीकरण : पहिल्या टप्प्यात ३७.५२ लाख लसमात्रांचे वाटप सुरू

मोहीम गतिमान करण्याचे आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील 

नांदेड दि. 11 जून:- राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे' येथे सुरू झाले आहे. २१ व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्ह्यानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्प्यात एकूण लस उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे' या संस्थेने आवश्यक लसमात्रांचे उत्पादन यशस्वीपणे केले आहे. सर्व जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी पुरवण्यात आलेली लस क्षेत्रीय स्तरावर वेळेत पोहोचवताना तिची शीत साखळी कुठेही खंडित होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी, गोटपॉक्स लसमात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षमता असलेल्या पशुंचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, लसीकरणाच्या विहित नमुन्यातील बिनचूक आणि एकत्रित दैनंदिन अहवाल दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत विभागनिहाय संस्थेकडे सादर करावा; अशा सूचना 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे' या संस्थेचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहयाखान पठाण यांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांना केल्या आहेत.                                                    

हॉटस्पॉट तालुक्यांवर विशेष लक्ष

गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या भागात प्राधान्य क्रमाने लसीकरण मोहीम राबवावी. या व्यापक मोहिमेसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक व सेवादाते यांचे सक्रिय सहकार्य घेण्यात यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात आले आहे.

पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य

"लंपी चर्मरोगासारख्या (LSD) संसर्गजन्य आजारांपासून आपल्या राज्यातील गोधनाची सुरक्षा करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या शेतकरी बांधवांचा मुख्य कणा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव आणि सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. सद्यस्थितीत हा उपाय क्षेत्रीय स्तरावर आम्ही मोहिम स्वरुपात योजत आहोत. पशुपालकांनीही विभागास सहकार्य करावे.

00000

वृत्त क्रमांक 

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरणाला मोहिम स्वरुपात प्रारंभ

लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या पुर्तीसाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन

नांदेड दि. 11 जून : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात 'मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम' आता युद्धपातळीवर व मोहीम स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पशुधनाचे आरोग्य राखणे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे आपले मुख्य ध्येय असून, निश्चित केलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागाने काटेकोर नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली. या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या घटसर्प (Haemorrhagic Septicaemia) व फऱ्या (Black Quarter) यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवण्यात आले आहे. राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश्यक तापमान राखले जाईल, यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर केला जात आहे.

मोहीम यशस्वी करण्यासाठी विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा आधीच वितरित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, ती प्रत्यक्ष गावागावांत व गोठ्यांपर्यंत पोहोचून 'डोअर स्टेप' पद्धतीने लस टोचणी करत आहेत. एकाही जनावराचे लसीकरण सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पशुपालकांना आवाहन

पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ऐनवेळी येणारे संकट आणि होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी आपल्या गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्यावे. यासाठी आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

'भारत पशुधन प्रणाली'वर  तात्काळ नोंदणी

यावेळच्या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे पारदर्शक डिजिटल ट्रॅकिंग होय. आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, प्रत्येक पशुधनाला लस टोचल्यानंतर त्याची नोंद 'भारत पशुधन प्रणाली' (NDLM Portal) या केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर रिअल-टाइम (तात्काळ) करणे आवश्यक आहे. पशुधनाचे टॅगिंग (१२ अंकी बिल्ला) करूनच ही नोंदणी केली जावी, जेणेकरून मोहिमेच्या प्रगतीवर थेट देखरेख ठेवता येईल व बोगस नोंदींना आळा बसेल.

00000

वृत्त क्रमांक 

गोवारी समाजाच्या १०० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश; 

अर्ज व प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड दि. 11 जून : विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार गोवारी समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळच्या शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळेसमोर, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून जवळच्या शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा चालविणाऱ्या इच्छुक व नामांकित शैक्षणिक संस्था/शाळांकडूनही विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. संबंधित संस्थांनी आपले प्रस्ताव १५ जून २०२६ पर्यंत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड यांच्या कार्यालयात सादर करावेत.

यासंदर्भात इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी अधिक माहिती देत इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

00000

 भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून #नवीमुंबईइंटरनॅशनलमेडिसिटी विकसित केली जाणार

▶️राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार

▶️प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल.

