वृत्त क्र. 142
आज नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ संगीत महोत्सव
नांदेड, दि. २६ जानेवारी:-मंगळवारी २७ जानेवारी रोजी महाकवी संत विष्णूदास यांच्या रसाळ भक्तिरचनांवर आधारित ‘माहूर गडाची माय रेणुका’ हा भव्य संगीत महोत्सव नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात सायंकाळी ५ वाजता या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमातील रचनांना संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूर हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ असून, या निसर्गरम्य परिसरात महाकवी संत विष्णूदास यांची समाधी आहे. त्यांच्या निवडक भक्तिरचनांवर आधारित हा संगीत महोत्सव भक्ती, संस्कृती आणि संगीताचा अनोखा संगम ठरणार आहे.
या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले राहणार असून, मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, आयुक्त महेश कुमार डोईफोडे तसेच संपादक शंतनू डोईफोडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्रातील नामांकित गायक, वादक आणि निवेदक या संगीत महोत्सवात सहभागी होणार असून, रसिकांसाठी हा एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.
या संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष सुनील वेदपाठक यांनी केले आहे.
०००००

No comments:
Post a Comment