Friday, June 30, 2017

वस्तू व सेवाकर कायदा आजपासून लागू
 अडचणी सोडविण्यासाठी सुविधा केंद्राची उभारणी
नांदेड दि. 30 :- देशात वस्तू व सेवाकर कायदा आज 1 जुलै 2017 पासून लागू होत आहे. उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी ही कर पद्धत सोपी असून त्यातील तरतुदींमुळे वस्तू व सेवांच्या किंमतीत घट होऊन ग्राहकांना त्याचा फायदा होईल. व्यापाऱ्यांनी नोंदणी विवरणपत्र दाखल करणे आदी बाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वस्तू व सेवाकर विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत.  1 जुलैपासून  "विक्रीकर भवन" या कार्यालयाचे नाव वस्तू व सेवाकर भवन असे बदलण्यात येत आहे. नवीन वस्तू व सेवाकर कायदाची व्यापारी, नागरिक व इतर सर्वांनी स्वागत करावे, असे आवाहन विक्रीकर सहआयुक्त (व्हॅटप्रशा ) एम. एम. कोकणे, विक्रीकर उपायुक्त सौ. रंजना देशमुख यांनी केले आहे.
देशातील अप्रत्यक्ष करप्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करणारी ही वस्तू व सेवा कर प्रणाली आहे. ही करप्रणाली राष्ट्रीय सकल उत्पन्नात वृद्धी करणारी आहे. संपूर्ण देशात अप्रत्यक्ष कराची एकच पारदर्शक पद्धत, हा वस्तू व सेवाकर प्रणालीचा मुळ गाभा आहे. करदात्यांनी या करप्रणालीबाबत दडपण घेऊ नये. ही करप्रणाली लागू करताना काही कायदेशीर तरतुदी, प्रक्रिया यामध्ये अडचणी असतील तर त्या सोडविल्या जातील. कापड उद्योगातील व्यापाऱ्याप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यास पात्र होत आहेत त्यांना 30 जुलै 2017 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ आहे. शासनाने सर्व करदात्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. व्यापारी, उद्योग संघटना आदीनी सभासदाच्या अडचणी एकत्रित करून वस्तू व सेवाकर विभागाकडे अथवा शासनाकडे सादर कराव्यात. त्याबाबत विचार विनिमय करुन कार्यवाही केली जाईल. ज्या करदात्यांना नव्याने नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांनी वस्तू व सेवाकर विभागातील जीएसटी सुविधा केंद्र तसेच शासनमान्य ई-सेवा केंद्रातून मदत घेऊन सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल. वस्तू व सेवाकर कायद्याखाली सुरुवातीचे दोन महिने GSTR 3 B या नमुन्यात विवरणपत्र तयार करण्यासाठीची युटीलीटी वस्तू व सेवाकर विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अप्रत्यक्ष करप्रणाली मधील हा सर्वात मोठा व सर्व समावेशक बदल आहे. जगभरात अंदाजे 165 देशात ही कर प्रणाली राबवली जाते.  या कर पद्धतीबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्याबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वस्तू व सेवाकर विभागातील ( पुर्वीचा विक्रीकर विभाग ) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात जवळपास 425 ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आहेत.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...