Sunday, January 18, 2026

विशेष वृत्त  

हिंद दी चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीकडून व्यापक जनजागृती अभियान

हिंगोली, दि.१८ (जिमाका) : नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीच्या वतीने विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने सोमवारी (दि. १९ जानेवारी) रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान व धर्मस्वातंत्र्याच्या महान विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मान्यवर, स्थानिक नागरिक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीचे अशासकीय सदस्य हरनाम सिंह यांनी यावेळी बॅनर व प्रचार पत्रके वितरित करून तसेच व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून हिंद दी चादर शहीदी समागमाची नांदेड, हिंगोली, जालना येथे माहिती दिली. यावेळी हरणामसिंग चव्हाण, अशासकीय सदस्य‌ जगबीर सिंग बावरी, शेरसिंग बावरी, लखनसिंग टाक, जितुसिंग टाक आदी समाजबांधवांकडून शिकलकरी वस्तीत विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात प्रचाररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून गावोगावी, वस्ती तांड्यांवर भेटी देत कार्यक्रमाचे सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या प्रचार मोहिमेत अशासकीय सदस्य अ‍ॅड. संतोष राठोड तसेच डॉ. आकाश राठोड यांचाही महत्त्वाचा सहभाग असून त्यांनी समागमाच्या उद्देशावर प्रकाश टाकण्यात येत आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हिंद दी चादर शहीदी समागमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा व राष्ट्रभावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार, नरसी नामदेव येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या वारकरी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाच्या प्रसार व प्रचारासाठी अंबादास दळवी हे सक्रियपणे कार्यरत असून, त्याचाच एक भाग म्हणून नरसी नामदेव व नरसी फाटा परिसरात बॅनर लावून प्रचार सुरू करण्यात आला आहे.

नांदेड येथे होणाऱ्या या ऐतिहासिक शहीदी समागमासाठी हिंगोली जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

****












No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...