Monday, January 26, 2026

 विशेष वृत्त क्र. 138

जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री अतुल सावे 

 •  पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण

•  देशभक्तीपर गीतावर शालेय मुलांची कवायतीने वेधले सर्वांचे लक्ष

•  पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन  

नांदेड दि. 26 जानेवारी : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे संपन्न झाले. यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबध्द असून विविध विकास कामावर भर देण्यात येणार असल्याचे असल्याचे प्रतिपादन केले. आजचा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर गीतावर शालेय विद्यार्थ्यांच्या कवायतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी,अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी जिल्हाधिकारी किरण अंबेकर, वरिष्ठ अधिकारी,  स्वातंत्र सैनिक, वारसपत्नी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारस पत्नींची भेट घेतली. पालक मंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. आज सकाळी 9.15 वा. पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर पोलीस वाहनातून त्यांनी संचलन करणाऱ्या पथकांचे निरीक्षण केले. 

काल नांदेड येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 350 वा शहीदी समागम  कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुद्वारा बोर्ड, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, नामलेवा संगत व इतर 9 समाजाच्यावतीने यशस्वीरित्या केल्यामुळे पालकमंत्री श्री. सावे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

शासनाच्यावतीने नेहमीच शेतकऱ्यांच्या व सामान्यांसह हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत असून जून ते सप्टेंबर 2025 या काळात जिल्ह्याला नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठे नुकसान झाले होते. या नुकसान झालेल्यांना भरपाईसाठी 628 कोटी 98 लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक बाबीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 727 कोटी 93 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारीत महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव, हवामानाचे संदेश, इ. माहिती  मिळणार आहे. यामुळे या ॲपचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.  

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात 1 लाख जलतारा तयार करण्यात येणार असून, येत्या काळात नांदेड जिल्हा पाणीदार होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने 150 दिवसांच्या उपक्रमात विविध लोकाभिमुख, गतीमान उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व सुविधा व उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यातील पंचायतराज संस्थाना अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करावे असेही आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले.    

महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2025 मध्ये सौर ऊर्जेच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करत जगात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. महावितरणने अवघ्या 30 दिवसांत 45 हजार 911 ऑफ-ग्रीड सौर कृषीपंप बसवून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती त्यांनी  दिली.  

नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून एमपीडीए अंतर्गत 41 कारवाया करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा बसविण्यासाठी ऑपरेशन फ्लश ऑऊट राबविण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  

देशभक्तीपर गीतावर शालेय मुलांची कवायतीने वेधले सर्वांचे लक्ष

शिक्षण विभागाच्यावतीने देशभक्तीपर गीतावर शालेय विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द कवायतीचे सादरीकरण पोलीस कवायत मैदानावर केले. या कवायतीत प्रत्यक्ष पालकमंत्र्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला. या तालबध्द कवायतीनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत सर्व वातावरण देशभक्तीमय केले. 

आजच्या परेडचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक शशांक गौडा यांनी तर सेंकड इन परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक विजयकुमार धोंडगे केले. प्लाटून मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस बलाचे प्लाटून कमांडर केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक देविदास जाधव, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद बडगिरे, दंगा नियंत्रण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण औटे, पोलीस मुख्यालय पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निखील पोटे, दंगा नियंत्रण महिला पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनिसा सय्यद, गृहरक्षक दल पथक (पुरुष) वरिष्ठ प्लाटून नायक बळवंत अटकोरे, गृहरक्षक दल पथक (महिला) श्रीमती मंगल बराटे, राष्ट्रीय छात्रसेना पथकाच्या आराध्या चव्हाण, स्काऊट व गाईड पथकाच्या प्रतिक्षा मस्के, केंद्रीय विद्यालय चि. वरप्रसाद, पोलीस बँड पथकाच्या श्रेणी पो. उपनिरीक्षक बी. आर. वाघमारे व सहकारी कर्मचारी, डॉग स्कॉर्ड युनिट श्वानाचे नाव डेक्सटर पो.हे.कॉ वाहेद बेग, डॉग हॅडलर, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे राजकिरण सोनकांबळे, वाहन चालक प्रवीण चंदेल, दंगा नियंत्रण वाहन (वज्र वाहन) वामन पारडे, वाहन चालक बालाजी ठाकूर, अग्निशमक वाहनाचे अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, फायरमेन शाहरुख पठाण, चालक एस. पी. तोटावाड, 108 रुग्णवाहिकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन सुर्यवंशी चालक सतीश बेरडे यांचा तर लोकशाहीचा चित्ररथामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने यांचा या संचलनात सहभाग होता.

पालकमंत्री यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कार व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

ॲथेलेटीक्स (भालाफेक व गोळाफेक) ऑलम्पीक गेम मध्ये श्रीमती भाग्यश्री माधवराव जाधव, योगासन एशियन योगासन श्रेयस दिलीप मार्कंडेय  यांना, बॅडमिटन राष्ट्रीय पॅरा बॅडमिटन मध्ये विजयी झालेल्यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील निवड झालेल्या अंजली प्रवेश लोखंडे यांचा प्रथम तर रुमाले प्रियंका गौतम यांचा द्वितीय, प्रतिक्षा विठ्ठल मुनेश्वर यांचा तृतीय क्रमांक आल्याबाबत त्यांना रुपये 3 हजार रुपयांचा धनादेश व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. योगाचार्य सिताराम सोनटक्के यांचा योग प्रसाराबाबत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र पांडागळे व अक्षय ढोके यांनी केले. 

0000
































No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 142 आज नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ संगीत महोत्सव नांदेड, दि. २६ जानेवारी:-मंगळवारी २७ जानेवारी रोजी महाकवी संत विष्णूदास...