Monday, January 26, 2026

विशेष वृत्त क्र. 139

सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना माफक दरात तपासणीची सुविधा : पालकमंत्री अतुल सावे

पालकमंत्र्यांच्या हस्ते सिटीस्कॅन व एमआरआय सेवेचे लोकार्पण

नांदेड, दि. 26 जानेवारी :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे पीपीपी (PPP) तत्त्वावर अत्याधुनिक सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचे उद्घाटन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अतुल सावे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या सेवेमुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना कमी दरात दर्जेदार तपासणीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री. सावे यांनी सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

या उद्घाटन कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके बोंढारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पीपीपी तत्त्वावर नऊ ठिकाणी सिटीस्कॅन व एमआरआय सुविधा सुरू करण्यात येत असून, त्यामध्ये नांदेडला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ही आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्याने सुरू झालेल्या सिटीस्कॅन व एमआरआय मशीनमुळे रुग्णांना माफक दरात दर्जेदार तपासणी करता येणार आहे.

तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेंतर्गत अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयासाठी आणखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयाच्या परिसरात लवकरच सेतू सुविधा केंद्र व पोलीस चौकी सुरू करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन देत पालकमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी, रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सिटीस्कॅन व एमआरआय सेवेचे आज लोकार्पण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सेवा, आयसीयु, ट्रॉमा सेंटर, डायलेसिस सेंटर, कॅथलॅब यासारख्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

कार्यक्रमात आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर व आमदार आनंदराव तिडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.

00000













No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 142 आज नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ संगीत महोत्सव नांदेड, दि. २६ जानेवारी:-मंगळवारी २७ जानेवारी रोजी महाकवी संत विष्णूदास...