▶️या प्रकल्पातून सुमारे १.२ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि १०,००० हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा




📌 नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल!

 ‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
· एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी
क्लीव्हलँड, ओहायो | 10 : ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया (अध्यक्ष, कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन), डॉ. फाल्कोने (अध्यक्ष, इमर्जिंग मार्केट्स) आणि आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष तसेच क्लीव्हलँड क्लिनिकचे संचालक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मी मित्तल यांनी केले. आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन याही क्लीव्हलँड येथे उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. मिहाल्जेविक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्लीव्हलँड क्लिनिक नेतृत्वाचे तसेच विशेषतः डॉ. समीर कपाडिया आणि लक्ष्मी मित्तल यांचे या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले."
भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून संकल्पित करण्यात आलेली नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर विकसित केली जाणार आहे.
प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल. या प्रकल्पातून सुमारे 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि 10,000 हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
एनएमआयएमसीची संकल्पना केवळ आरोग्य सेवा पुरविण्यापुरती मर्यादित नाही. या परिसंस्थेमध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सेवा नवोन्मेष, वेलनेस पायाभूत सुविधा आणि संबंधित आरोग्य सेवा एकाच सहयोगी कॅम्पसमध्ये विकसित करण्यात येणार आहेत.
मेडिसिटीभोवती विकसित होणाऱ्या व्यापक नवोन्मेष परिसंस्थेचा भाग म्हणून, लक्ष्मी एन. मित्तल यांनी स्थापन केलेल्या एलएनएमआयआयटी, जयपूरने क्लीव्हलँड क्लिनिक आणि एनएमआयएमसीसोबत संशोधन पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान क्षमता आणि शैक्षणिक कौशल्य उपलब्ध करून अत्याधुनिक आरोग्य सेवा नवोन्मेष, ट्रान्सलेशनल रिसर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रिसिजन मेडिसिन उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. टॉम मिहाल्जेविक म्हणाले, "क्लीव्हलँड क्लिनिक जगभरातील धोरणात्मक भागीदारीद्वारे रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहे. एनएमआयएमसी हा भविष्यातील रुग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि संशोधकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या दूरदर्शी आरोग्य परिसंस्थेत आमचे कौशल्य योगदान देण्याची संधी आहे. महाराष्ट्र शासन, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भारतात क्लिनिकल उत्कृष्टता, नवोन्मेष आणि शिक्षणासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उभारण्यासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे."
ब्रुकफिल्डचे व्यवस्थापकीय भागीदार आणि आशिया पॅसिफिक विभागाचे रिअल इस्टेट प्रमुख अंकुर गुप्ता म्हणाले, "नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक परिणाम घडवून आणणारी पायाभूत सुविधा उभारण्याची एक अद्वितीय संधी आहे. महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भविष्यातील अनेक पिढ्यांना लाभदायी ठरणारे जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा केंद्र उभारण्याचा आम्हाला अभिमान आहे."
आरोधन हेल्थ सिटीच्या संस्थापक आणि संचालक डॉ. सलोनी पटवर्धन म्हणाल्या, "जगातील सर्वोत्तम संस्थांना एकत्र आणून एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आजचा हा टप्पा आम्हाला त्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन गेला असून नवी मुंबईमध्ये जागतिक आरोग्य सेवा केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे."
महाराष्ट्र शासन या भागीदारीसाठी आवश्यक सहकार्य करेल तसेच लागू असलेल्या धोरणे आणि नियमांनुसार आवश्यक मंजुरी आणि परवानग्या मिळविण्यासाठी या समूहाला मदत करेल.
नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विषयी
नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी हा महाराष्ट्र शासन विकसित करत असलेला एक परिवर्तनकारी आरोग्य आणि जीवन विज्ञान उपक्रम आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक म्हणून विकसित होणारा हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत उभारला जाणार आहे. जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा प्रदाते, संशोधक, शिक्षक, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणून क्लिनिकल उत्कृष्टता, संशोधन, नवोन्मेष आणि वैद्यकीय शिक्षणावर आधारित जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक आरोग्य सेवा केंद्र निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
००००





वृत्त क्रमांक   इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर नांदेड दि. 11 जून :- महाराष्ट्र मुक्त विद्यालय मं...