वृत्त क्रमांक
कर्ज व गुंतवणूक तसेच शेतकरी कुटुंब स्थिती सर्वेक्षणाला सहकार्याचे आवाहन
राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 81 व्या फेरीअंतर्गत जुलै 2026 ते जून 2027 दरम्यान सर्वेक्षण
नांदेड, दि. 27 जुलै : अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS) 81 वी फेरी अंतर्गत ‘कर्ज व गुंतवणूक’ तसेच ‘शेतकरी कुटुंबाची परिस्थिती दर्शक पाहणी’ ही सर्वेक्षणे जुलै 2026 ते जून 2027 या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार आहेत.
या सर्वेक्षणासाठी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक सहकार्य करून अचूक व परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे उपआयुक्त अर्जुन झाडे यांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेडच्या वतीने केले आहे.
केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाचे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात सहभागी होत असून, त्यामधून ग्रामीण व शेतकरी कुटुंबांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा व्यापक आढावा घेतला जाणार आहे.
या पाहणीत जमीन मालकी व प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्र, पशुधन मालकी, शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न, उत्पादन साधने, कर्जबाजारीपणा, शेती पद्धती तसेच कृषीबाह्य व्यवसायांमधील उत्पन्न व खर्च याबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे.
तसेच कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षणात कुटुंबाची मालमत्ता, गुंतवणूक, कर्जाची रक्कम, कर्ज देणारी संस्था (संस्थात्मक किंवा असंस्थात्मक), व्याजदर, व्याजाचा प्रकार, कर्जाचा उद्देश व कालावधी आदी बाबींची माहिती गोळा केली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे शासनाला शेतकरी कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न काढण्यास मदत होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक गरजा यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येणार असून, शेतकरी व ग्रामीण विकासासाठी प्रभावी धोरणे आखण्यास मदत होणार आहे.
या सर्वेक्षणासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे कर्मचारी निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन मुलाखतीद्वारे विहित नमुन्यात माहिती संकलित करणार आहेत. सर्वेक्षणादरम्यान संकलित करण्यात येणारी वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000
No comments:
Post a Comment