Sunday, January 18, 2026

विशेष वृत्त  

माहिती आयोगात दाखल प्रकरणांचा गतीने निपटारा

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची उल्लेखनीय कामगिरी

छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सन 2024 मध्ये खंडपीठाने 14 हजार 1 द्वितीय अपिले निकाली काढली असून, 2025 मध्ये 10 हजार 783 द्वितीय अपिलांचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे. आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निपटाऱ्याच्या प्रमाणात जवळपास दहापटीने वाढ झाली असून, द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेत सुमारे 55 टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे.

राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या प्रभावी प्रशासकीय नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. तक्रार निवारणात 2025 मध्ये 10 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 2024 अखेरीस प्रलंबित असलेल्या 165 तक्रारींची संख्या डिसेंबर 2025 अखेर 85 वर आली असून, त्यामुळे प्रलंबित तक्रारींमध्ये 51 टक्के घट झाली आहे.

द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेतही मोठी घट झाली आहे. 2024 अखेरीस 8 हजार 699 द्वितीय अपिले प्रलंबित होती. ती संख्या डिसेंबर 2025 अखेर 3 हजार 946 इतकी झाली असून, प्रलंबित अपिलांच्या प्रमाणात सुमारे 55 टक्के घट झाल्याचे स्पष्ट होते. राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची ही कामगिरी माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस बळ देणारी ठरली आहे.

प्रतिक्रिया

राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामार्फत प्रकरणांचा जलद व पारदर्शक निपटारा करण्यावर भर देण्यात आला आहे. नियोजनबद्ध कामकाज, सुनावणीतील शिस्त आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे प्रलंबित अपिले व तक्रारींच्या निपटाऱ्यात लक्षणीय प्रगती साधता आली आहे.

नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत वेळेत न्याय मिळावा, हाच आयोगाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील तसेच माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यात येईल,” प्रकाश इंदलकर राज्य माहिती आयुक्त

000000



No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...